मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंतर फलंदाजी, आकडेवारी आणि प्रसिद्धीच्या मापदंडावर खरा उतरलेला भारतीय क्रिकेटपटू म्हणजे विराट कोहली. तो भारतीय संघाचा कर्णधार असून सध्याच्या घडीला सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक मानला जातो. सध्या अनेक दिग्गज त्याचे कौतुक करताना थकत नाहीत, क्रिकेटप्रेमी त्याचे कव्हर ड्राईव्ह पाहून वेडे होतात, लाखो मुली ज्याला आपला ‘क्रश’ मानतात. त्याने क्रिकेट जगातात आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. त्याच्याच प्रवासाचा घेतलेला हा आढावा.
दिल्लीच्या गल्लीत केली क्रिकेटला सुरुवात
दिल्लीच्या उत्तमनगर भागात विराटचे बालपण गेले. ‘चिकू’ त्याचे लहानपणीचे टोपण नाव. विराटचे वडील वकील तर आई सरोज ही गृहिणी. विराट नऊ वर्षांचा होता तेव्हा त्यांच्या विभागात एक क्रिकेट अकादमी सुरू झाली आणि विराटचे वडील प्रेम यांनी छोट्या विराटला त्या अकादमीत दाखल केले. विराटचा खेळ पाहून त्याच्या शेजाऱ्याने विराटच्या वडिलांना सल्ला दिला की, “वकील साहेब, चिकू इतर मुलांपेक्षा वेगळा आहे. त्याचा खेळ वेगळा आहे. त्याला इथे गल्ली क्रिकेटमध्ये गुंतवू नका. एखाद्या चांगल्या अकादमीत त्याला दाखल करा.” आपल्या पोराचं कौतुक ऐकून प्रेम कोहली यांनी त्याला राजकुमार शर्मा यांच्या अकादमीत पाठवले. त्यावेळी शर्मा हे दिल्लीतील एक प्रसिद्ध प्रशिक्षक मानले जायचे. राजकुमार शर्मा यांनी विराटमधील प्रतिभा अचूक ओळखली आणि त्याच्यावर मेहनत घेऊ लागले. शर्मा यांच्या अकादमी सोबतच तो सुमित डोगरा क्लबसाठी देखील काही सामने खेळला.
विविध वयोगट स्पर्धांमध्ये केली वेगाने प्रगती
राजकुमार शर्मा यांच्या प्रशिक्षणाखाली विराट अत्यंत वेगाने प्रगती करू लागला. २००४ हे वर्ष येता-येता तो दिल्लीच्या सतरा वर्षांखालील क्रिकेट संघात निवडला गेला. त्यावर्षी विजय मर्चंट ट्रॉफीत खेळताना त्याने चार सामन्यांतच ४०० पेक्षा जास्त धावा काढल्या. एकाच डावात २५१ धावांची खेळी देखील त्याच्या बॅटमधून आली. विजय मर्चंट ट्रॉफी त्याने पुन्हा एकदा गाजवली. २००५ ला ७ सामने खेळताना त्याने ८४.११ च्या सरासरीने ७५७ धावा आपल्या नावे केल्या. विराटच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस चढत होता. २००६ मध्ये त्याला पहिल्यांदा भारताच्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट संघात स्थान मिळाले. पाकिस्तान दौऱ्यावर चांगली कामगिरी केल्यानंतर तो भारताच्या संघाचा नियमित सदस्य झाला.
वडिलांच्या निधनानंतर ही त्याने मैदानात उतरत सामना वाचवला
विराटने नोव्हेंबर २००६ मध्ये तमिळनाडू विरुद्ध रणजी सामन्याद्वारे आपले प्रथमश्रेणी पदार्पण केले. विराट लोकांच्या नजरेत तेव्हा आला जेव्हा, कर्नाटक विरुद्ध रणजी सामन्यात खेळत असताना त्याच्या वडिलांचे आकस्मित निधन झाले. एवढा मोठा आघात होऊनही, त्याने रात्री वडिलांचे अंत्यसंस्कार करून सकाळी मैदानात उतरत, ९० धावांची खेळी करून सामना वाचवला. विराटच्या या हिमतीमुळे तेंडुलकरसोबत १९९९ विश्वचषकावेळी घडलेल्या घटनेची आठवण ताजी झाली.
एकोणीस वर्षाखालील क्रिकेट संघाचा विश्वविजयी कर्णधार
‘विराट कोहली’ हे नाव क्रिकेटविश्वात ठळकपणे पुढे आले ते, २००८ मध्ये मलेशियात झालेल्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात. भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी विराटच्या खांद्यावर होती. विराटने पुढे होऊन कर्णधारपदाला साजेशी कामगिरी केली. त्याने ६ सामन्यात २३५ धावा ठोकल्या होत्या. भारताने अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत, विश्वचषक आपल्या नावे केला.
