आयपीएल… जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग. भारतात आयोजित होणाऱ्या स्पर्धेत खेळण्याचे जगभरातील क्रिकेटपटूंचे स्वप्न असते. काहीजण आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करून या स्पर्धेशी जोडले जातात तर, काही एकदम गुमनामीच्या अंधारातून बाहेर येत जगभरात आपल्या नावाचा डंका वाजवतात. काहींना या स्पर्धेतून प्रसिद्धी, पैसा, प्रतिष्ठा हे सर्व काही मिळते तर, काहींच्या वाट्याला येते हेटाळणी नव्या भाषेत सांगायचे झाले तर ट्रोलिंग.
एक प्रकारे खेळाडूंना त्यांच्या कामगिरीवरून चिडवले जाते. काहीतरी विनोदी वाक्य अथवा मजेशीर छायाचित्र बनवून ते प्रसिद्ध केले जाते. आयपीएलचा आतापर्यंतचा इतिहास काढला तर, या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक ट्रोलिंग कोणाच्या वाट्याला आली असेल तर, क्रिकेटप्रेमी एक नाव एकमुखाने घेतील ते नाव म्हणजे अशोक दिंडा. दिंडा महागडी गोलंदाजी करतो असा ठपका त्याच्यावर ठेवला गेला. मात्र, याच दिंडाची आयपीएलमध्ये एन्ट्री कशी झाली याचा किस्सा खरतर ऐकण्यासारखा आहे.
आंतरराष्ट्रीय सितार्यांनी भरलेला केकेआर
सन २००८ मध्ये पहिल्या आयपीएलचा घाट घातला गेला. बॉलिवूडचा सुपरस्टार किंग खान याने कोलकातास्थित फ्रॅंचाईजी विकत घेतली. त्या फ्रॅंचाईजीचे त्याने कोलकाता नाईट रायडर्स असे नामकरण केले. लिलावाआधी ऑस्ट्रेलियाला तीन वेळा विश्वचषक जिंकून देणाऱ्या जॉन बुकानन यांना प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले गेले. संघाचा आयकॉन खेळाडू व कर्णधार होता ‘प्रिन्स ऑफ कोलकाता’ सौरव गांगुली.
लिलावात बुकानन यांच्या नेतृत्वात संघ व्यवस्थापनाने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉंटिंग, वेस्ट इंडीजचा ख्रिस गेल, न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅकलम व पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांच्यासारखे एकाहून एक सरस आंतरराष्ट्रीय सितारे आपल्या संघात सामील करून घेतले. भारतीय संघासाठी नुकताच ऑस्ट्रेलिया दौरा गाजवून आलेला युवा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा, अजित आगरकर, मुरली कार्तिक व आकाश चोप्रा हे भारतीय संघासाठी खेळलेले खेळाडू होते. प्रसिद्धीच्या बाबतीत त्यावेळी केकेआरचा हात कोणीच धरू शकत नव्हते.
नेट बॉलर म्हणून बोलावले शिबिरात आणि…
त्यावेळी, संघात इतकेच खेळाडू असावेत असा काही नियम नव्हता. अशातच, जवळपास महिनाभर आधी कोलकाता येथे केकेआर संघाचे पहिले सराव शिबिर भरले. या शिबिरात संघातील खेळाडूंसह देशांतर्गत क्रिकेटमध्ये पश्चिम बंगालचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काही खेळाडूंना बोलावले गेले होते. त्या खेळाडूंना यापूर्वीच सांगितले गेले होते की, तुम्ही चांगली कामगिरी करण्यात आणि संघ व्यवस्थापनाचे मन जिंकण्यात यशस्वी ठरला तर, कदाचित तुम्हाला संघात निवडले जाऊ शकते.
या सराव शिबिरात बंगाल क्रिकेट संघाकडून जॉय भट्टाचार्य, वृद्धिमान साहा, लक्ष्मीरतन शुक्ला व अशोक डिंडा यांना केकेआरच्या नेटमध्ये पाठवले गेले. ‘चांगली कामगिरी केल्यास संघात निवड होणार’ ही गोष्ट दिंडाच्या डोक्यात एकदम फिट बसली आणि तो गोलंदाजीसाठी सज्ज झाला.
पॉंटिंगच्या नजरेत भरला आणि आयपीएल खेळला
त्यावेळी २४ वर्षाचा असणाऱ्या डिंडासमोर सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली बऱ्यापैकी ओळख बनविलेला ब्रेंडन मॅकलम आला. दिंडाने अर्जुनाने माश्याचा डोळ्यावर नेम धरावा तसा, दोन वेळा मॅकलमचा त्रिफळा उडवला. मॅकलमला गोलंदाजी केल्यानंतर त्याच्यासमोर दस्तुरखुद्द रिकी पॉंटिंग उभा ठाकला. डिंडाने अजिबात ही दडपण न घेता त्याला देखील दोन वेळा बाद केले. एवढ्यावरच न थांबता काही धारदार बाउन्सरदेखील त्याला मारले. पॉंटिंग थोडासा रागवला आणि काहीतरी पुटपुटला. दिंडाला ते समजले नाही आणि त्याने आणखी बाउन्सर लगावले. पॉंटिंग मनातल्या मनात खुश झाला.
