आयपीएलच्या तेराव्या हंगामात साखळी फेरीत अव्वल राहिलेले दोन्ही संघ म्हणजेच मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांनी अपेक्षेप्रमाणे स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. गेल्या तेरा वर्षात मुंबई सहाव्यांदा तर दिल्ली प्रथमच आयपीएलची अंतिम फेरी खेळणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने आपल्या सांघिक कामगिरीच्या बळावर अंतिम फेरीचा हा प्रवास पूर्ण केलेला दिसून येतो. फलंदाजीत शिखर धवन तर गोलंदाजीत अनुभवी रविचंद्रन आश्विन आणि दक्षिण आफ्रिकेची वेगवान दुकली कागिसो रबाडा व एन्रीच नॉर्किए यशस्वी ठरली आहे. या चार खेळाडूं व्यतिरिक्त एका अष्टपैलू खेळाडूने संघाच्या या प्रवासात सिंहाचा वाटा उचललेला आहे. २०१५ नंतर दिल्लीकडून खेळताना दिल्लीसाठी ‘दबंग’ कामगिरी करणारा हा अष्टपैलू आहे; ऑस्ट्रेलियाचा मार्कस स्टॉयनिस.
वेस्टर्न ऑस्ट्रेलियन दिग्गजांच्या परंपरेतला खेळाडू
मार्कसचा जन्म ऑस्ट्रेलियातील पर्थ या शहरात झाला. पर्थ शहर ज्या वेस्टर्न ऑस्ट्रेलिया राज्यात येते; त्या वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाने ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघासाठी अनेक दिग्गज खेळाडू दिले आहेत. किम ह्यूज, डेनिस लिली, हसी बंधू, मार्श पिता-पुत्र या सर्वांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक वेगळी ओळख आहे. याच खेळाडूंची परंपरा मार्कस अगदी कमी वयापासून पुढे नेत होता. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या सतरा वर्षाखालील आणि एकोणीस वर्षाखालील संघात त्याचा समावेश होता. मलेशियात झालेल्या २००८ एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात त्याने ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले. या संघात स्टीव्ह स्मिथ, जेम्स फॉकनर, जेम्स पॅटिन्सन, जोश हेजलवुड या पुढे जाऊन, ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडूंचा समावेश होता.
युवा विश्वचषकानंतर तो वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या तेवीस वर्षाखालील संघाकडून फ्युचर कपमध्ये खेळला. २००८-२००९ च्या देशांतर्गत हंगामात त्याने क्वींसलँड विरुद्ध आपले प्रथमश्रेणी व लिस्ट ए पदार्पण केले. मार्कस वेस्टर्न ऑस्ट्रेलियासाठी दोन देशांतर्गत हंगाम खेळला. मार्कसने वेस्टर्न ऑस्ट्रेलियन ग्रेड क्रिकेट स्पर्धेत स्कार्बोरो आणि व्हिक्टोरियन प्रीमियर क्रिकेटमधील नॉर्थकोटसाठी क्लब क्रिकेट खेळले. २०१२ साली इंग्लंडमध्ये जाऊन तो काही काळ, नॉर्थहेम्प्टन प्रीमियर लीगमधील पीटरबरो टाऊन क्रिकेट क्लबकडून खेळला. त्या स्पर्धेत त्याने एका सामन्यात हॅटट्रिक घेण्याची किमया केली. इंग्लंडमध्ये असताना केंट काउंटी क्रिकेट क्लबच्या दुय्यम संघाकडून मार्कसने पाच चँपियनशिप सामनेही खेळले.
