संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) सुरु असलेल्या टी२० विश्वचषकात मंगळवारी (२ नोव्हेंबर) पहिल्या सामन्यात अ गटातील बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका हे संघ आमने-सामने आले. अबुधाबी येथील शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा ६ गडी राखून पराभव केला. यासह दक्षिण आफ्रिका संघाने उपांत्य फेरीच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकले. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा हा सामनावीर ठरला.
बांगलादेशच्या फलंदाजांची हाराकिरी
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बवुमा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शाकिब अल हसनच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या बांगलादेश संघाची फलंदाजी या सामन्यात पूर्णता ढेपाळली. एन्रिक नॉर्किए व कगिसो रबाडाने भेदक गोलंदाजी करत प्रत्येकी तीन बळी मिळविले. चायनामन फिरकीपटू तबरेज शम्सी याने दोन बळी घेत त्यांना सुयोग्य साथ दिली. अष्टपैलू मेहदी हसनने बांगलादेशसाठी सर्वाधिक २७ धावा केल्या. बांगलादेशचा संघ ८४ धावांवर सर्वबाद झाला.
दक्षिण आफ्रिकेचा सफाईदार विजय
प्रत्युत्तरात, दक्षिण आफ्रिकेसाठी क्विंटन डी कॉकने १४, वॅन डर डसेनने २२ व कर्णधार टेंबा बवुमाने नाबाद ३१ धावा करून संघाला आरामात विजय मिळवून दिला. तस्कीन अहमदने दोन बळी आपल्या नावे केले. या विजयासह दक्षिण आफ्रिकेचा संघ अ गटाच्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. दक्षिण आफ्रिकेचा नेट रनरेट हा ऑस्ट्रेलियापेक्षा सरस असल्याने त्यांना उपांत्य फेरीत जाण्याची चांगली संधी आहे.
इंग्लंडची उपांत्य फेरी जवळपास पक्की
अ गटातील इंग्लंड संघाने आतापर्यंत तीन सामने जिंकत उपांत्य फेरीत जागा जवळपास निश्चित केली आहे. दुसरीकडे, श्रीलंका व बांगलादेश हे संघ पराभूत झाल्याने स्पर्धेतून बाहेर गेले आहेत. वेस्ट इंडीज प्रत्येकी एक विजय व एका पराभवासह गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. उपांत्य फेरीच्या दुसऱ्या स्थानासाठी ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांच्यात चुरस असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
चक्रवर्तीची सुट्टी अन् अश्विनचे कमबॅक? अफगानिस्तान विरुद्ध अशी असू शकते भारताची ‘प्लेइंग इलेव्हन’
भारताच्या पराभवास खेळाडू नाहीतर बीसीसीआय जबाबदार? वाचा संपूर्ण प्रकरण
आयपीएल २०२१ गाजवलेल्या ‘या’ ५ यंगस्टर्सकडे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये असेल सर्वांचेच लक्ष