घरच्या मैदानावर खेळत असलेल्या न्यूझीलंड संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या व अखेरच्या कसोटीत केवळ सामना अनिर्णीत ठेवून इतिहास रचण्याची संधी होती. मात्र, दक्षिण आफ्रिकेचा युवा वेगवान गोलंदाज मार्को जेन्सनच्या भेदक गोलंदाजीपुढे यजमान संघाने गुडघे टेकले. अखेरीस, या सामन्यात पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने यजमानांना १९८ धावांनी पराभूत करत विजय संपादन केला. यासोबतच मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. याबरोबरच ८९ वर्षात प्रथमच दक्षिण आफ्रिकेला कसोटी मालिकेत पराभूत करण्याचे न्यूझीलंडचे स्वप्न अपूर्ण राहिले.
मालिकेतील पहिल्या सामन्यात दारूण पराभव झाल्यानंतर पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाने दुसऱ्या सामन्यात अत्यंत आत्मविश्वासाने सुरुवात केली. इर्वीच्या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने ३६४ धावा उभारल्या. दक्षिण आफ्रिकेने उभारलेल्या आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंड केवळ २९३ धावांपर्यंतच मजल मारू शकला. कॉलिन डी ग्रॅंडहोम याने शतकी तर डॅरिल मिचेलने अर्धशतकी खेळी केली. दक्षिण आफ्रिकेसाठी अनुभवी कागीसो रबाडाने ५ तर जेन्सनने ४ बळी मिळवले.
पहिल्या डावात मिळालेल्या ७१ धावांच्या आघाडीचा न्यूझीलंड संघाने पूरेपूर फायदा घेतला. यष्टीरक्षक कायले वेरानेच्या शतकी व रबाडाच्या ४७ धावांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने आपला दुसरा डाव ३५४ धावांवर घोषित केला. न्यूझीलंडसमोर विजयासाठी ४२५ धावांचे मोठे आव्हान होते.
सामना वाचविण्याच्या उद्देशाने मैदानात उतरलेल्या न्यूझीलंड संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. केवळ २५ धावांवर त्यांचे तीन प्रमुख फलंदाज बाद झाले. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत त्यांनी आपले चार बळी गमावले होते. सलामीवीर डेवॉन कॉनवे याने अखेरच्या दिवशी सामना वाचवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र तो शतकापासून केवळ ८ धावा दूर असताना बाद झाला. त्यानंतर, टॉम ब्लंडल व्यतिरिक्त कोणताही फलंदाज संघर्ष करताना दिसला नाही. रबाडा, जेन्सन व केशव महाराज यांनी प्रत्येकी तीन बळी घेत न्यूझीलंडचा डाव २२७ धावांवर गुंडाळत मालिका बरोबरीत आणली. रबाडाला सामनावीर तर मॅट हेन्रीला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल सुरू होण्याआधीच नवख्या गुजरात टायटन्सला हादरा! करोडपती खेळाडूचा खेळण्यास नकार (mahasports.in)
शास्त्री गुरुजींचे आधी साहाला समर्थन, आता म्हणतायेत… (mahasports.in)