गृहराज्य संघ सोडण्याचा निर्णय ठरला ‘टर्निंग पॉईंट’
मार्कसने व्हिक्टोरियन प्रीमियर लीगमध्ये नॉर्थकोटसाठी खेळण्याचा निर्णय घेतला तेव्हा, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाने त्याच्या सोबतचा करार संपुष्टात आणला. मात्र, मार्कसचा हा निर्णय कमालीचा यशस्वी ठरला. कारण, २०१३-२०१४ च्या हंगामात नॉर्थकोटकडून खेळताना त्याने १०० पेक्षा जास्तच्या सरासरीने धावा कुटल्या. यात चार शतकांचा समावेश होता. मार्कसच्या या कामगिरीने विक्टोरिया संघाचे निवडकर्ते अत्यंत प्रभावित झाले. त्यांनी मार्कससमोर विक्टोरियाकडून प्रथमश्रेणी क्रिकेट खेळण्याचा प्रस्ताव ठेवला. मार्कसने २०१२-२०१३ हंगामापासून विक्टोरिया राज्याचे प्रतिनिधित्व करण्यास सुरुवात केली. विक्टोरियाकडून पहिल्याच हंगामात त्याने दहा सामन्यात ४९ च्या सरासरीने ७८५ धावा आपल्या नावे केल्या.
एका षटकात सहा षटकार खेचण्याचादेखील केलाय पराक्रम
जुलै २०१५ मध्ये एका प्रदर्शनीय सामन्यात त्याने ब्रेंडन स्मिथच्या एकाच षटकात सलग सहा षटकार खेचण्याचा पराक्रम केला. ब्रिस्बेनच्या मैदानावर झालेला हा सामना अधिकृत नसल्याने मार्कसचा हा पराक्रम रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवला गेला नाही. नेपाळ विरुद्ध वर्ल्ड इलेव्हनदरम्यान झालेल्या मदतनिधी सामन्यात मार्कसला श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्याबरोबर डावाची सुरुवात करण्याची संधी मिळाली. या टी२० सामन्यात त्याने २९ चेंडूत ४८ धावा त्याने फटकावल्या.
आंतरराष्ट्रीय कारकीर्द
देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत असल्याने २०१५ मध्ये इंग्लंड विरुद्ध टी२० मालिकेसाठी त्याला सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाच्या संघात निवडण्यात आले. त्याच मालिकेत त्याने आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. पाठोपाठ, तो एकदिवसीय संघाचा भाग देखील बनला. २०१७ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने, १४६ धावांची तुफानी खेळी केली. २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने त्याला वार्षिक करारात स्थान दिले. मार्कसची कामगिरी संमिश्र होती तरी, तो इंग्लंडमध्ये झालेल्या २०१९ क्रिकेट विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात स्थान मिळवण्यात यशस्वी झाला. मार्कसने अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळताना ७ बळी व ८७ धावांचे योगदान दिले.
मार्कस आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियासाठी ४४ एकदिवसीय सामने खेळला आहे. ज्यात तो १,१०६ धावा आणि ३३ बळी मिळविण्यात यशस्वी ठरला. २२ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात २२० धावा व ९ बळी त्याने मिळवले आहेत. मार्कसची २०१५ पासून तीन वेळा ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात निवड झाली. मात्र, तो अजूनही अंतिम अकरा खेळाडूंमध्ये स्थान मिळविण्यात अपयशी ठरला आहे.
बिग बॅश लीगमध्ये दोन वर्षापासून घालतोय धुमाकूळ
मार्कसला २०१२ ला दुखापतग्रस्त मिचेल मार्शचा बदली खेळाडू म्हणून पर्थ स्कॉर्चर्स संघाने करारबद्ध केले. मार्कस त्यावर्षी पहिल्यांदा बिग बॅश लीगमध्ये खेळत होता. तो दोन सामन्यात अवघ्या १० धावा काढू शकला. २०१३ मध्ये तो मेलबन स्टार्ससाठी खेळू लागला. त्या हंगामातील खराब कामगिरीमुळे, पुढील हंगामात त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. २०१६-२०१७ बिग बॅश देखील त्याच्यासाठी विसरण्यासारखी राहिली. सात सामन्यांत ७६ धावा व ३ बळी अशी त्याची कामगिरी होती.
