---Advertisement---

सचिनसोबत पदार्पण करणारा सलील अंकोला पुढे मोठ्या पडद्यावर झाला पोलीस इन्स्पेक्टर

On: मंगळवार, मार्च 1, 2022 10:50 AM
---Advertisement---

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामने म्हणजे जवळजवळ एक युद्धच. असेच एक युद्ध खेळण्यासाठी १९८९-१९९० च्या हंगामात भारतीय संघ कृष्णम्माचारी श्रीकांत यांना सेनापती बनवून पाकिस्तानमध्ये दाखल झाला. घरच्या मैदानावर पाकिस्तान नेहमीच भारताला मात देत. भारतीय संघात देखील काही वरिष्ठ खेळाडू या महत्त्वपूर्ण दौऱ्यासाठी सामील होते. तसेच, देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या काही युवा खेळाडूंना भारतीय संघात स्थान देण्यात आलेले. सचिन तेंडुलकर आणि विवेक राजदान यांच्या सोबतीला महाराष्ट्राचा एक युवा वेगवान गोलंदाज (खरंतर अष्टपैलू) भारतीय संघात निवडला गेलेला. अल्पावधीतच देशांतर्गत क्रिकेट गाजवून भारतीय संघात जागा बनवलेला हा खेळाडू होता ‘सलील अंकोला’.

हॅट्रिकने प्रथमश्रेणी पदार्पण
सलिलचा जन्म १ मार्च १९६८ रोजी कर्नाटकी कोकणी कुटुंबात झाला. भारतातील इतर सर्व तरुणांप्रमाणे सलीलला लहानपणापासून क्रिकेट आणि सिनेमाचे भारी आकर्षण. मात्र, करिअर म्हणून त्याने क्रिकेटची निवड केली. वेगवान गोलंदाजी करणारा गोलंदाज तसेच उपयुक्त फलंदाजी करणारा खेळाडू म्हणून तो लहान मोठी मैदाने गाजवू लागला. त्याला खरी प्रसिद्धी मिळाली ती मात्र १९८८-१९८९ च्या रणजी ट्रॉफी हंगामातून. वयाच्या विसाव्या वर्षी त्याने गुजरातविरुद्ध महाराष्ट्र संघाकडून खेळताना प्रथमश्रेणी पदार्पण केले. त्याचे पदार्पणच अविस्मरणीय होते. या सामन्यात त्याने एकाच डावात हॅट्रिकसह सहा बळी घेण्याची किमया केली. बडोदा विरुद्धच्या पुढच्या सामन्यात देखील पुन्हा सहा बळी. त्या हंगामात तीन वेळा पाच बळी घेत त्याने एकूण २७ बळी आपल्या नावे केले. त्याच्या या सातत्यपूर्ण कामगिरीची दखल लवकरच राष्ट्रीय निवडकर्त्यांनी घेतली.

सचिनसोबत आंतरराष्ट्रीय पदार्पण
देशांतर्गत क्रिकेटमधील चमकदार कामगिरीच्या जोरावर १९८९ मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर जाणाऱ्या संघात त्याची निवड झाली. या संघात देशांतर्गत क्रिकेट गाजवणार्‍या बऱ्याच खेळाडूंना संधी देण्यात आली होती. मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेट गाजवणारा सोळा वर्षाचा सचिन या संघातील प्रमुख आकर्षण होता. बीसीसीपी संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात सलीलने पहिल्या डावात सहा तर दुसऱ्या डावात २ बळी घेत पहिल्या कसोटीसाठी दावेदारी ठोकली.

दौऱ्यावरील पहिल्याच कराची कसोटीत भारताकडून सलिल व सचिन यांनी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तर पाकिस्तानकडून वेगवान गोलंदाज वकार युनीसने पहिल्यांदा पाकिस्तानची जर्सी अंगावर चढवली. या सामन्यात सलीलने दोन बळी मिळवले. त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय बळी होता पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज सलीम मलिक. हा सामना अनिर्णित राहिला. याच सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाल्याने सलील मालिकेतील उर्वरित कसोटींमध्ये खेळू शकला नाही.

