अफगाणिस्तान क्रिकेट संघाला नुकताच कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळाला आहे. येत्या 14 जूनपासून भारत आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान बेंगलोर येथे ऐतिहासिक कसोटी सामना होत आहे.
या सामन्यावेळी आयपीएलमधे दमदार कामगिरी करणाऱ्या 19 वर्षीय रशिद खानवर सगळ्यांच्या नजरा असतील. बांग्लादेश बरोबर सुरू असलेल्या टी-20 मालिकेतही रशिदची जादू कायम आहे.
भारताचे माजी सलामीविर आणि झिम्बाब्वेचे नवनियुक्त प्रशिक्षक लालचंद राजपूत यांनी ‘टाईम्स आॅफ इंडिया’ या इंग्रजी वृत्तपत्राशी चर्चा करताना भारत आणि अफगानिस्तानमधे होणाऱ्या ऐतिहासिक कसोटीबद्दल आपली मते व्यक्त केली.
ते म्हणाले की, “भारतीय संघाची फिरकी गोलंदाजी ताकद असली तरी अफगाणिस्तान विरूध्दच्या सामन्यात चिन्नास्वामी मैदानावर फिरकी ट्रॅक देणयाची चूक करू नये. त्यांच्याकडे रशिदबरोबर मुजीब उर रहमान, अमिर हमजा आणि चायनामन गोलंदाज झहिर खान आहेत.
जर या सामन्यात फिरकी ट्रॅक दिला तर ते आपल्यावर उलटू शकते. कारण रशिद आणि मुजीब उर रहमानने आयपीएलमधे चांगली कामगिरी केली आहे.
गेल्या दोन महिन्यापासून भारतातचं असल्यामुळे त्यांनी इथल्या वातावरणाशी चांगले जूळवून घेतले आहे. या सामन्यास जर फिरकी ट्रॅक असेल तर ते भारतीय फलंदाजांसमोर कडवे आव्हान ते ऊभे करतील.”
लालचंद राजपूत यांनी 2016-2017 या काळात अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले आहे.






