पुढील महिन्यात टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे, या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच संघांनी त्यांचे १५ सदस्ययी संघ जाहीर केले आहेत. भारतानेही आपला संघ जाहीर केला आहे. पण, याचवेळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सर्वांना आश्चर्यचकीत करणारा निर्णय घेतला, तो म्हणजे भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला संघाचा मार्गदर्शक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. याबद्दल आता बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने प्रतिक्रिया दिली आहे.
धोनीला टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाचा मार्गदर्शक म्हणून नेमण्यात आल्यानंतर अनेक प्रतिक्रिया क्रिकेटविश्वातून उमटल्या. अनेकांनी त्याची संघातील भूमिका नक्की काय असणार आहे, असा प्रश्न विचारला, तर अनेकांनी तो भविष्यात देखील भारतीय संघाबरोबर असणार का, असा प्रश्न विचारला. आता याबद्दल गांगुलीने उत्तर दिले आहे.
गांगुली म्हणाला, ‘धोनी भारतीय संघाबरोबर केवळ टी२० विश्वचषकासाठी असणार आहे. त्याने ही गोष्ट आमच्याकडे स्पष्ट केली आहे.’
स्टिव्ह वॉप्रमाणे धोनीची भूमीका
धोनीच्या भूमीकेबद्दल प्रतिक्रिया देताना गांगुलीने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज कर्णधार स्टिव्ह वॉचे उदाहरण दिले. गांगुलीने सांगितले की स्टिव्ह वॉ ज्याप्रमाणे २०१९ ऍशेस मालिकेवेळी ऑस्ट्रेलिया संघाबरोबर होता, त्याचप्रमाणे धोनीही भारतीय संघासह असेल. स्टिव्ह वॉ २०१९ ऍशेस वेळी ऑस्ट्रेलियाचा मार्गदर्शक होता.
टेलिग्राफशी बोलताना गांगुली म्हणाला, ‘विश्वचषकात तो केवळ संघाला मदत करण्यासाठी असेल. त्याची भारताकडून आणि चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना टी२० क्रिकेटमधील आकडेवारी चांगली आहे. यामागे अनेक विचार होते. आम्ही खूप चर्चा केली आणि मग त्याला बोर्डवर आणले. आम्ही २०१३ नंतर आयसीसीची ट्रॉफी जिंकलेली नाही.’
पुढे गांगुली म्हणाला, ‘लक्षात ठेवा जेव्हा ऑस्ट्रेलियाने मागच्यावेळी (२०१९) जेव्हा २-२ अशी ऍशेस मालिका इंग्लंडमध्ये बरोबरीत सोडवली होती, तेव्हा ऑस्ट्रेलियाकडे स्टिव्ह वॉ होता. मोठ्या स्पर्धेवेळी असे भारदस्त व्यक्तीमत्त उपस्थित असेल, तर नेहमीच मदत होते.’
भारताच्या वरिष्ठ पुरुष संघाने २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजेतेपद जिंकल्यानंतर एकदाही आयसीसी स्पर्धांचे विजेतेपद जिंकलेले नाही. दरम्यान, भारताने अनेकदा उपांत्य आणि अंतिम फेरीत प्रवेश केला, मात्र विजेदेपद हाती आले नाही. भारताने धोनीच्याच नेतृत्त्वाखाली २०१३ ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यापूर्वी २००७ साली टी२० विश्वचषक आणि २०११ सालचा वनडे विश्वचषक भारताने धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकला आहे.
विशेष म्हणजे विराट पहिल्यांदाच टी२० विश्वचषकात भारताचे नेतृत्व करणार आहे. यापूर्वी झालेल्या सर्व ६ टी२० विश्वचषकात धोनी भारताचा कर्णधार होता.
महत्त्वाच्या बातम्या –
मॅंचेस्टर कसोटीच्या बदल्यात बीसीसीआयने ईसीबीपुढे ठेवला ‘हा’ प्रस्ताव
जोकोविचला पराभूत करताच मेदवेदेवने का केले ‘डेड फिश’ सेलिब्रेशन? स्वत:च केलाय खुलासा
असे रंगणार कॅरेबियन प्रीमियर लीगचे उपांत्य सामने, ‘या’ संघाचे पारडे जड