भारत दौऱ्यावरुन आता दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ बुधवारी मायदेशी परतला आहे. पण सध्या कोरोना व्हायरसमुळे माजलेला हाहाकार पाहता त्यांना १४ दिवस स्वत:ला वेगळे ठेवावे (self-isolate) लागणार आहे.
याबद्दल स्पोर्ट्स २४ च्या वृत्तानुसार दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी शोएब मांजरा यांनी सांगितले की ‘आम्ही सर्व खेळाडूंना कमीत कमी १४ दिवस इतरांपासून लांब रहाण्यास आणि स्वत:ला वेगळे ठेवण्यास सुचवले आहे. मला वाटते की त्यांच्या स्वतःचे, आजूबाजूच्या लोकांचे, त्यांच्या कुटुंबाचे आणि त्यांच्या समुदायाचे संरक्षण करण्यासाठी हाच योग्य मार्ग आहे.’
‘या कालावधीत कोणालाही कोणत्याही प्रकारचे लक्षणे दिसली तर आम्ही खात्री करुन घेऊ की त्यांची योग्य तपासणी केली जाईल आणि त्यानुसार त्या ठिकाणी असलेल्या प्रोटोकॉलद्वारे त्याचे व्यवस्थापन केले जाईल.’
याबरोबरच मांजरा यांनी सांगितले की खेळाडूंना कोरोना व्हायरसमुळे होत असलेल्या कोव्हिड-१९ या आजाराविषयी पूर्ण माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार त्यांना सतर्क रहाण्यासही सांगण्यात आले आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर ३ वनडे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आला होता. मात्र या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर पुढील दोन्ही सामने कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेऊन रद्द करण्यात आले. यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ कोलकाता, दुबई मार्गे मंगळवारी दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना झाला होता.
ट्रेडिंग घडामोडी-
-कोरोनापासून वाचण्यासाठी टीम दक्षिण आफ्रिकेच्या प्रशिक्षकांचे अजब उपाय
– पाकिस्तानचा एकही खेळाडू टीम इंडियात खेळण्याच्या नाही लायक
– तर विश्वचषकाची सेमीफायनलच ठरु शकते धोनीचा अंतिम सामना