मंगळवारी (दि. 28 मार्च) दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरचा सामना खेळण्यात आला. जोहान्सबर्ग येथे पार पडलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने 7 धावांनी शानदार विजय मिळवला. या विजयासह त्यांनी मालिकाही खिशात घातली. शेवटी त्यांनी 2015मध्ये मालिका जिंकली होती. त्यावेळीही वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीत मालिका नावावर केली होती. दोन्ही संघांमधील ही एकूण पाचवी टी20 मालिका होती. वेस्ट इंडिजने 2 आणि दक्षिण आफ्रिकेनेही दोन मालिका जिंकल्या, तर एक मालिका 1-1ने बरोबरीत सुटली.
तिसऱ्या टी20 सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी वेस्ट इंडिज संघाने 20 षटकात 8 विकेट्स गमावत 220 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघ आव्हानापासून 7 धावा दूर राहिला. त्यांनी यावेळी 20 षटकात 6 विकेट्स गमावत 213 धावा केल्या. अशाप्रकारे 40 षटकात 433 धावा चोपल्या गेल्या.
A thrilling victory for the West Indies in the third T20I has helped them clinch the series 2-1 against South Africa 🙌#SAvWI | 📝 https://t.co/1moH3039YO pic.twitter.com/xSFGoudgjh
— ICC (@ICC) March 28, 2023
विशेष म्हणजे, दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज (South Africa vs West Indies) संघातील दुसऱ्या टी20 सामन्यात धावांचा पाऊस पडला होता. दुसऱ्या सामन्यात एकूण 517 धावा बनल्या होत्या. त्यात वेस्ट इंडिजच्या 258 आणि दक्षिण आफ्रिका संघाने 259 धावा केल्या होत्या.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून फलंदाजी करताना रीझा हेंड्रिक्स याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 44 चेंडूत 83 धावा केल्या. यामध्ये 2 षटकार आणि 11 चौकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त रायली रुसोने 42 आणि कर्णधार एडेन मार्करम याने नाबाद 35 धावा केल्या. तसेच, क्विंटन डी कॉक यानेही 21 धावांचे योगदान दिले. मात्र, तरीही दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभव पत्करावा लागला.
यावेळी वेस्ट इंडिजकडून गोलंदाजी करताना अल्झारी जोसेफ (Alzarri Joseph) याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने यावेळी 4 षटके गोलंदाजी करताना 40 धावा खर्च करत 5 विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्याव्यतिरिक्त जेसन होल्डर यानेही 1 विकेट नावावर केली होती.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजकडून रोमारियो शेफर्ड याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने यावेळी अवघ्या 22 चेंडूत नाबाद 44 धावांची वादळी खेळी साकारली. त्याच्याव्यतिरिक्त निकोलस पूरन याने 41, ब्रेंडन किंग याने 36 आणि रेमन रिफर याने 27 धावा केल्या. इतर एकाही फलंदाजाला 20 धावांचा आकडा पार करता आला नाही. कर्णधार रोवमन पॉवेल (Rovman Powell) याने फक्त 11 धावांचे योगदान दिले. तरीही संघाने चांगले आव्हान उभे करत शेवटी विजय मिळवला.
यावेळी दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजी करताना तीन गोलंदाजांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. त्यात लुंगी एंगिडी, कागिसो रबाडा आणि एन्रीच नॉर्किया यांचा समावेश आहे. यापैकी नॉर्कियाने सर्वात कमी धावा म्हणजेच 36 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. याव्यतिरिक्त कर्णधार एडेन मार्करम याने 1 विकेट नावावर केली.
या मालिकेत वेस्ट इंडिजने पहिला सामना जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली होती. अशात तिसरा सामना वेस्ट इंडिजने जिंकत मालिका 2-1ने खिशात घातली. (south africa vs west indies 3rd t20i 433 runs scored in 40 overs windies win series read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतातील दिग्गज क्रिकेट प्रशिक्षकाला सेक्स स्कँडलमध्ये अटक, क्लिप व्हायरल होताच आत्महत्येचा प्रयत्न
रोहितला वगळून सूर्या बनणार मुंबई इंडियन्सचा कर्णधार? आयपीएल 2023 आधी महत्त्वाचा निर्णय