मार्कससाठी २०१८ बिग बॅशपासून अनेक गोष्टी बदलायला सुरुवात झाली. मेलबर्न स्टार्स संघ व्यवस्थापनाने त्याला सलामीला उतरविण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय कमालीचा यशस्वी झाला. मार्कसने ५३.३० च्या लाजवाब सरासरीने ५३३ धावा चोपल्या. सोबतच, गोलंदाजीत १४ बळीही आपल्या नावे केले. डार्सी शॉर्टनंतर स्पर्धेत सर्वाधिक धावा मार्कसच्या नावे होत्या. २०२० बिग बॅशच्या साखळी सामन्यात सिडनी सिक्सर्स विरुद्ध नाबाद १४७ धावा काढून त्याने स्पर्धेतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम नोंदविला. मेलबर्न स्टार्सला स्पर्धेच्या अंतिम फेरीत नेण्यात मार्कसचा मोलाचा वाटा होता.
दिल्ली डेअरडेव्हिल्स ते दिल्ली कॅपिटल्स असा केला आयपीएलचा प्रवास
मार्कस आयपीएलमध्ये सर्वप्रथम २०१५ साली सहभागी झाला. त्यावेळी तो दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा सदस्य होता. संपूर्ण स्पर्धेत त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र, या दीड महिन्याच्या काळात गॅरी कर्स्टन व युवराज सिंह यांच्याकडून बरेच शिकायला मिळाल्याची कबुली त्याने दिली होती. मार्कसला २०१६ आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाब संघाने पाच कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात दाखल करून घेतले. मार्कसने हंगामात ७ सामने खेळताना १४७ धावा व ८ बळी मिळवले. यात एका अर्धशतकाचा समावेश होता. मुंबई इंडियन्सविरुद्ध १५ धावा देऊन ४ बळी घेण्याची त्यांची कामगिरी, पंजाबच्या गोलंदाजांकडून केली गेलेली हंगामातील सर्वोत्कृष्ट कामगिरी होती. २०१७ व २०१८ असे सलग दोन हंगाम तो आयपीएलमध्ये पूर्णतः अपयशी ठरला.
आयपीएल २०१९ पूर्वी किंग्स इलेव्हन पंजाबने मार्कसला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसोबत ट्रेड केले. विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स या दिग्गजांसोबत खेळताना मार्कस आपली म्हणावी तशी छाप पाडू शकला नाही. आरसीबीने त्याला १० सामन्यात संधी दिली. ज्यात तो २११ धावा आणि अवघे दोन बळी मिळू शकला. खराब कामगिरीमुळे २०२० आयपीएल लिलावापूर्वी आरसीबीने त्याला करारमुक्त केले.
आयपीएल २०२० मध्ये बनला दिल्लीचा तारणहार
मार्कस आयपीएल २०२० लिलावाच्या पहिल्या फेरीत विकला गेला नाही. मात्र, दुसऱ्या फेरीत राजस्थान रॉयल्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यात त्याला खरेदी करण्यासाठी बरीच चुरस रंगली. अखेरीस, ४ कोटी ८० लाख रुपयांची बोली लावत दिल्ली कॅपिटल्सने बाजी मारली. मार्कसने दिल्ली व्यवस्थापनाचा निर्णय पूर्णपणे सार्थ ठरवला. आयपीएल २०२० मधील पहिल्याच सामन्यात आक्रमक अर्धशतक झळकावत; त्याने दमदार सुरुवात केली. फलंदाजी आणि गोलंदाजीत तो समान योगदान देत आहे. मार्कसने आत्तापर्यंत स्पर्धेत १६ सामन्यात १४९.२० च्या स्ट्राइक रेटने ३५२ धावा व १२ बळी मिळवले आहेत. ज्यात ४ अर्धशतकांचा समावेश आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये तो सलामीवीर म्हणून मैदानात उतरला. फलंदाजीत ३८ धावा व गोलंदाजी करताना ३ महत्वपूर्ण बळी मिळवून, तो दिल्लीच्या विजयाचा नायक ठरला.
गेली बारा वर्ष एकदाही आयपीएलच्या अंतिम फेरीत न गेलेल्या दिल्लीला या हंगामात अंतिम फेरीत नेण्यात मार्कसचा सिंहाचा वाटा राहिला आहे. स्पर्धेत त्याने आतापर्यंत अशी कामगिरी केली; तशाच कामगिरीची अपेक्षा दिल्लीचे पाठीराखे मार्कसकडून अंतिम सामन्यातही करत आहेत.