आंतरराष्ट्रीय पदार्पण
विराटने २००८ च्या अखेरीस श्रीलंका दौऱ्यावर एकदिवसीय सामन्यातून आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. २००९ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत युवराज सिंह दुखापतग्रस्त झाल्याने त्याचा बदली खेळाडू म्हणून विराटला संधी मिळाली. पदार्पणाच्या जवळपास एक वर्षानंतर श्रीलंकेविरुद्धच त्याने आपले पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. ईडन गार्डन्सवर आपला वरिष्ठ दिल्लीकर सहकारी गौतम गंभीरसोबत त्याने ३१६ धावांचा यशस्वी पाठलाग भारतीय संघाला करून दिला. अनेक अनुभवी खेळाडूंच्या उपस्थितीतही त्याने भारतीय संघात आपली जागा पक्की केली.
साल २०११ चा क्रिकेट विश्वचषक
सातत्याने चांगल्या खेळी केल्याने विराटला भारतीय उपखंडात होणाऱ्या २०११ क्रिकेट विश्वचषकाच्या भारतीय संघात स्थान मिळाले. बांगलादेश विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शतक झळकावून, विश्वचषक पदार्पणात शतक ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू होण्याचा मान त्याने मिळवला. संपूर्ण विश्वचषकात त्याने अनेक उपयुक्त खेळी केल्या. अंतिम सामन्यात सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग हे दोन्ही सलामीवीर लवकर बाद झाल्यानंतर त्याने गौतम गंभीरसोबत ८३ धावांची भागीदारी करत, भारताला सामन्यात पुनरागमन करून दिले. वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी तो विश्वविजेत्या संघाचा सदस्य बनला होता.
भारतीय संघाचे कर्णधारपद
विश्वचषकानंतर भारतीय संघात बदलाचे वारे वाहू लागले. कसोटीतील सततच्या पराभवाने लक्ष्मण, द्रविड यांनी निवृत्ती घेतली. एकदिवसीय संघात देखील बरेच प्रयोग होत राहिले. याचवेळी, विराटने आपल्या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाचे उपकर्णधारपद कमावले. २०१२ मध्ये तो आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा नियमित कर्णधार झाला. २०१४-२०१५ ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या मध्यात एमएस धोनीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले आणि ती जबाबदारी विराटला मिळाली. विराटच्या नेतृत्वात कसोटी संघाने सलग विजयांचा सपाटा लावला. २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ऐन आधी त्याच्याकडे भारताच्या तीनही प्रकारच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व आले. पहिल्याच महत्त्वाच्या स्पर्धेत भारताने अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला. २०१८-१९ मध्ये ऑस्ट्रेलियात जाऊन, भारतीय संघाने कसोटी मालिकाविजय मिळवला. अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय खेळाडू होण्याचा मान विराटला मिळाला. गेली दोन वर्षे विराटच्या नेतृत्वात भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान आहे.
पुरस्कार आणि आकडेवारी
यादरम्यान, विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आपल्या नावे केले. २०१४ व २०१६ अशा दोन टी२० विश्वचषकात तो सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला होता. २०१७ आणि २०१८ अशी सलग दोन वर्षे त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात्कृष्ट खेळाडूला दिला जाणारा ‘सर गारफील्ड सोबर्स अवॉर्ड’ आपल्या नावे केला. भारत सरकारकडून त्याला अर्जुन अवॉर्ड, पद्मश्री आणि राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच आयसीसीने त्याला २०११ ते २०२० या दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कारही दिला.
विराटने आत्तापर्यंत आपल्या १२ वर्षाच्या आंतररराष्ट्रीय कारकिर्दीत क्रिकेट जगतावर राज्य केले आहे. विराटने ८९ कसोटीत ७,४६३ तर २५१ एकदिवसीय सामन्यात १२,०४० धावा काढताना, तब्बल ७० षटके ठोकली आहेत. सचिन तेंडुलकर व रिकी पॉंटिंगनंतर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके बनवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो तिसऱ्या स्थानी आहे. टी२० क्रिकेटमध्ये देखील त्याने आपला दबदबा निर्माण केला आहे. ८५ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांतून त्याच्या खात्यात २,९२८ धावा जमा आहेत. आयपीएलमध्ये देखील विराटच सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. ५,८७८ धावांसह तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. २०१६ आयपीएल हंगामात त्याने ९७३ धावा करत विक्रम रचला होता.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासातील महान खेळाडूंमध्ये अत्यंत कमी कालावधीत स्थान मिळवलेल्या या भारतीय कर्णधाराकडून क्रिकेट चाहते कायम चमकदार कामगिरीची अपेक्षा बाळगून असतात. विराटदेखील आपल्याकडून असलेल्या अपेक्षा कायम पूर्ण करताना दिसला आहे.