कोविड-१९ च्या संकटानंतर आता क्रिकेट हळूहळू पूर्वपदावर आले आहे. अशातच दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट, ओम्रिकॉन सापडला असल्याने पुन्हा एकदा क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाची प्रकरणे वेगाने वाढत असल्यामुळे बोर्डाने देशांतर्गत सामने स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने डिव्हीजन २ च्या चौथ्या फेरीतील सर्व ३ सामने स्थगित केले आहेत.
हे सामने ४ दिवसीय सामने २ ते ५ डिसेंबरदरम्यान खेळले जाणार होते. हे सामने जैव सुरक्षित वातावरणात खेळवले जात नव्हते. त्यामुळे पहिल्या सामन्यापूर्वी बरेचसे क्रिकेटपटू कोरोना पॉझिटिव्ह आढळू लागले होते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी यजमानांच्या क्रिकेट बोर्डाने हा निर्णय घेतला असल्याने भारताच्याही गोट्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दक्षिण आफ्रिका बोर्डाने यासंबंधी माहिती देताना म्हटले आहे की, “बोर्डासाठी सर्व खेळाडू आणि स्टाफची सुरक्षा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना प्रोटोकॉलनुसार हे पाऊल उचलले गेले आहे. बोर्ड कोरोनाच्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. कोरोना संक्रमणाच्या स्थितीच्या आधावरच या वर्षातील उरलेल्या सामन्यांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला जाईल.”
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर प्रश्नचिन्ह
भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा १७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची कसोटी मालिका, ३ सामन्यांची वनडे मालिका आणि ४ सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. २६ जानेवारी रोजी चौथ्या टी२० सामन्याने हा दौरा संपणार आहे. ओम्रिकॉन व्हेरिएंटच्या धोक्यामुळे या दौऱ्याला एका आठवड्याचा विलंब होऊ शकतो. बीसीसीआय अधिकाऱ्यांनी यासंबंधी सांगताना म्हटले होते की, दोन्ही देशांचे बोर्ड सातत्याने एकमेकांच्या संपर्कात आहेत. खेळाडूंच्या सुरक्षेचा विचार करुनच या मालिकांच्या आयोजनासंबंधी निर्णय घेतला जाईल.
यापूर्वी रद्द झालाय दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा
यापूर्वीही मार्च २०२० मध्ये कोरोनामुळे दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील मालिका संकटात सापडल्या होत्या. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. परंतु त्यांना एकही सामना न खेळता मायदेशी परताने लागले होते. त्यावेळी ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना धरमशाला येथे होणार होता. परंतु पावसामुळे एकही चेंडू न फेकता हा सामना रद्द झाला होता. त्यानंतर भारतातील कोरोनाची प्रकरणे वाढल्याने उर्वरित २ सामने प्रेक्षकांविना रिकाम्या मैदानात खेळवण्याचे ठरवले गेले. परंतु कोरोनाचा वेगाने वाढता प्रादुर्भाव पाहता अखेर ही मालिका रद्द केली गेली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
ND V NZ 2nd Test Live: एजाज पटेलचे भारताला तिहेरी धक्के; गिलनंतर पुजारा-विराट शुन्यावर बाद
ऐकावे ते नवलचं! मोबाईल फोनमुळे फलंदाज झाला आऊट, मैदानातील अनोख्या प्रसंगाने वेधले लक्ष
वाढदिवस विशेष: टीम इंडियाची कर्णधार मिताली राजबद्दल ‘या’ खास गोष्टी माहिती आहेत का?