लॉस एंजेलिस स्टेडियमवर स्पेन आणि बेल्जियम यांच्यात झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात फिफा विश्वचषक 2026 च्या उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या दुसऱ्या संघाचे नाव निश्चित झाले. स्पेनने बेल्जियमचा 2-1 असा पराभव करून उपांत्य फेरीत दमदार प्रवेश केला. आता अंतिम फेरीतील स्थानासाठी स्पेनचा सामना फ्रान्सशी होणार आहे.
बेल्जियमविरुद्धचा हा सामना स्पेनसाठी अजिबात सोपा नव्हता. दोन्ही संघांमध्ये शेवटपर्यंत अटीतटीची लढत पाहायला मिळाली. मात्र, सामन्याच्या अंतिम क्षणांत मिकेल मेरिनो याने केलेल्या निर्णायक गोलमुळे स्पेनचा विजय आणि उपांत्य फेरीतील स्थान निश्चित झाले.
फुटबॉल चाहत्यांचे लक्ष या उपांत्यपूर्व सामन्याकडे लागले होते. दोन्ही संघांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला.
स्पेनसाठी फॅबियन रुईझने 30व्या मिनिटाला शानदार गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. या स्पर्धेत याआधी कोणत्याही संघाला स्पेनविरुद्ध गोल करता आला नव्हता, त्यामुळे बेल्जियमवरील दडपण वाढले.
मात्र, बेल्जियमच्या चार्ल्स डी केटेलेरेने 41व्या मिनिटाला उत्कृष्ट हेडरद्वारे गोल करत सामना 1-1 असा बरोबरीत आणला. या गोलमुळे स्पेनचा गोलकीपर उनाई सिमॉनचा सलग 560 मिनिटे गोल न स्वीकारण्याचा विक्रमही खंडित झाला.
पहिला हाफ 1-1 अशा बरोबरीत संपल्यानंतर, दुसऱ्या हाफमध्ये 87व्या मिनिटापर्यंत एकाही संघाला गोल करता आला नाही. यामुळे सामना पेनल्टी शूटआउटकडे झुकत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, 88व्या मिनिटाला मिकेल मेरिनोने गोलपोस्टजवळ मिळालेल्या संधीचा फायदा घेत एक जोरदार शॉट लगावला आणि चेंडू थेट जाळीत गेला. हा गोल अखेरीस निर्णायक ठरला.
सामना संपेपर्यंत स्पेनने आपली 2-1 अशी आघाडी कायम राखली, विजय निश्चित केला आणि उपांत्य फेरीत धडक मारली.
उपांत्य फेरीत स्पेनचा सामना मागील विश्वचषकातील उपविजेत्या फ्रान्सशी होणार आहे. हा सामना 15 जुलै रोजी मध्यरात्री 12.30 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) खेळवला जाणार आहे.






