स्पेनचा विक्रमी गोलवीर डेविड व्हिला याला तीन वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर आपल्या राष्ट्रीय संघात संधी मिळाली आहे. त्याच्या नावाचा समावेश शनिवारी होणाऱ्या इटली विरुद्धच्या विश्वचषक पात्रता फेरीच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत आहे.
३५ वर्षीय डेविड व्हिला बार्सेलोना, अथेलेटिको माद्रिद आणि वेलेंसियाचा माजी स्ट्रायकर आहे. सध्या न्यू यॉर्क सिटी एफ.सी.चा कर्णधार आणि मुख्य खेळाडू म्हणून तो खेळत आहे. या संघासाठी करत असलेल्या उत्तम खेळामुळे त्याला परत संघात बोलावणे आले आहे.
डेविड व्हिला हा स्पेनचा आजपर्यंतचा सर्वात यशस्वी स्ट्रायकर आहे. स्पेनसाठी ५० गोल करणारा हा पहिला खेळाडू आहे. स्पेनसाठी सर्वाधिक गोल करण्याचा विक्रमही व्हिलाच्याच नावे आहे. त्याने स्पेनसाठी खेळताना ५९ गोल केले आहेत.
आंतरराष्ट्रीय स्थरावर त्याने २००५ साली स्पेनसाठी पदार्पण केले होते. चार मोठ्या स्पर्धेत स्पेनचे नेतृत्व करताना व्हिलाने २००८ मध्ये युरो कप आणि २०१० मध्ये विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची कामगिरी केली होती. या दोन्ही स्पर्धेत तो टॉप स्कोरर होता.
सहा लीगमध्ये खेळण्याचा अनुभव असणाऱ्या व्हिलाने संघात सामील करून घेतल्यानंतर झालेल्या मुलाखतीत पुनरागमनाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. मागील तीन वर्षाचा बिकट काळ विसरून तो नव्याने सुरवात करणार आहे.