जगभरात सर्वाधिक क्रिकेट चाहते आणि क्रिकेट खेळाडू कोणत्या देशात असतील? असा प्रश्न विचारला गेला तर, एकमुखाने उत्तर येईल भारत. 130 कोटी लोकसंख्येच्या या देशात क्रिकेट इतकी लोकप्रियता अन्य कोणत्याही खेळाला नाही. 30 हून अधिक प्रथम श्रेणी संघ भारतात आहेत. त्यामुळे इतक्या मोठ्या देशात क्रिकेटपटूही तितकेच असणार आणि या कारणाने या सर्व खेळाडूंना देशासाठी खेळण्याची संधी क्वचितच मिळते.
अत्यंत चुरशीच्या स्पर्धेतून काही खेळाडू पुढे येतात आणि देशाचे प्रतिनिधित्व करतात. तर, काहींना गुणवत्ता असूनही राष्ट्रीय संघाकडून खेळण्याची अत्यंत मर्यादित संधी मिळते. असेच एक भारतीय वेगवान गोलंदाज होते, ज्यांना भारतीय संघासाठी खेळण्याची तुलनेने अत्यंत कमी संधी मिळाली. हे वेगवान गोलंदाज म्हणजे ‘अतुल वासन.’
देशांतर्गत क्रिकेटमध्ये लाजवाब कामगिरी
मार्च 23, 1968 रोजी दिल्लीत जन्मलेल्या आणि वाढलेल्या वासन यांनी शाळा आणि विद्यापीठ या दोन्ही स्तरावर दिल्लीचे प्रतिनिधित्व केले. 1986-1987 रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात आपल्या एकोणिसाव्या वाढदिवसाच्या काही दिवस आधी त्यांनी प्रथम श्रेणी पदार्पण केले. त्या वर्षी हुकलेली संधी दिल्ली संघाने पुढील वर्षी साधत रणजी विजेतेपद आपल्या नावे केले. मात्र, वासन त्या संघाचा भाग नव्हते. त्यांना इराणी करंडक खेळायला मिळाला आणि सामन्यात पाच बळी मिळवून त्यांनी दिल्लीच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सेनादल विरुद्धच्या पुढच्या सामन्यात 10 बळी आणि जम्मू-काश्मीर व पंजाब विरुद्ध चांगली कामगिरी केल्यानंतर न्यूझीलंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात त्यांची वर्णी लागली.
आंतरराष्ट्रीय कारकीर्द
न्यूझीलंड दौऱ्यावरील पहिल्याच सराव सामन्यात तीन बळी मिळवून त्यांनी पहिल्या कसोटीसाठी आपली जागा पक्की केली. भारताला डावाने पराभव पत्करावा लागलेल्या या सामन्यात वासन केवळ एक बळी मिळू शकले आणि तो होता न्यूझीलंडचे महान फलंदाज मार्क ग्रेटबॅच यांचा. या दौऱ्यावरील तिसऱ्या सामन्यात अतुल वासन यांच्या नावे एक नकोसा विक्रम जमा झाला होता. न्यूझीलंडचे फलंदाज इयान स्मिथ यांनी त्यांच्या एकाच षटकात 24 धावा लूटल्या होत्या, ज्या त्यावेळचा विश्वविक्रम होता.
याच दौर्यावर वासन यांनी आपले लिस्ट ए पदार्पण केले. त्यांनी त्या सामन्यात जॉन राईट, ऍण्ड्रू जोन्स व मार्क ग्रेटबॅच यांचे बळी मिळवले. त्या संपूर्ण दौऱ्यामध्ये वासन यांनी ग्रेटबॅच यांना बकरा बनवत पाच वेळा बाद केले होते.
न्यूझीलंड दौऱ्यानंतर त्यांची इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली. ओव्हल कसोटीत अत्यंत निराशाजनक कामगिरी केल्याने त्यांनी कसोटी संघातून जागा गमावली ती कायमचीच. भारतात परतल्यानंतर त्यांनी श्रीलंकेविरुद्ध चार वनडे सामने खेळले. आशिया कपमधील श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात तीन बळी मिळवल्यानंतर ते भारतासाठी त्यानंतर फक्त एक सामना खेळले व कायमचेच संघाबाहेर झाले.
पुन्हा देशांतर्गत क्रिकेटकडे वळविला मोर्चा
राष्ट्रीय संघातून बाहेर झाल्यानंतर वासन यांनी पुन्हा देशांतर्गत क्रिकेटकडे मोर्चा वळविला. सोबतच ते काही दिवस काउंटी क्रिकेट खेळले. हॉंगकॉंगमधील सुपर सिक्सेस स्पर्धेतही ते सहभागी होत राहिले. पुढे त्यांच्याकडे दिल्ली संघाचे कर्णधारपद देखील देण्यात आले. अखेरीस, 1997-1998 मध्ये त्यांनी क्रिकेटला अलविदा केला. वासन यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द 4 कसोटी व 9 वनडे सामन्यांची राहिली. ज्यामध्ये त्यांनी अनुक्रमे 10 आणि 11 बळी मिळवले. वासन यांनी 80 प्रथमश्रेणी सामने खेळताना 290 बळी तर, 53 लिस्ट ए सामन्यात 65 बळी त्यांनी आपल्या नावे केले.
निवृत्तीनंतरचा काळ
क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी समालोचक म्हणून काम केले. काही काळ ते दिल्ली क्रिकेट बोर्डाचे निवडकर्ताही बनले. 2011 मध्ये एका मंत्र्याच्या गाडीला ओव्हरटेक करण्याच्या वादातून त्यांना मारहाण करण्यात आली होती. त्यांचा मोबाईल सुविधा पुरविण्याचा व्यवसाय देखील आहे.
वासन यांच्याकडे म्हणावी तशी गती नव्हती. मात्र, कोणत्याही परिस्थितीत दर्जेदार गोलंदाजी करण्याची कला त्यांच्याकडे होती. भारतीय क्रिकेटमध्ये दुसरी संधी न मिळालेल्या काही मोजक्या दुर्देवी खेळाडूंमध्ये मात्र अतुल वासान यांचे नाव नक्कीच घ्यावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या –
चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणारा धोनी ‘या’ विक्रमात सर्वात टॉपला; दिनेश कार्तिक फक्त ३ पावलं दूर
ना विराट, ना धोनी आयपीएलमध्ये ‘या’ खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा, ‘मिस्टर आयपीएल’ने सांगितली नावे
तब्बल ९ वर्षांच्या नेतृत्वात विराटला जे जमलं नाही, ते डू प्लेसिस करणार का? पाहा कोहली काय म्हणाला