क्रिकेटजगतातील दर्जेदार वेगवान गोलंदाजांची ‘फॅक्टरी’ ज्या देशाला म्हणता येईल तो देश म्हणजे ऑस्ट्रेलिया. क्रिकेट इतिहासात आतापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या एकाहून एक सरस वेगवान गोलंदाजांनी आपल्या तुफानी वेगाने इतर देशातील फलंदाजांमध्ये दहशत पसरवलेली दिसून येते. चार्ली टर्नर, डेनिस लिली, जेफ थॉम्पसन यांच्यापासून सुरू झालेली वेगवान गोलंदाजीची परंपरा ग्लेन मॅकग्रा, क्रेग मॅकडरमॉट, जेसन गिलेस्पी, डेमियन फ्लेमिंग यांनी जोपासली. मिचेल जॉन्सन आणि शॉन टेट या दुकलीने वेग काय असतो; याचे सप्रमाण सादरीकरण केले. सध्याच्या ऑस्ट्रेलियन संघातील मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, जोश हेजलवुड या वेगवान गोलंदाजांना जगभरातील सर्वोत्तम गोलंदाजी आक्रमण मानले जाते. क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासातील अस्सल वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेला ब्रेट ली हा देखील ऑस्ट्रेलियन संघाचाच सदस्य. आपल्या काळातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज राहिलेल्या ब्रेट ली आता ४४वर्षांचा झाला आहे.
शेन लीचा भाऊ
लीचा जन्म ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स या राज्यातला. त्याचे वडील हवामान खात्यात नोकरी करायचे; तर, आई पियानो शिक्षिका होती. वयाच्या आठव्या वर्षापासून तो आपला मोठा भाऊ शेन याच्यासोबत क्रिकेटच्या मैदानावर जाऊ लागला. पुढे जाऊन शेनने देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले.तर ब्रेटने अगदी लहानपणापासूनच वेगवान गोलंदाज होण्याचे ठरवले होते.
शोएब अख्तरचा संघसहकारी
लीने लवकरच स्थानिक संघ ओक फ्लॅट्स रॅटच्या ज्युनियर संघात खेळण्यास सुरवात केली आणि चांगल्या कामगिरीमुळे तो एक एक पाऊल पुढे टाकू लागला. ओक फ्लॅट्स रॅटनंतर तो मिडल्टन क्लबसाठी देखील काही काळ खेळला. ऑस्ट्रेलियातील देशांतर्गत क्रिकेटची एक वेगळी रचना आहे. तेथील खेळाडूंना ‘ग्रेड’ स्तरावरील सामने खेळले असतील तरच, पुढील स्तरावर खेळण्याची संधी मिळते. १६ व्या वर्षी त्याने कॅम्पबेलटाउनकडून ‘ग्रेड अ’ क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. कॅम्पबेलटाउनकडून खेळताना त्याने, न्यू साऊथ वेल्सच्या काही प्रमुख फलंदाजांना बाद करत वाहवा मिळवली. मोसमन क्लबसाठी खेळताना तो शोएब अख्तरबरोबर दुसऱ्या बाजूने गोलंदाजी करायचा. त्याच संघात पुढे जाऊन इंग्लंडचा कर्णधार झालेला अँड्र्यू स्ट्रॉस देखील खेळला होता. तेव्हा ब्रेट लीने ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाकडून दिला जाणारा ‘सर डॉन ब्रॅडमन सर्वोत्कृष्ट युवा क्रिकेटपटू पुरस्कार’ त्याने आपल्या नावे केला.
ब्रेटच्या गोलंदाजीची चर्चा ऑस्ट्रेलियन क्रिकेट वर्तुळात होऊ लागली होती. लवकरच त्याला ऑस्ट्रेलियाच्या सतरा वर्षाखालील व पुढे एकोणीस वर्षाखालील संघात स्थान मिळाले. मार्च १९९४ मध्ये पाठीच्या दुखण्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियाच्या एकोणीस वर्षाखालील संघातून बाहेर पडावे लागले. दुखापतीतून सावरण्यासाठी त्याने आपल्या गोलंदाजीची शैली बदलली. १९९५-१९९६ च्या हंगामात एआयएस ऑस्ट्रेलियन क्रिकेट अकादमीमध्ये जाण्यासाठी त्याला शिष्यवृत्ती देण्यात आली. त्याच्यासोबत, जेसन गिलेस्पी आणि माईक हसी या दोघांना देखील ती शिष्यवृत्ती मिळाली होती.
स्टीव्ह वॉला प्रभावित करत केलेले आंतरराष्ट्रीय पदार्पण
ब्रेटने ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठी देशांतर्गत स्पर्धा असलेल्या, शेफील्ड शील्ड स्पर्धेत न्यू साउथ वेल्सचे प्रतिनिधित्व केले. सलग दोन हंगामात त्याची कामगिरी चमकदार राहिली. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार असलेल्या स्टीव वॉ ब्रेटच्या वेगाने खूप प्रभावित झाला. वॉने १९९९ ला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आलेल्या भारताविरुद्ध त्याला कसोटी पदार्पणाची संधी दिली. पहिल्याच डावात त्याने भारताचे पाच फलंदाज तंबूत पाठवले. डेनिस लिली यांच्यानंतर पदार्पणात पाच बळी मिळवणारा तो पहिला गोलंदाज होता. ली तीन आंतरराष्ट्रीय कसोटी मालिका खेळल्यानंतर दुखापतीमुळे संघातून बाहेर झाला.
