वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा महाकुंभमेळा यावेळी भारतात खेळला जाणार आहे. स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेसाठी 10 संघांचे दिग्गज फलंदाज विक्रमांचे मनोरे रचण्यासाठी सज्ज झाले आहेत. या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारतीय संघ प्रबळ दावेदार मानला जात आहे. यामागील कारण म्हणजे भारताचे जबरदस्त फॉर्ममध्ये असलेले खेळाडू. अशात आपण विश्वचषकाला सुरुवात होण्यापूर्वी विराट कोहली याच्या विश्वचषकातील कामगिरीविषयी जाणून घेऊयात…
किती विश्वचषक खेळला विराट?
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याने भारतीय संघाकडून आतापर्यंत 3 विश्वचषक (World Cup) खेळले आहेत. त्यातील सर्वात पहिला विश्वचषक 2011 (World Cup 2011) सालचा होता. हाच तो विश्वचषक, ज्यात भारताने एमएस धोनी याच्या नेतृत्वाखाली 28 वर्षांनंतर दुसऱ्यांदा वनडे विश्वचषक आपल्या नावावर केला होता. यानंतर विराट 2015च्या विश्वचषकातही भारतीय संघाचा भाग होता. तसेच, विश्वचषक 2019 हा विराटचा तिसरा विश्वचषक होता.
विराटची विश्वचषकातील कामगिरी
‘चीकू’, ‘किंग कोहली’, ‘रनमशीन’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहलीची तिन्ही विश्वचषकातील कामगिरी पाहायची झाली, तर त्याने 26 सामने खेळताना 46.81च्या सरासरीने एकूण 1030 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 शतके आणि 6 अर्धशतकांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, तो विश्वचषकात 1000 हून अधिक धावा करणारा तिसरा भारतीयही आहे. त्याच्यापूर्वी सचिन तेंडुलकर (2278) आणि सौरव गांगुली (1006) यांनीही विश्वचषकात 1000हून अधिक धावा केल्या होत्या.
विराटची प्रत्येक विश्वचषकातील कामगिरी पाहायची झाली, तर त्याने 2011च्या विश्वचषकात 9 सामने खेळताना 35.25च्या सरासरीने 282 धावा केल्या होत्या. यामध्ये 1 शतकाचाही समावेश आहे. त्याने यादरम्यान 3 झेलही पकडले होते. त्यानंतर 2015च्या विश्वचषकात विराटने 8 सामने खेळताना 50.83च्या सरासरीने 305 धावांचा पाऊस पाडला होता. यामध्ये 1 शतकाचाही समावेश आहे. या विश्वचषकात त्याने 5 झेल पकडले होते. याव्यतिरिक्त मागील म्हणजेच 2019च्या विश्वचषकात 9 सामने खेळताना 55.37च्या सरासरीने 443 धावा केल्या होत्या. यामध्ये 6 झेलही पकडले होते.
सध्याचा परफॉर्मन्स
विराट कोहली याच्या सध्याच्या परफॉर्मन्सबद्दल बोलायचं झालं, तर तो शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याने नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक 2023 स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली होती. त्याने एकूण 5 सामन्यांतील 3 डावात फलंदाजी करताना 64.50च्या सरासरीने 129 धावा कुटल्या होत्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून पाकिस्तानविरुद्ध शतकही निघाले होते. त्याने नाबाद 122 धावांची शतकी खेळी साकारली होती.
विराटची वनडे कारकीर्द
विराट कोहली याच्या वनडे कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर 34 वर्षीय फलंदाजाने आतापर्यंत 280 वनडे सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 268 डावांमध्ये फलंदाजी करताना 57.38च्या सरासरीने 13027 धावा कुटल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 47 शतकेही निघाली आहेत. तसेच, त्याच्या नावावर 65 अर्धशतकांचीही नोंद आहे. यादरम्यान त्याची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या ही 183 इतकी आहे. (Special Story About Virat Kohli World Cup Records And Performance)
हेही वाचाच-
बिग ब्रेकिंग! विश्वचषकासाठी पाकिस्तान संघाची घोषणा, हुकमी एक्का बाहेर; 15 महिन्यांनंतर ‘या’ धुरंधराचे कमबॅक
पाहावं ते नवलंच! Umpireच्या अंगात संचारला John Cena, त्याच्याच स्टाईलमध्ये फेटाळली गोलंदाजाची अपील- Video