लखनऊ। भारतीय महिला संघाचा शुक्रवारी (१२ मार्च) दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्ध तिसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिका महिला संघाने डकवर्थ लूईस नियमानुसार ६ धावांनी विजय मिळवत ५ सामन्यांच्या वनडे मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्या भारतीय माहिला संघाने दक्षिण आफ्रिका संघाला २४९ धावांचे आव्हान दिले होते. मात्र या आव्हानाचा पाठलाग करत असताना दक्षिण आफ्रिकेने ४६.३ षटकात ४ बाद २२३ धावा केलेल्या असतानाच पाऊस सुरु झाला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला डकवर्थ लूईस नियमानुसार विजयी घोषित करण्यात आले.
दक्षिण आफ्रिकेकडून फलंदाजी करताना या सामन्यात लिझेल लीने शानदार शतकी खेळी केली. तिने १३१ चेंडूत १६ चौकार आणि २ षटकारांसह १३२ धावा केल्या. तिनेच दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा पाया रचला. तिच्यापाठोपाठ मिगनॉन डू प्रीझने ३७ धावांची खेळी केली. तर लॉरा वोल्वार्ड (१२), लारा गुडऑल (१६) आणि अॅनी बॉश (नाबाद १६) यांनी छोटेखानी खेळी केल्या.
भारताकडून झुलन गोस्वामीने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तर राजेश्वरी गायकवाड आणि दिप्ती शर्माने प्रत्येकी १ विकेट घेतली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताकडून पुनम राऊतने सर्वाधिक ७७ धावांची खेळी केली. तिच्याशिवाय मिताली राज, हरमनप्रीत कौर आणि दिप्ती शर्मा यांनी प्रत्येकी ३६ धावांची खेळी केली. तर स्म्रीती मंधनाने २५ धावांची खेळी केली. त्यामुळे भारताला ५० षटकात ५ बाद २४८ धावा करता आल्या. इंग्लंडकडून गोलंदाजी करताना शबनम इस्माईनने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तर मेरीझॅन कॅप टूमी सेखूखून आणि बॉशने प्रत्येकी १ विकेट घेतली.
मितालीच्या १० हजार धावा
या सामन्यादरम्यान मिताली राजने मोठा विक्रम केला आहे. मितालीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील १०००० धावांचा टप्पा पार केला आहे. आजवर वनडे क्रिकेटमध्ये तिने २१२ सामने खेळताना ५०.६४ च्या सरासरीने ६९७४ धावा केल्या आहेत. तर ८९ टी२० सामन्यात २३६४ धावा आणि १० कसोटी सामन्यात ६६३ धावा नोंदवल्या आहेत. अशाप्रकारे तिन्ही स्वरुपात मिळून तिने एकूण १०००१ धावा कुटल्या आहेत.
त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा आकडा गाठणारी मिताली जगातील दुसरी आणि भारतातील पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
अर्धवट नशेत असताना हर्षल गिब्जने दक्षिण आफ्रिकेला वनडे मिळवून दिला होता अविस्मरणीय विजय
आयपीएल २०२१ : ‘हा’ फलंदाज म्हणतो मला चेन्नई सुपर किंग्सकडून करायची आहे सलामीला फलंदाजी
“सचिनच्या ‘त्या’ सल्ल्यामुळे झालो सलामीवीर”, सौरव गांगुलीने उलगडला किस्सा