यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीचा थरार उद्या (9 मार्च) रंगणार आहे. दरम्यान या मेगा स्पर्धेच्या फायनलसाठी भारत आणि न्यूझीलंड संघ आमने-सामने आहेत. भारत दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचा फायनल सामना खेळणार आहे. यापूर्वी, भारताने 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती आणि 2017 मध्ये भारताला आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध फायनलमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता.
यंदा भारताचा फायनल सामना न्यूझीलंडशी होणार आहे. आयसीसीच्या फायनलमध्ये न्यूझीलंड संघाने भारतावर वर्चस्व गाजवले असले तरी, यावेळी भारत इतिहास रचू शकतो. अशा परिस्थितीत, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे फलंदाज कोण आहेत याबद्दल आपण जाणून घेऊया.
1) सौरव गांगुली- 2000च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये गांगुलीने न्यूझीलंडविरुद्ध शानदार शतक झळकावले. तो भारतीय संघाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. या सामन्यात सचिन तेंडुलकरनेही अर्धशतकी खेळी केली. गांगुलीने 130 चेंडूंत 9 चौकारांसह 4 षटकार लगावले होते. दरम्यान त्याने 117 धावा केल्या. न्यूझीलंडने धावांचा पाठलाग करताना 2 चेंडू शिल्लक असताना 4 विकेट्सनी सामना जिंकला.
2) विराट कोहली- 2013 मध्ये झालेल्या 20 षटकांच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल सामन्यात भारताने इंग्लंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करत 7 बाद 129 धावा केल्या. संघाकडून विराट कोहलीने सर्वाधिक 43 धावा केल्या. कोहलीने 34 चेंडूत 4 चौकारांसह 1 षटकार मारला. याशिवाय, एकाही फलंदाजाला 35 धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. भारताने हा सामना 5 धावांनी जिंकला आणि विजेतेपद पटकावले.
3) हार्दिक पांड्या- 2017च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारताचा वरचा फलंदाजी क्रम अपयशी ठरला तेव्हा हार्दिक पांड्याने संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. त्याने 43 चेंडूंचा सामना केला आणि 4 चौकार आणि 6 षटकारांसह 76 धावा केल्या. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना धुडकावून लावले आणि सामना 180 धावांनी जिंकून चॅम्पियन्सचा किताब आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या-
आयसीसीच्या फायनलमध्ये भारताचे ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार विजेते; पाहा यादी
IPL 2025 साठी KKRचा मोठा निर्णय! माजी अष्टपैलू खेळाडूला प्रशिक्षकपदाची जबाबदारी
IND vs NZ: फायनलमध्ये कोण मारणार बाजी? माजी कर्णधाराची मोठी भविष्यवाणी






