भारतीय संघ विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. 15 सदस्यीय भारतीय संघात एकापेक्षा एक स्टार खेळाडूंचा भरणा आहे. अलीकडेच अक्षर पटेल दुखापतग्रस्त झाल्यामुळे आर अश्विन या दिग्गज फिरकीपटूची संघात वर्णी लागली. मात्र, मागील काही काळापासून स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहल संघासाठी शानदार प्रदर्शन करूनही त्याला स्पर्धेसाठी दुर्लक्षित केले गेले.
आधीही युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याला विश्वचषक स्क्वॉडमधून दुर्लक्षित केले गेले आहे. यूएई येथे झालेल्या 2021च्या टी20 विश्वचषकात चहलची निवड केली गेली नव्हती. त्यानंतर टी20 विश्वचषक 2022मध्ये चहलला निवडले गेले, पण त्याला एकही सामन्यात खेळण्याची संधी दिली नाही. अशात विस्डेन इंडियाशी बोलताना चहलने याविषयी भाष्य केले आहे.
काय म्हणाला चहल?
चहल म्हणाला की, त्याला संघातून बाहेर पडण्याची सवय झाली आहे. तसेच, हा त्याच्या आयुष्याचा भाग बनला आहे. चहल म्हणाला, “मी समजू शकतो की, फक्त 15 खेळाडूच संघाचा भाग बनू शकतात. कारण, हा विश्वचषक आहे. मला निश्चितरीत्या वाईट वाटत आहे. मात्र, माझ्या आयुष्याचे ध्येय पुढे जाणे आहे. मला आता दुर्लक्षित होण्याची सवय झाली आहे. आता तर तीन विश्वचषक झाले आहेत.”
चहलने काऊंटी क्रिकेट खेळण्यामागील खऱ्या कारणाचाही खुलासा केला. तो म्हणाला, “मी केंटसाठी काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी आलो. कारण, मला कधीही आणि कोणत्याही प्रकारे क्रिकेट खेळायचे आहे. मला इथे लाल चेंडूने खेळण्याची संधी मिळाली आणि भारतासाठीही लाल चेंडूने खेळायचे आहे. तेव्हा माझ्यासाठी हा चांगला अनुभव राहिला आहे.”
चहलने आपल्या काऊंटी क्रिकेटबद्दल पुढे बोलताना म्हटले की, तो इंग्लंडमध्ये याचा भरपूर आनंद घेत आहे. चहलने हेही सांगितले की, त्याला भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळायचे आहे.
भारतीय फिरकीपटू म्हणाला, “मी माझ्या प्रशिक्षकांशी बोललो आणि ते खुश आहेत की, मी कुठेतरी खेळत आहे. कारण, तुम्ही नेट्समध्ये आपल्या मर्जीने हवी तितका सराव करा, सामन्याची गोष्टच वेगळी असते. मला इथे चांगल्या स्तरावर खेळण्याची संधी मिळत आहे. मला खूप काही शिकायला मिळत आहे. मला भारतासाठी कसोटी सामने खेळायचे आहेत.”
चहलची वनडे कारकीर्द
चहल याच्या वनडे कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने भारतीय संघाकडून आतापर्यंत 72 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 27.13च्या सरासरीने आणि 5.26च्या इकॉनॉमी रेटने 121 विकेट्स घेतल्या आहेत. याव्यतिरिक्त त्याने 14 डावात फलंदाजी करताना फक्त 77 धावा केल्या आहेत. (spinner yuzvendra chahal on getting dropped from 2023 world cup indian squad)
हेही वाचा-
कहर! 10 पैकी ‘हा’ एकटा संघ 12 वर्षांनंतर खेळणार वर्ल्डकप, फक्त ‘एवढ्या’ वेळा घेतलाय भाग
वर्ल्डकपला उरले फक्त 4 दिवस, जाणून घ्या बलाढ्य भारत 9 संघांविरुद्ध कधी-कधी भिडणार