क्रिकेटचा जन्मदाता देश म्हणून ओळख असलेल्या इंग्लंडने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटला एकाहून एक सरस खेळाडू दिले. अगदी क्रिकेटचे पितामह म्हटल्या जाणाऱ्या डब्ल्यू जी ग्रेस यांच्यापासून ते आज जगातील सर्वोत्तम अष्टपैलू असलेल्या बेन स्टोक्सपर्यंत यादी शेकडो नावांनी पूर्ण होते. क्रिकेटचा शोध जरी इंग्लंडमध्ये लागला असला तरी क्रिकेटवर राज्य इतर देशांनी केले. एकदिवसीय क्रिकेट सुरू झाल्यानंतर वेस्टइंडीज, भारत आणि नंतर ऑस्ट्रेलियाने या नव्या स्वरूपावर आपली हुकुमत दाखवली. इंग्लंडला आपला पहिला विश्वचषक (कोणत्याही प्रकारातील) जिंकण्यासाठी २०१० साल उजाडावे लागले. मात्र, यादरम्यान इंग्लंडचा संघ कसोटीमध्ये नेहमी चमकदार कामगिरी करत राहील.
इंग्लंडसाठी साल २००० नंतरच्या काळात जे काही क्रिकेटपटू आले, त्यातील काहींनी कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत आपल्या संघाला कायम अव्वल संघांमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान एक खेळाडू असा होता ज्याने नंतरच्या काळात इंग्लंडच्या संघाचे कर्णधारपद भूषविले आणि संघाला कसोटी क्रमवारीच्या अव्वलस्थानी नेण्याची कामगिरी केली. हा इंग्लंडचा आजवरचा सर्वोत्तम कर्णधार (काही समीक्षकांच्या मते) होता अँड्र्यू स्ट्रॉस.
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया ‘कनेक्शन’
इंग्लंडचा सर्वात यशस्वी कर्णधार जरी म्हटला जात असला तरी स्ट्रॉसचा जन्म झाला दक्षिण आफ्रिकेत. त्याची आई ब्रिटिश नागरिक असल्याने तो वयाच्या सहाव्या वर्षी इंग्लंडला आला आणि त्याला तेथील नागरिकत्व मिळाले.
दक्षिण आफ्रिकेप्रमाणे त्याचे ऑस्ट्रेलियाशी देखील खास नाते आहे. त्याने आपले शालेय शिक्षण ऑस्ट्रेलियातील मेलबर्न, सिडनी आणि ऍडलेड येथे पूर्ण केले. ग्रेड क्रिकेटची सुरुवात देखील त्याने ऑस्ट्रेलियातच केली होती. ऑस्ट्रेलियाचा महान वेगवान गोलंदाज ब्रेट ली हा त्याचा एक काळचा साथीदार होता.
क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात
कॉलेजचे शिक्षण घेण्यासाठी तो इंग्लंडला परतला आणि त्याने डरहॅम युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला. अभ्यासात मन लागल्याने तो युनिव्हर्सिटीसाठी पूर्णवेळ क्रिकेट खेळू लागला. त्याच्या फलंदाजीने प्रभावित होत त्याला मिडलसेक्स काउंटीच्या द्वितीय दर्जाच्या संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. साल २००० मध्ये संघाचा सलामीवीर आणि साल २००२ मध्ये त्याला मिडलसेक्स काउंटीचा कर्णधार म्हणून नियुक्त केले गेले. सन २००२ व २००३ च्या काउंटी हंगामात अनुक्रमे १,१३३ व १,४०१ धावा फटकावल्याने त्याला बांगलादेश विरुद्धच्या एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले.
पदार्पणात गाजवले लॉर्ड्स
सन २००४ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंडविरुद्ध लॉर्ड्स कसोटीतून त्याला पदार्पणाची संधी मिळाली. या संधीचे सोने करत त्याने पहिल्या डावात शतक तर दुसऱ्या डावात ८३ धावांची खेळी केली. त्याचबरोबर त्याने आपले पहिले आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक देखील लॉर्डसच्या या ऐतिहासिक मैदानावरील ठोकले.
ऍशेसचा हिरो
इंग्लंड संघाने २००५ साली जिंकलेल्या ऍशेस मालिकेत विजय मिळविला होता. तब्बल १८ वर्षानंतर इंग्लंडने ऍशेसची कुपी आपल्याकडे ठेवली होती. त्यामध्ये, ओल्ड ट्रॅफर्डवर झालेल्या तिसऱ्या कसोटीत १०६ तर ओव्हलवरील पाचव्या कसोटीत १२९ धावा काढून ती कसोटी अनिर्णित राखण्यात त्याने मोलाचा वाटा उचलला आणि संघाला पुन्हा एकदा ऍशेसचा मानकरी बनवले.