कसोटी मालिका संपल्यानंतर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी ही त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला. पहिल्या वनडे सामन्यात त्याने सचिन व विवेक राजदानसोबत वनडे पदार्पणदेखील केले.

‘अंकोलॅड’
पाकिस्तान दौऱ्यानंतर सलील अंकोला सातत्याने भारतीय संघासोबत राहिला. भारतात झालेल्या तसेच अनेक परदेशी दौऱ्यांवर देखील तो कसोटी संघाचा भाग होता. मात्र, त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळत नव्हती. अखेरीस, त्याला आणखी संधी न देताच कसोटी संघातून डच्चू देण्यात आला. त्यानंतर, ज्या-ज्या खेळाडूंसोबत असा प्रकार झाला त्यांना ‘अंकोलॅड’ म्हटले जाऊ लागले.

दुखापतींनी भरलेले करियर आणि अकाली निवृत्ती
कसोटी संघात स्थान मिळाले नसले तरी तो वनडे संघाच्या सातत्याने आत-बाहेर होत होता. तसेच त्याने महाराष्ट्र सोडून दिग्गजांचा भरणा असलेल्या मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. १९९३ मध्ये चार्म कप आणि सिंगर कप या दोन स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.

भारतीय उपखंडात झालेल्या १९९६ च्या विश्वचषकासाठी त्याला आकस्मिकपणे भारतीय संघात स्थान मिळाले. त्या विश्वचषकात तो फक्त एक सामना खेळला. विश्वचषकानंतर विनोद कांबळी व मनोज प्रभाकर यांच्यासह त्याची संघातून हकालपट्टी करण्यात आली. पुढे स्टॅंडर्ड बँक वनडे सीरिजमध्ये तो पाच सामने खेळला. त्या मालिकेतील अंतिम सामना त्याच्या कारकीर्दीतील अखेरचा सामना ठरला. कारण, त्यानंतर भारतात आल्यावर न्यूझीलंडविरुद्धच्या एका प्रदर्शनीय सामन्यात तो गोलंदाजी करताना कोसळला. हॉस्पिटलमध्ये त्याला गुडघ्याच्या खाली बोन ट्यूमर असल्याचे सांगण्यात आले. ज्यामुळे तो कमीत कमी दोन वर्ष मैदानापासून बाहेर राहणार होता. त्याच वेळी त्याने वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

फिल्मस्टार सलील अंकोला
क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर त्याने आपला मोर्चा चंदेरी दुनियेकडे वळवला. चांगली उंची आणि नायकाला साजेसा चेहरा असल्याने त्याला लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. संजय दत्तसोबत त्याने कुरुक्षेत्र याच चित्रपटात पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका निभावली. काही मोजक्या चित्रपटांमध्ये अभिनय केल्यानंतर तो टेलिभिजन क्षेत्रातही चांगलाच रूळला. सीआयडी सारख्या लोकप्रिय मालिकेत त्याने अक्षय या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केली. इतरही अनेक पौराणिक आणि कमर्शियल मालिकांमधून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत.

अभिनयासोबतच त्याने बऱ्याचश्या रियालिटी शो मध्ये देखील सहभाग नोंदवला. बिग बॉस, फियर फॅक्टर्स, बॉक्स क्रिकेट लीग यासारख्या अनेक रियालिटी शोमध्ये तो स्पर्धक म्हणून उतरला. आपल्या अनेक वैयक्तिक बाबींमुळे तो सतत चर्चेत असतो.

आपल्या आठ वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीत त्याला फक्त एक कसोटी आणि २० वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली. मात्र, आजही क्रिकेटप्रेमी सलील अंकोला हे नाव विसरले नाहीत.

ट्रेंडिंग लेख-

सचिन तेंडुलकरच्या बॅटनेच आफ्रिदीने केला होता ‘तो’ जागतिक विक्रम; वाचा बर्थडे बाॅयच्या क्रिकेट प्रवासातील रंजक गोष्टी

भारतातील प्रसिद्ध ६ क्रिकेट स्टेडियम, ज्यांना जिवीत व्यक्तींचे नाव देण्यात आले होते

विश्वचषक २०११ च्या अंतिम सामन्यात खेळलेला ‘हा’ क्रिकेटपटू आता बनलाय बस ड्रायव्हर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---