भारतीय संघाला अनेक असे कर्णधार लाभले ज्यांनी त्यांच्या नेतृत्वपदात भारतीय संघाचा क्रिकेटचा स्तर उंचावला होता. त्यातीलच एक म्हणजे भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली. आता गांगुलीच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर आली आहे. गांगुली यांनी स्वतः ही खूशखबर दिली. गांगुलीच्या आत्मकथेवर(बायोपिक) लवकरच एक सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. याबाबत या सिनेमाचे निर्माण लव फिल्मद्वारा करण्यात येणार असल्याची माहिती गांगुलीने ट्विटरवर दिली.
भारतीय नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष गांगुलीने याआधीच त्यांच्या आत्मकथेवर चित्रपट येणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, या ट्विटवरून गांगुलीने त्यांच्या आत्मकथेवरील चित्रपटावर शिक्कामोर्तब केला आहे. तसेच गांगुलीने त्यांची बायोपिक लवकरच रूपेरी पडद्यावर चाहत्यांच्या भेटीला येणार असल्याचे देखील सांगितले.
या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप स्पष्ट नाही. या चित्रपटाचे निर्माण लव फिल्मद्वारा करण्यात येणार आहे. त्यामुळे याचे दिग्दर्शन देखील लव रंजनद्वारा केले जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. गांगुली यांच्या आधीही महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकर, बबीता फोगाट, मिल्खा सिंग, मेरी कोम, मोहम्मद अझरुद्दीन आणि सायना नेहवाल यांसारख्या दिग्गज खेळाडूंच्या आत्मकथेवर देखील चित्रपट बनले होते.
आता लवकर सौरव गांगुली यांच्या जीवनावर आधारित देखील एक चित्रपट तयार होणार आहे. दरम्यान. या चित्रपटात गांगुली यांची भूमिका कोण साकारणार याचादेखील खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र एका मुलाखतीदरम्यान गांगुलीने आपल्या भूमिकेत रणवीर कपूरला पाहायला आवडेल, असे सांगितले होते.
याबाबत सौरव गांगुली यांनी ट्विट करत लिहिले, “क्रिकेट हे माझे जीवन आहे. क्रिकेटनेच मला मान वर करून पुढे जाण्याचा आत्मविश्वास आणि शक्ती दिली. क्रिकेटमधील एक प्रवास, जो आता रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. मी खूप उत्साहित आहे की, लव फिल्म माझ्यावर आधारित एका चित्रपटाची निर्मिती करणार आहे आणि याला मोठ्या रुपेरी पडद्यावर साकारणार आहेत.”
Cricket has been my life, it gave confidence and ability to walk forward with my head held high, a journey to be cherished.
Thrilled that Luv Films will produce a biopic on my journey and bring it to life for the big screen 🏏🎥@LuvFilms @luv_ranjan @gargankur @DasSanjay1812— Sourav Ganguly (@SGanguly99) September 9, 2021
लव रंजन म्हणाले की, “लव फिल्मच्या परिवारात दादाचे (सौरव गांगुली) असणे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. आम्हाला तुमच्या जीवनाचा एक भाग बनवण्यासाठी आणि याला जगासमोर आणून देण्यासाठी धन्यवाद.”
दरम्यान, सौरव गांगुली भारतीय संघाचे दिग्गज खेळाडू होते. गांगुलीने आतापर्यंत भारतीय संघातून ११३ कसोटी सामने खेळले ज्यामध्ये त्यांनी ७२१२ धावा केल्या होत्या. तसेच ३३१ एकदिवसीय सामन्यांमध्ये गांगुलीने ११,३६३ धावा केल्या होत्या.
गांगुली भारतीय संघातील यशस्वी कर्णधारांपैकी एक होते. गांगुली यांच्या नेतृत्वपदातच भारतीय संघाने २००३ साली एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये देखील गांगुलीने भारतीय क्रिकेटचा स्तर उंचावण्यात मोलाचे योगदान दिले होते. त्याचबरोबर २००२ साली चॅम्पियन्स ट्रॉफीचे श्रीलंकेबरोबर संयुक्त विजेतेपद स्विकारलेल्या भारतीय संघाचे कर्णधारपदही गांगुलीनेही निभावले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
–तालिबानकडून महिला क्रिकेटला विरोध होत असल्याचे पाहून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिली मोठी धमकी
–धोनीला मेंटॉर बनवलं खरं, पण नवीन वादाला झाली सुरुवात; बीसीसीआयला आलं तक्रारीचं पत्र
–इंग्लंडने जाहीर केला टी२० विश्वचषकासाठी १५ जणांचा संघ, बेन स्टोक्सचा समावेश नाही