पुढे, तो डेव्हिड हसीला गोलंदाजी करत असताना बुकानन, गांगुली, पॉंटिंग व मॅकलम ही सर्व मंडळी त्याची गोलंदाजी पाहत होती. त्यावेळी, लक्ष्मीरतन शुक्लाने त्याच्या कानात येऊन सांगितले, “अशीच गोलंदाजी करत राहा. तू संघात निवडला जायच्या अगदी जवळ आहेस.”
त्यानंतर तो आणखी त्वेषाने गोलंदाजी करू लागला. संघ व्यवस्थापनाने त्याला काही सराव सामने खेळण्यासाठी संघात सामील करून घेतले आणि तिथेदेखील त्याने मैदान मारले. लवकर त्याला संघात निवडले गेल्याची खुशखबरी मिळाली.
मॅकलमच्या सामन्यात डिंडाची कमाल
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शोएब अख्तरला आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यात सहभागी होण्यासाठी परवानगी दिली नाही आणि आयपीएलच्या इतिहासातील पहिल्याच सामन्यात पदार्पण करण्याची संधी दिंडाला मिळाली. त्या पहिल्या सामन्यात कोणी काय केले हे कोणाच्याही फारसे लक्षात नाही. कारण, तो सामना फक्त आणि फक्त ब्रेंडन मॅकलमचा होता. टी२० क्रिकेटचा अप्रतिम नजराणा त्याने आपल्या फलंदाजीतून दाखवला होता. मात्र, डिंडाने त्या पहिल्याच सामन्यात ३ षटकात ७ धावा देत विराट कोहली व वसीम जाफर यांना तंबूत धाडले. आयपीएलच्या पहिल्या हंगामात डिंडाची आकडेवारी होती १० सामन्यात २८ च्या सरासरीने ९ बळी आणि इकॉनॉमी रेट होता ६.६६ होय ६.६६.
‘दिंडा ऍकॅडमी’ ची सत्यता वेगळी आहे
पुढे, एका वर्षात तो भारतासाठी देखील खेळला. आयपीएलमध्ये कोलकत्तानंतर आरसीबी, पुणे वॉरियर्स इंडिया, दिल्ली डेअरडेव्हिल्स व रायझिंग पुणे सुपरजायंट असा प्रवास त्याने केला. नंतरच्या काळात तो महागडा ठरू लागणार आणि त्याच्या नावे ‘दिंडा ऍकॅडमी’ ची सुरुवात झाली. कोणत्याही गोलंदाजाची धुलाई झाली की, ‘दिंडा ऍकॅडमीचा नवा सदस्य’ म्हणून त्यांची अवहेलना केली जाऊ लागली. मात्र, आकडेवारी पाहिल्यास दिंडा हा कशा पद्धतीचा गोलंदाज होईल याचा अंदाज लावता येईल.
दिंडाने भारतासाठी खेळलेल्या १३ वनडेत ६.१८ च्या सरासरीने १२ बळी, ९ टी२० सामन्यात ८.१६ च्या सरासरीने १७ बळी आणि आयपीएलमध्ये ७८ सामन्यात ८.२० च्या सरासरीने ६९ बळी त्याने मिळवले आहेत. सध्या भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज असलेल्या मोहम्मद शमीचा इकॉनॉमी रेट हा डिंडापेक्षा जास्त आहे.
या वर्षाच्या सुरुवातीलाच दिंडाने स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. अगदी काही महिन्यांपुर्वीच तो भारतीय जनता पक्षाकडून निवडणुकीसाठी सज्ज झाला होता. क्रिकेटमध्ये बऱ्यापैकी यश मिळवल्यानंतर आयुष्याची ही ‘सेकंड इनिंग’ खेळण्यातही तो यशस्वी ठरला आहे. भारतातील पश्चिम बंगाल राज्यातील विधानसभा निवडणूकीत भाजपकडून मोयना मतदार संघातून दिंडाने निवडणूक लढवली होती. या निवडणूकीत दिंडाने तृणमूल काँग्रेस पक्षाचा उमेदवार संग्राम कुमार डोलाईला पराभूत केले आहे. दिंडाला एकूण १०८१०९ मते मिळाली, तर डोलाईला १०६८४९ मते मिळाली.
महत्त्वाच्या बातम्या-
आमदार अशोक दिंडा! जगाने ट्रोल केलेला क्रिकेटर दिंडा राजकारणाच्या पीचवर सुपरहिट
“नक्कीच सनरायझर्समध्ये कसली तरी डाळ शिजतेय,” वॉर्नरला संघाबाहेर केल्याने दिग्गजाचे मोठे वक्तव्य
पंतची विकेट पंतच घेऊ शकतो! मोठा शॉट खेळण्याच्या नादात रिषभच्या हातून सुटली बॅट अन्…