---Advertisement---

अर्जुन तेंडूलकरमध्ये प्रतिभा असूनही तो कायम डगआऊटमध्ये का असतो?

On: शुक्रवार, मे 27, 2022 6:45 PM
---Advertisement---

‘दुनिया हिला देंगे’चा नारा देत, आपली सहावी आयपीएल ट्रॉफी जिंकण्याच्या उद्देशानेच, आयपीएल २०२२ च्या रणांगणात उतरलेल्या मुंबई इंडियन्सच्या स्वप्नांचा जबर चुराडा झाला. सलग पहिल्या आठ मॅचेस हरल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. आजवर इतके यश पाहिलेल्या संघाकडून अशी अपेक्षा कोणालाही नव्हती. मात्र झाले गेले गंगेला मिळाले, असं म्हणत त्यांनी नंतर पाचपैकी चार सामने जिंकले. दरम्यान मुंबईने काही नव्या खेळाडूंना संधी दिली, त्यापैकी कोणी यशस्वी ठरल तर कोणी अपयशी. मात्र या साऱ्यात एक खेळाडू बाकावर बसून राहिला. खरंतर तो गेल्या वर्षीही मुंबईच्या संघात होता, तेव्हाही त्याचे पदार्पण झाले नाही आणि आताही. त्याचे नाव अर्जुन सचिन तेंडुलकर. क्रिकेटचा विक्रमादित्य सचिन तेंडुलकरचा मुलगा. स्वतः वडील त्या डग आऊटमध्ये असताना अर्जुनला संधी का मिळत नाही? याचा आढावा या लेखात घेण्यात आला आहे.

वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत, रक्तातच क्रिकेट असल्याने अर्जुनही क्रिकेटर बनला ही बातमी तितकी काही मोठी वाटली नव्हती. या आधी कितीतरी बाप-लेकांनी भारतासाठी क्रिकेट खेळले आहे. त्यामुळे अर्जुन क्रिकेटपटू झाला यात खास असं काहीच नव्हतं. मात्र तो अष्टपैलू झालाय आणि त्यातही वेगवान गोलंदाजी करतोय म्हटल्यावर डोळे लकाकले.

जेव्हा सचिन निवृत्त झाला त्याच्या, सहा महिन्यात अर्जुन मुंबईच्या १४ वर्षांखालील संघाकडून खेळू लागलेला. इतरांपेक्षा अधिकची उंची, डाव्या हाताने वेगवान गोलंदाजी आणि जोडीला तुफान फलंदाजीचे कौशल्य. अर्जुन चर्चेत येऊ लागला. बापाची जागा चालवणार असे म्हटले जाऊ लागले. असे असतानाच अर्जुनला आणि त्याच्या प्रतिभेला ओळख मिळाली ती २०१७ मधल्या एका घटनेने. एमसीसी युथसाठी खेळताना त्याला इंग्लंडच्या सीनियर टीमसोबत सरावाची संधी मिळालेली. तो नेटमध्ये गोलंदाजी करत असताना, फलंदाजीला आला जॉनी बेअरस्टो. एक दोन बॉल सहज टाकले गेले आणि नंतर अर्जुनने एखाद्या मिसाईलप्रमाणे यॉर्कर मारला, थेट बेअरस्टोच्या अंगठ्यावर. बेअरस्टो सरावातूनच बाहेर गेला. तिथेच कळलं कुछ तो बात है अर्जुन में. पुढे भारतीय संघाच्या फलंदाजांना गोलंदाजी करायची संधीही त्याला मिळाली.

२०१८ ला अर्जुन १९ वर्षांखालील भारतीय संघाकडून खेळला, पण काही महिन्यांमुळे त्याची विश्वचषक वारी हुकली. पुढच्या वर्षी मुंबईत मुंबई टी२० लीग ‌नावाची स्पर्धा झाली. तिथे अर्जुन चमकला बॅटनेही आणि चेंडूनेही. प्रतितास १५० किमीचे चेंडू टाकून त्याने साऱ्यांना चकित केले.

२०२१ मध्ये वडिलांप्रमाणेच मुंबईसाठी टॉप लेव्हलचे क्रिकेट खेळण्याचे भाग्य त्याला लाभले. अर्जुनने मुंबईसाठी पदार्पण केले. तेवढ्यात आयपीएलचा लिलाव झाला आणि सचिनच मार्गदर्शक असलेल्या मुंबई इंडियन्सने त्याला २० लाखांच्या मूळ किंमतीमध्ये संघात सामील करून घेतले. हंगाम संपायच्या अगदी काही दिवस आधी तो दुखापतग्रस्त होऊन पदार्पण न करताच बाहेर झाला.

अर्जुन तेंडूलकरमध्ये प्रतिभा असूनही तो कायम डगआऊटमध्ये का असतो?  Arjun Tendulkar | Sachin Tendulkar

यावर्षी पुन्हा त्याला मुंबईनेच खरेदी केले. मुंबई ८ सामने हरल्याने स्पर्धेतून बाहेर झाली आहे. आता संघ व्यवस्थापन पुढच्या वर्षीसाठी युवा खेळाडूंना संधी देणार असे सांगण्यात आले. अर्शद खानच्या जागी आलेल्या कुमार कार्तिकेयला कॅम्प जॉईन करताच सरळ अंतिम एकादशमध्ये घेतले. ट्रिस्टन स्टब्स दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत उतरतोय कुठे नाही की आयपीएल सामना खेळला. ऋतिक शौकीन, डेवाल्ड ब्रेविस, रमनदीप सिंग सारेजण खेळले, फक्त अर्जुन सोडून. अर्जुनचे केवळ नेटमध्ये धारदार यॉर्कर टाकल्याचे व्हिडिओ शेअर केले गेले.

भारतात सहजासहजी सापडत नाही ते, वेगवान गोलंदाजी आणि फटकेबाजी करणारा फलंदाज हे कॉम्बिनेशन अर्जुनकडे आहे. फक्त वडील डगआउटमध्ये आहेत आणि टीका होईल म्हणून अर्जुनला संधी मिळत नसेल तर, त्याच्यासारखा प्रतिभाशाली क्रिकेटरवर हा नक्कीच अन्याय आहे.

अर्जुनसोबत १९ वर्षांखालील क्रिकेट खेळलेले पृथ्वी शॉ, शुबमन गिल, देवदत्त पडीक्कल भारतीय संघामध्ये खेळतात. अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, यशस्वी जयस्वाल भारतीय संघाच्या उंबरठ्यावर आहेत. या साऱ्यात, कदाचित तितकच प्रतिभा असलेला अर्जुन, दोन आयपीएल हंगाम संपले तरी, अजूनही मात्र एका संधीसाठी धडपडतोय.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

वयाच्या छत्तीशीत टीम इंडियात पुनरागमन करणाऱ्या कार्तिकचं अख्तरकडून कौतुक; म्हणाला, ‘पर्सनल गोष्टी…’

भारतीय संघात पुनरागमन केलेल्या दिनेश कार्तिकने गायले पाकिस्तानी कर्णधाराचे गुणगान; म्हणाला, ‘तो एक चांगला…’

Video: फक्त एक स्टंप दिसत असतानाही गोलंदाजाने उडवल्या बेल्स; थ्रो पाहून सर्वजण हैराण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---