मंगळवारी (दि. 4 ऑक्टोबर) इंदोर येथे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील तिसरा टी20 सामना पार पडला. तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील हा शेवटचा सामना दक्षिण आफ्रिकेने 49 धावांनी जिंकला. पहिल्या दोन सामन्यात भारताकडून पराभूत झाल्यानंतर पाहुण्या संघाने तिसऱ्या सामन्यात दमदार पुनरागमन केले. या सामन्यात पाहुण्या संघाच्या फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी आपला जलवा दाखवत भारतीय संघाला पराभवाचं पाणी पाजलं. दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा शिल्पकार रायली रूसो ठरला. मात्र, ही मालिका भारतानेच आपल्या नावावर केली. भारताने ही मालिका 2-1 ने खिशात घातली.
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निर्णय घेतला होता. तसेच, दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी फलंदाजीला उतरलेल्या पाहुण्या संघाने निर्धारित 20 षटकात 3 विकेट्स गमावत 227 धावा चोपल्या आणि भारतापुढे 228 धावांचे आव्हान ठेवले. हे आव्हान पार करण्यास भारतीय संघ अपयशी ठरला. भारताला 18.3 षटकात सर्वबाद 178 धावाच करता आल्या.
https://twitter.com/BCCI/status/1577345132189388802
भारताकडून फलंदाजी करताना विस्फोटक फलंदाज दिनेश कार्तिक यालाच 40 धावांचा आकडा पार करण्यात यश आले. त्याने 21 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 46 धावा चोपल्या. त्याच्याव्यतिरिक्त दीपक चाहर याने 16 चेंडूत 31 धावांचे योगदान दिले. यामध्ये 2 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. तसेच, रिषभ पंत, हर्षल पटेल आणि उमेश यादव यांनाच दोन आकडी धावसंख्या करता आली. इतर 5 फलंदाजांना दोन आकडी धावसंख्या गाठण्यात अपयश आले.
यावेळी दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजी करताना ड्वेन प्रिटोरियस याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 3.3 षटके गोलंदाजी करताना 26 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तसेच, वेन पार्नेल, लुंगी एन्गिडी आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. याव्यतिरिक्त कागिसो रबाडा याला 1 विकेट घेण्यात यश आले.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेकडून रायली रूसो याने कहर केला. त्याने 48 चेंडूत नाबाद 100 धावांची शतकी खेळी केली. यामध्ये 7 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉक याने 43 चेंडूत 68 धावांची खेळी केली. दुसरीकडे, ट्रिस्टन स्टब्स (23 धावा) आणि डेविड मिलर (19 धावा) यांनीही खारीचा वाटा उचलला. कर्णधार टेम्बा बावुमा (Temba Bavuma) फक्त 3 धावा करून बाद झाला. मात्र, त्यानंतरच्या फलंदाजांनी चोपलेल्या धावांमुळे संघावर काही परिणाम झाला नाही.
यावेळी भारताकडून गोलंदाजी करताना दीपक चाहर आणि उमेश यादव यांना प्रत्येकी 1 विकेट घेण्यात यश आले.
यानंतर आता भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 6 ऑक्टोबर रोजी लखनऊ येथे खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जा माफ केलं! संधी असतानाही चाहरने दाखवला मनाचा मोठेपणा, आफ्रिकन फलंदाजाला दिले जीवदान
रोहित शर्माचा शर्मनाक रेकॉर्ड, भल्याभल्यांना मागे टाकत ‘या’ लाजीरवाण्या यादीत भाऊ पहिल्या स्थानी