कर्णधार म्हणून पाडली छाप
जानेवारी २००९ मध्ये केविन पीटरसनच्या जागी स्ट्रॉसची अधिकृतपणे इंग्लंडचा नवा कसोटी कर्णधार म्हणून नियुक्ती झाली. ५० कसोटी सामन्यात त्याने आपल्या संघाचे नेतृत्व केले. ज्यामध्ये इंग्लंडने २४ विजय, ११ पराभव आणि १५ सामन्यात बरोबरी साधली. त्याच्या नेतृत्वात इंग्लंडने एकदा मायदेशात तर एकदा ऑस्ट्रेलियात जाऊन ऍशेसमध्ये मालिकाविजय साजरा केला. त्याच्याच कर्णधारपदाच्या कार्यकाळात इंग्लंडला २०११ मध्ये ३१ वर्षांत प्रथमच आयसीसी कसोटी क्रमवारीत प्रथम क्रमांकावर स्थान मिळाले.
यादगार निवृत्ती
सन २०१२ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ इंग्लंड दौऱ्यावर आला असता स्ट्रॉसने लॉर्ड्सवर आपला अखेरचा कसोटी सामना खेळला. पदार्पण आणि अखेरचा सामना हे दोन्ही सामने लॉर्ड्सवर खेळणार या काही मोजक्या खेळाडूंमध्ये त्याचा समावेश झाला. हा त्याचा शंभरावा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना होता. त्याच्या निवृत्तीवेळी संघ सहकार्यांनी त्याला तब्बल १०० शॅंपेनच्या बाटल्या भेट म्हणून दिल्या होत्या.
स्ट्रॉस-पीटरसन वाद
स्ट्रॉस आणि पीटरसनने पूर्वी चांगली मैत्री होती. परंतु, काळानुसार दोघांमध्ये हळूहळू वाद वाढत गेला. २०१२ सालामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या इंग्लंड दौर्यादरम्यान पीटरसनने इंग्लिश ड्रेसिंग रूममधील काही गोष्टी दक्षिण आफ्रिकेला सांगितल्या असा आरोप पीटरसनवर ठेवला गेला. तसेच, काही विवादित संदेशामध्ये स्ट्रॉस आणि संघाचे संचालक अॅन्डी फ्लॉवर यांचा उल्लेख केला. पीटरसनने संदेशांमध्ये स्ट्रॉसला ‘डूज’म्हटले होते. पीटरसनला संघातून वगळण्यात आले. पुढे, मालिका संपल्यानंतर स्ट्रॉस निवृत्त झाला.
दोघांमधील स्पर्धा येथेच संपली नाही. इंग्लंड २०१५ विश्वचषकाच्या पहिल्या फेरीत बाहेर झाल्यानंतर २०१४ मध्ये राष्ट्रीय संघ बाहेर गेलेल्या पीटरसनला पुनरागमनाची आशा होती. त्याने त्यावर्षी सरेकडून काउंटी चॅम्पियनशिपमध्ये चांगली कामगिरी केलेली. मात्र, इंग्लंड क्रिकेटच्या संचालकपदी नियुक्त झालेल्या स्ट्रॉसने पीटरसनचा पुनरागमनाचे दरवाजे बंद केले. मात्र, चाहत्यांच्या पाठिंब्यामुळे त्याला संघात सामील करून घेतले गेले.
रूथ स्ट्रॉस फाउंडेशन आणि सन्मान
आपली पत्नी रूथ हिच्या स्मरणार्थ तो कॅन्सरग्रस्तांसाठी ‘रूथ स्ट्रॉस फाउंडेशन’ ही संस्था चालवतो. तसेच त्याला ‘ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर’ हा इंग्लंडमधील सर्वोच्च पुरस्कार देखील मिळाला आहे. त्याच्या क्रिकेटमधील योगदानाबद्दल त्याला ‘सर’ ही पदवी प्रदान करण्यात आली आहे.
भारतीय क्रिकेट चाहत्यांना आठवणारा स्ट्रॉस म्हणजे प्रामुख्याने २०११ विश्वचषकावेळी भारत-इंग्लंड सामन्यात १५८ धावांची खेळी करत सामना ‘टाय’ करणारा खेळाडू. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखणी कामगिरी करूनही ‘सुपरस्टार’ म्हणून जरी स्ट्रॉस ओळखला गेला नाही तरी, आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर ‘सर’ ही उपाधी मात्र त्याने नक्कीच मिळवली.
वाचा –
राहुल नाम तो सुना होगा ! त्याच्या एकट्यासाठी घेतली गेली होती भल्यामोठ्या स्टेडियमवर ट्रायल
क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर ‘या’ भारतीयांनी गाजवला रुपेरी पडदा
सचिनसोबत कसोटी व वनडे पदार्पण करणारा सलील अंकोला पुढे मोठ्या पडद्यावर झाला पोलीस इन्स्पेक्टर






