आयपीएल २०२२साठीचा मेगा ऑक्शन १२-१३ फेब्रुवारीला पार पडला. अनेक आंतरराष्ट्रीय स्टार्ससह युवा खेळाडूंना कोट्यवधींची बोली लागली. जितके विकले गेले त्याच्या चार-पाच पट जणांना निराश होत अनसोल्ड रहावे लागले. त्यापैकीच एक होता रजत पाटीदार. गेल्या वर्षी आरसीबीसाठी खेळल्यानंतर त्याच्यावर यावर्षी कोणीही बोली लावली नाही. रजत प्रॅक्टिस करत राहिला. अशात बातमी आली की, आरसीबीचा विकेटकीपर लवनीथ सिसोदिया जखमी होऊन स्पर्धेबाहेर गेला. त्याच्या जागी पर्याय कोण येणार? याची सर्वांना उत्सुकता होती.
आरसीबीने आपल्या गेल्यावर्षीचा पठ्ठ्या रजतला पुन्हा बोलावणे धाडले. अनुज रावत सातत्याने अपयशी होत त्याला बाहेर बसवत रजतला संधी देण्यात आली. मागील वेळी आलेले अपयश यावेळी विसरून, रजतने संधीचे अक्षरश: सोने केले. गरज पडेल तेव्हा खेळत राहिला. शेवटच्या साखळी फेरी सामन्यामध्ये विराट कोहलीवर दबाव असताना रजतने काऊंटर अटॅक केला.
काहीशा नशिबाच्या जोरावर आरसीबी प्ले ऑफपर्यंत पोहोचली. मात्र, इथे नशीब नव्हेतर स्वतःची किस्मत स्वतःच्या हाताने लिहायची जबाबदारी घेतली रजत पाटीदारने. नाव रजत असले तरी, सोन्यासारखी इनिंग त्याने एलिमिनेटरमध्ये खेळली, नॉट आउट ११२. आयपीएल इतिहासात प्ले ऑफमध्ये शतक ठोकणारा पहिला अनकॅप्ड प्लेयर होण्याचा मान रजतला मिळाला. आरसीबी सामना जिंकली. पण चर्चा होती फक्त रजत पाटीदारचीच. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग यांना राहवलं नाही आणि त्यांनी त्याचे ट्विट करून कौतुक केले. आज ज्याच्या-त्याच्या तोंडी रजतचे नाव आहे. मात्र, त्याचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नाही.
मध्य प्रदेशच्या इंदोर शहराला क्रिकेटची मोठी परंपरा. भारताचे पहिले कॅप्टन कर्नल सी के नायडू, सय्यद मुश्ताक अली यांच्यापासून आजचे व्यंकटेश अय्यर, आवेश खान हे सारे इंदोरवासिय. त्याच इंदोरचा रजत पाटीदार. रजतची फॅमिली एकदम बिझनेस बॅकग्राऊंड असलेली. त्यांचा पाईप बनवण्याचा उद्योग. वडिलांची इच्छा होती की रजतने आपला फॅमिली बिझनेस सांभाळावा. मात्र, आजोबा पक्के क्रिकेटप्रेमी. नातवाला क्रिकेटर बनवायचं असं त्यांनी ठरवलं. त्याला अकॅडमीत दाखल केल. रजत सुरुवातीला फास्ट बॉलर म्हणून खेळू लागला. १५ वर्षापर्यंत फास्ट बॉलिंग करून कुठेच निवड होईल ना म्हणून, त्यांना स्पिनर व्हायचं ठरवलं. तरीही कुठेच चान्स मिळत नव्हता.
मग पुन्हा रोल चेंज केला आणि फलंदाज बनला. आता फलंदाज म्हणून चांगले प्रदर्शन करायला सुरुवात केली आणि २०१४ मध्ये फुटबॉल खेळताना गुडघ्याची दुखापत झाली. आठ महिने त्याला क्रिकेटपासून दूर राहावे लागणार होते. घरचे म्हणू लागले, “आता क्रिकेट सोड, डिग्री पूर्ण कर आणि आपला बिझनेस चालव”. मात्र, त्याने क्रिकेटर व्हायचं मनाशी पक्कं केलेलं. त्याने चेतेश्वर पुजारापासून प्रेरणा घेतली. पुजाराने दोन्ही गुडघ्यांचे ऑपरेशन झाले असतानाही, क्रिकेटविश्वात आपली ओळख निर्माण केलीय, आणि आपणही तसे करू असा त्याला विश्वास होता.
यानंतर त्याच्या क्रिकेट करियरला नवी दिशा मिळू लागली. या साऱ्यात त्याला सर्वात मोलाची मदत झाली ती, माजी इंडियन क्रिकेटर अमेय खुरासियांची. त्यांनी त्याला ‘तू करू शकतोस, असा कॉन्फिडन्स दिला. प्रचंड मेहनत घेत रजतने २०१५ मध्ये रणजी डेब्यू केला. डेब्यू संस्मरणीय बनवत शतक ठोकले. रजत आता मागे वळून पाहण्यास तयार नव्हता. आयपीएलमध्ये अनेक सहकाऱ्यांचे सिलेक्शन होत होते. पण त्याचा फोकस फक्त चांगलं खेळण्यावर होता. अखेर २०२१ मध्ये केकेआरने त्याला ट्रायलसाठी बोलावले. ट्रायल केकेआरने घेतली तरी, बोली लावली आरसीबीने. त्याला चार मॅच खेळायलाही मिळाल्या. पण त्याचा स्वतःचाच खेळ चांगला झाला नाही असे त्याने कबूल केले. मात्र, यावर्षी नशिबाने संधी मिळाल्यावर, मेहनतीने ती त्याने पकडलीच.
एलिमिनेटरमध्ये नाबाद शतक मारल्यानंतर सारेच त्याचे कौतुक करतायेत. मध्य प्रदेशचा माजी कर्णधार ईश्वर पांडे म्हणतोय, “लोकांना हा रजत पहिल्यांदा दिसला असला तरी, आम्हाला त्याची सवय आहे. तो आमच्या टीमचा हनुमान आहे, जो नेहमी संघाला संकटातून बाहेर काढत आलाय.” असा हा मध्य प्रदेशचा हनुमान आरसीबीसाठी संकटमोचक बनून आला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘मुंबई संघात निवड होणे वेगळे आणि…’, अर्जुनला एकही सामना न खेळण्याबाबत प्रशिक्षकाचे मोठे भाष्य
पदार्पणातील पहिल्याच षटकात केन विलियम्सनची विकेट काढणारा मॅथ्यू पॉट्स नक्की आहे तरी कोण?
कौतुक करावे तितके कमीच! बेन स्टोक्स ‘थोर्प’ नावाची जर्सी घालून उतरला मैदानात, कारण अभिमानास्पद