पुनरागमनानंतर बनला विश्वचषक विजयाचा नायक
दुखापतीमुळे ली जवळपास दीड वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहिला. २००१ च्या ऍशेस मालिकेत त्याने पुनरागमन केले. मात्र, त्यात तो फक्त नऊ बळी येऊ शकला. ब्रेट ली दक्षिण आफ्रिकेत भरलेल्या २००३ विश्वचषकात जबरदस्त कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाला सलग दुसरा विश्वचषक जिंकून देण्यात लीचा मोलाचा वाटा होता. त्याने स्पर्धेत १० सामने खेळताना २२ बळी आपल्या नावे केले. ज्यात, केनिया विरुद्ध घेतलेल्या हॅट्रिकचा समावेश होता. विश्वचषकात हॅट्रिक घेणारा पहिला ऑस्ट्रेलियन गोलंदाज होण्याचा मान त्याला मिळालेला.
‘तो’ विश्वविक्रमी चेंडू
लीने आपल्या कारकीर्दीत अनेकदा १०० मैल प्रतितास या वेगाचे चेंडू टाकले. २००५ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात त्याने १६१.१ किमी प्रतितास इतक्या वेगात चेंडू टाकला. या चेंडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक वेगाचा चेंडू असल्याचे बोलले जायचे.
रिकी पॉंटिंगचा महत्त्वाचा शिलेदार
रिकी पॉंटिंगच्या नेतृत्वात ब्रेट लीच्या गोलंदाजीला विशेष धार आली. २००३ विश्वचषक व २००६ आणि २००९ चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघाचा तो महत्त्वपूर्ण सदस्य होता. २००५ च्या ऍशेजमध्ये २० बळी मिळविण्या सोबतच फलंदाजीत महत्त्वपूर्ण योगदान त्याने दिलेले. शेन वॉर्न व ग्लेन मॅकग्रा निवृत्त झाल्यानंतर, ली ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची विभागाचा प्रमुख बनला. सर्वात अनुभवी गोलंदाजाची जबाबदारी पार पाडत त्याने २००७-२००८ च्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत मालिकावीर पुरस्कार पटकावला. २००८ मध्ये ‘विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर’ व सर्वोत्कृष्ट ऑस्ट्रेलियन खेळाडूसाठी दिले जाणारे ‘ऍलन बॉर्डर मेडल’ त्याने आपल्या नावे केले. ऑस्ट्रेलियाचा संघ संक्रमणाच्या काळातून जात असताना, त्याने ऑस्ट्रेलियासाठी अनेक मॅचविनिंग स्पेल टाकले.
दुखापत आणि निवृत्ती
लीला २००९ ऍशेस दरम्यान घोट्याची दुखापत झाली. त्यामुळे त्याला मालिकेतून बाहेर पडावे लागले. दुखापतीतून सावरल्यानंतर, इतर वेगवान गोलंदाजांसोबत त्याला स्पर्धा करावी लागली. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील कारकीर्द वाढवण्यासाठी २०१० मध्ये त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. ऑस्ट्रेलियाला २०११ विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत नेण्यात लीने प्रमुख भूमिका बजावलेली. त्याने ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक १३ बळी आपल्या नावे केले. लीने जूलै २०१२ मध्ये सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
लीने आपल्या १३ वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत ७१८ बळी मिळवले. त्यापैकी ३१० बळी कसोटीत तर ३८० बळी हे एकदिवसीय क्रिकेटमध्ये घेतले. उर्वरित २८ बळी टी२० सामन्यातील होते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३८० बळी घेताना त्याने आपला सहकारी ग्लेन मॅकग्राची बरोबरी केली.
कोलकात्याला आयपीएल विजेता बनवण्यात निभावली महत्वाची भूमिका
निवृत्तीनंतर तो जगभरात विविध व्यावसायिक टी२० लीगमध्ये खेळताना दिसला. आयपीएलमध्ये त्याने कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्व केले. कोलकत्ताने जिंकलेल्या २०१२ हंगामात तो विजयी संघाचा सदस्य होता. याव्यतिरिक्त, त्याने बिग बॅश लीगमध्ये सिडनी सिक्सर्सचे प्रतिनिधित्व केले.
ब्रेट ली निवृत्तीनंतर, विविध ठिकाणी सातत्याने दिसून येतो. ‘मेक अ विश फाउंडेशन’ च्या माध्यमातून तो लोकांना मदत करत असतो. त्याच सोबत तो एक उत्कृष्ट संगीतकार व संगीताची जाण असलेला व्यक्ती आहे. भारताच्या विख्यात गायिका आशा भोसले यांच्यासमवेत त्यांनी हे गाणेदेखील गायले आहे. या सोबतच तो समालोचकाची भूमिका देखील पार पाडतो.
आपल्यात तुफानी गोलंदाजीने एक काळ गाजवललेला, ‘बिंगा’ या नावाने प्रसिद्ध असलेला व भारतावर जिवापाड प्रेम करणारा, ज्याच्या गोलंदाजी शैलीचे अनेकांनी अनुकरण केले असा, ली सदैव ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजात सामील असेल.