क्रिकेटमधील एक महत्त्वपूर्ण खेळाडू म्हणजे यष्टीरक्षक. सुरुवातीच्या काळात यष्टीरक्षकाला तितकेसे महत्त्व दिले जात नसत. यष्टीरक्षक हे अनेकदा तळाच्या स्थानी फलंदाजी करत. मात्र, अगदी पहिल्यापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख बनवणाऱ्या वेस्ट इंडीज संघामध्ये यष्टीरक्षकालाही तितकाच मान मिळत होता. कार्ल नन्स हे वेस्ट इंडीज क्रिकेटचे पहिले यष्टीरक्षक.
नन्स यांच्यानंतर अनेक दिग्गज यष्टीरक्षकांनी वेस्ट इंडीजसाठी यष्ट्यांमागे धुरा सांभाळली. इव्हान बॅरो, रोहन कन्हाय, डेरेक मरे, जेफ्री दुजॉ यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिग्गजांचा दर्जा प्राप्त आहे. कर्टली ब्राऊन व रिडली जेकब यांनीदेखील अनेक वर्षे वेस्ट इंडीज क्रिकेटची सेवा केली. सध्या त्याच परंपरेला शाई होप पुढे नेत आहे. मात्र, आधुनिक क्रिकेटमध्ये वेस्ट इंडीजचा दिग्गज नाही, परंतु महत्त्वपूर्ण यष्टीरक्षक म्हटला जाईल असा ‘दिनेश रामदिन’ वेस्टइंडीज क्रिकेटसाठी आपले योगदान देत आहे.
वेगवान गोलंदाज म्हणून केली सुरुवात
आजच्याच दिवशी १९८५ मध्ये त्रिनिदाद अँड टोबॅगो येथे एका भारतीय वंशाच्या कुटुंबात दिनेशचा जन्म झाला. क्रिकेटचे माहेरघर इंग्लंड असले तरी क्रिकेटवर भरभरून प्रेम कॅरेबियन बेटांनी व भारतीय उपखंडाने केले. क्रिकेटच्या वातावरणात दिनेश वाढू लागला.
ज्या वेस्ट इंडीजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला एकाहून एक सरस वेगवान गोलंदाज दिले, तशाच प्रकारचा वेगवान गोलंदाज बनायचे स्वप्न घेऊन दिनेशने खेळायला सुरुवात केली. मात्र, गोलंदाजी झाल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा, कंटाळा येऊ लागल्याने त्याने यष्टीरक्षण करण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात त्याने यष्टीरक्षणाचे प्रशिक्षण देखील घेतले नव्हते. वेस्ट इंडिजचे माजी यष्टीरक्षक डेव्हिड विल्यम्स व जेफ्री दुजॉ यांनी त्याला मार्गदर्शन करत त्याच्या यष्टीरक्षणात सुधारणा घडवून आणली.
युवा कारकीर्द आणि आंतरराष्ट्रीय पदार्पण
यष्टीरक्षक म्हणून चांगली कामगिरी करत असताना त्याची फलंदाजी देखील बहरत होती. लवकरच त्याच्याकडे त्रिनिदाद अँड टोबॅगोच्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट संघाचे नेतृत्व देण्यात आले. ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्यानंतर, वेस्ट इंडीजच्या एकोणीस वर्षाखालील संघाचे कर्णधारपद देखील त्याच्याकडे चालून आले. २००४ मध्ये बांगलादेश येथे आयोजित युवा विश्वचषकात त्याने वेस्ट इंडीजचे नेतृत्व केले.
युवा संघासोबत केलेल्या चांगल्या कामगिरीचे बक्षीस त्याला राष्ट्रीय संघात स्थान म्हणून मिळाले. वयाच्या १९ व्या वर्षी २००५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध त्याने आपला पहिला कसोटी सामना खेळला. विशेष म्हणजे, त्याने पदार्पण केल्यानंतर वेस्ट इंडीजचा नियमित यष्टीरक्षक कर्टनी ब्राऊन याला पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही. १५ दिवसाच्या आतमध्ये त्याने भारताविरुद्ध वनडे पदार्पण देखील केले.
संघातून मिळाला डच्चू आणि पुनरागमन
जवळपास चार वर्ष संघाचा प्रमुख यष्टिरक्षक म्हणून खेळल्यानंतर २००९ मध्ये त्याच्यावर संघातील जागा गमावण्याची नामुष्की ओढवली. २०१० मध्ये वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने त्याचा करार वाढवला नाही. तो प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये परतला आणि तेथेही त्याने चांगली कामगिरी केली. दुर्दैवाने, त्याला तरीदेखील राष्ट्रीय संघात जागा मिळाली नाही.
राष्ट्रीय संघातील जागा गमावल्यानंतर दिनेशकडे त्रिनिदाद आणि टोबॅगो संघाचे कर्णधारपद देण्यात आले. २०११-२०१२ च्या देशांतर्गत टी२० स्पर्धेत त्याने त्रिनिदाद आणि टोबॅगोला विजेते बनवले. विशेष म्हणजे, तो या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. यानंतर त्याला राष्ट्रीय संघात स्थान देण्यात आले. मात्र, काही छोट्या-मोठ्या दुखापतीमुळे त्याच्यावर पुन्हा एकदा संघाबाहेर होण्याची नामुष्की आली. पुनरागमनानंतर, २०१४ मध्ये त्याच्याकडे वेस्ट इंडीजच्या कसोटी संघाचे नेतृत्व देण्यात आले.
दोन वेळा विश्वचषक विजेता
दिनेश रामदिन त्या सात खेळाडूंपैकी एक आहे ज्यांनी २०१२ व २०१६ असे दोन्ही टी२० विश्वचषक वेस्ट इंडीजसाठी जिंकले. या दोन्ही विश्वचषकावेळी रामदिनने वेस्ट इंडीजसाठी यष्ट्यांमागे जबाबदारी सांभाळली होती.
आंतरराष्ट्रीय आकडेवारी
दिनेशने वेस्ट इंडीजसाठी आत्तापर्यंत ७४ कसोटीत २,८९८ धावा तर, १३९ वनडेमध्ये २,२०० धावा ठोकल्या आहेत. दिनेशने वेस्ट इंडिजकडून ७१ टी२० सामने खेळताना ६३६ भावा बनविलेल्या आहेत. त्याने आत्तापर्यंत वेस्ट इंडीजसाठी यष्ट्यांमागे ४२९ झेल आणि ३९ फलंदाजांना यष्टिचित केले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शाई होपचे आगमन झाल्यानंतर दिनेश संघाच्या रणनीतीमधून काहीसा बाजूला झाला. तो आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना २०१९ मध्ये भारताविरुद्ध खेळला. २०१६ पासून तो वेस्ट इंडीजच्या कसोटी वनडे संघाचा भाग नाही. मात्र, तरीदेखील वेस्ट इंडीज क्रिकेटसाठी त्याने दिलेले योगदान कोणताही क्रिकेटप्रेमी विसरू शकणार नाही.
वाचा –
कॅलिसच्या ‘त्या’ शब्दांनी जादू केली अन् दक्षिण आफ्रिकेने ४३५ धावांचे आव्हान सहज पार केले
भारतीय क्रिकेटची पहिली रनमशीन : विजय हजारे