इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल)चा १५वा हंगाम संपला आहे. आयपीएलनंतर भारतीय संघाची पहिलीच मालिका दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहे. ही टी२० मालिका ९ जूनपासून सुरू होत आहे. मालिकेतील पहिला सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. यासाठी डीडीसीएनेही तयारी सुरू केली आहे. भारतात आता क्रीडा क्षेत्रातील कोरोनाचे निर्बंध हळूहळू संपुष्टात येत आहेत. क्रिकेटपटूंसाठी बायो-बबलची आवश्यकता देखील दूर केली जात आहे. अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेत दोन्ही देशांच्या खेळाडूंना बायो-बबलमध्ये राहण्याची गरज भासणार नाही.
या मालिकेसाठी संघात सामील केलेल्या सर्व खेळाडूंना बीसीसीआयने ५ जून रोजी दिल्लीत एकत्रित येण्यास सांगितले आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ २ जून रोजी दिल्लीत दाखल होईल. दक्षिण आफ्रिकेच्या संघात सामील असलेले अनेक खेळाडू आयपीएलमुळे सध्या भारतात आहेत. त्यामुळे उर्वरित खेळाडू देखील २ जूनपर्यंत भारतात दाखल होतील असे सांगितले जात आहे.
दोन्ही संघ दिल्लीत दाखल होताच प्रत्येक खेळाडूंची आरटीपीसीआर (RTPCR) चाचणी केली जाणार आहे. शिवाय प्रत्येक दिवशी हॉटेलमध्ये दाखल झाल्यानंतर दररोज खेळाडूंची कोरोना चाचणी केली जाणार आहे. डीडीसीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे की, “आम्ही सर्व तयारी पूर्ण केली आहे आणि मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरले पाहिजे अशी अपेक्षा आहे. याशिवाय खेळाडूंना स्टेडियमपर्यंत पोहोचण्यासाठी ग्रीन कॉरिडॉरही करण्यात आला आहे.”
दरम्यान, बीसीसीआयकडून या मालिकेसाठी केएल राहुल (KL Rahul) याला कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. संघाचा कर्णधार रोहित शर्मासह (Rohit Sharma) विराट कोहली (Virat Kohli), मोहम्मद शामी (Mohammad Shami) आणि जस्प्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांना विश्रांती दिली आहे. त्यामुळे संघाचे उपकर्णधारपद रिषभ पंत (Rishabh Pant) सांभाळेल. शिवाय उमरान मलिक (Umran Malik) आणि अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) सारख्या नव्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी उपलब्ध झाली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठीचा भारतीय संघ
केएल राहुल (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार), श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, अक्षर पटेल आणि रवी बिश्नोई.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अलविदा केके | प्रसिद्ध भारतीय गायकाचा चालू कार्यक्रमात मृत्यू, क्रिडाविश्वातूनही व्यक्त होतेय हळहळ
बांगलादेशच्या कर्णधाराचा कसोटी नेतृत्त्वपदावरून राजीनामा, ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय