दुबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामात बुधवारी(२२ सप्टेंबर) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात सामना पार पडला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात हैदराबादला ८ विकेट्सने मोठा पराभव स्विकारावा लागला. विशेष म्हणजे या आयपीएल हंगामातील पहिल्या ८ सामन्यांतील हा त्यांचा ७ वा पराभव होता. त्यामुळे त्यांच्या नावावर लाजीरवाणा विक्रम झाला आहे.
हैदराबादचा लाजीरवाणा पराभव
आयपीएल २०२१ हंगामात हैदराबादने सुरुवातीपासूनच संघर्ष केला आहे. बुधवारी त्यांचा आयपीएल २०२१ हंगामातील आठवा सामना होता. हे आठ सामने खेळताना त्यांना तब्बल ७ पराभव पाहावे लागले आहेत. त्यांना आत्तापर्यंत केवळ पंजाब किंग्सविरुद्ध विजय मिळवता आला आहे. त्यामुळे ते सध्या गुणतालिकेत २ गुणांसह तळाशी आहेत.
हैदराबाद आयपीएल हंगामात पहिल्या ८ पैकी ७ सामने पराभूत होणारा पाचवा संघ ठरला आहे. यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघांनी अशी नकोशी कामगिरी केली आहे. कोलकाताने २००९ साली, पंजाबने २०१० साली, दिल्लीने २०१३ साली आणि बेंगलोरने २०१९ साली अशी कामगिरी केली होती.
हैदराबादने यापूर्वी २०१६ साली आयपीएलचे विजेतेपदही मिळवले आहे. तसेच २०१८ साली ते उपविजेते राहिले आहेत. यंदा संघाच्या खराब कामगिरीमुळे हंगामाच्या मध्येच डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपदावरुन काढून टाकण्यात आले होते. त्याच्याऐवजी केन विलियम्सनकडे कर्णधारपद देण्यात आले होते. पण विलियम्सनच्या नेतृत्वखालीही संघाला अद्याप चालू हंगामात मोठे यश मिळालेले नाही.
दिल्लीचा एकतर्फी विजय
बुधवारी हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ बाद १३४ धावा केल्या होत्या. हैदराबादकडून अब्दुल सामदने सर्वाधिक २८ धावा केल्या. त्याचबरोबर राशिद खानने २२ धावांची खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त कोणालाही २० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. दिल्लीकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच एन्रीच नॉर्किए आणि अक्षर पटेलने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर १३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दिल्लीकडून माजी कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक नाबाद ४७ धावा केल्या. तर शिखर धवनने ४२ धावा केल्या. याशिवाय कर्णधार रिषभ पंतने नाबाद ३५ धावांची खेळी केली. त्यामुळे दिल्लीने १७.५ षटकांत २ विकेट्स १३९ धावा करत सामना जिंकला. हैदराबादकडून खलील अहमद आणि राशिद खान यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: चेन्नईच्या फिरकीपटूने नेटमध्ये टाकला ‘इतका’ वेगवान चेंडू की, रायडू अन् ऋतुराजही झाले चकीत
‘गब्बर’चा धमाका! आयपीएल २०२१मध्ये ४०० धावा करताच शिखरने ‘या’ यादीत रोहित, विराट, वॉर्नरला पछाडले
न्यूझीलंड, इंग्लंडनंतर आता ऑस्ट्रेलियाही करणार पाकिस्तान दौरा रद्द? बोर्डाने दिले ‘हे’ उत्तर