---Advertisement---

भारीच ना भावा! १९ वर्षीय अब्दुल सामदने दिग्गज पॅट कमिन्सविरुद्ध ठोकलेले दोन गगनचुंबी षटकार पाहून व्हाल थक्क

On: सोमवार, एप्रिल 12, 2021 1:13 AM
---Advertisement---

चेन्नई। रविवारी (११ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील तिसरा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात पार पडला. या सामन्यात कोलकाताने १० धावांनी विजय मिळवत हंगामाची विजयी सुरुवात केली. या सामन्यात जरी कोलकाताने विजय मिळवला असला, तरी अखेच्या क्षणी त्यांना दबावात आणणाऱ्या हैदराबादच्या १९ वर्षीय अब्दुल सामदने त्याच्या आक्रमक खेळीमुळे सर्वांची वाहवा मिळवली आहे.

सामदने कमिन्सला ठोकले २ षटकार 
झाले असे की कोलकाताने दिलेल्या १८८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या हैदराबाद संघाकडून ६ व्या क्रमांकावर फलंदाजी करत असलेला विजय शंकर १८ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बाद झाला. त्यामुळे अखेरचे दोन षटके खेळण्यासाठी अब्दुल सामद मैदानात आला. त्यावेळी दुसऱ्या बाजूने अर्धशतकी खेळी केलेला मनिष पांडे खेळत होता.

यावेळी हैदराबादला शेवटच्या २ षटकांत विजयासाठी ३८ धावांची गरज होती. कोलकाताकडून १९ वे षटक टाकण्यासाठी दिग्गज वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आला. त्याच्या या षटकात पहिल्या चेंडूवर पांडेने एकेरी धाव घेतली. त्यानंतर सामद स्ट्राईकवर आला, तो या डावातील त्याचा पहिलाच चेंडू खेळणार होता. पण त्याने कमिन्सचा दबाव न घेता या षटकातील दुसऱ्या चेंडूवर ९३ मीटरचा खणखणीत षटकार ठोकला.

त्यानंतर या षटकातील तिसऱ्या चेंडूवर सामदने पांडेच्या मदतीने दुहेरी धाव पूर्ण केली. चौथ्या चेंडूवर पुन्हा एकदा सामदने लांबलचक षटकार खेचत कोलकाताला दबावात आणले. त्यापुढच्या चेंडूवर त्याने एकेरी धाव काढली. तर षटकातील शेवटचा चेंडू निर्धाव गेला. त्यामुळे या षटकांत एकूण १६ धावा निघाल्या आणि हैदराबादच्या विजयाच्या आशाही वाढल्या होत्या.

अखेरच्या षटकात कोलकाताकडून आंद्रे रसलने गोलंदाजी केली. या षटकात २२ धावांची गरज हैदराबादला होती. मात्र, पांडे आणि सामदचे प्रयत्न तोकडे पडले आणि त्यांना या षटकात ११ धावाच काढता आल्या. त्यामुळे अखेर हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागला.

सामद ८ चेंडूत १९ धावांवर आणि पांडे ४४ चेंडूत ६१ धावांवर नाबाद राहिला. तत्पूर्वी हैदराबादकडून बेअरस्टोने ५५ धावांचे झुंजार अर्धशतक केले होते. त्याने आणि पांडेने ९२ धावांची भागीदारीही केली होती. पण अखेर हैदराबादला विजय मिळवता आला नाही.

https://twitter.com/sal_yassa/status/1381313740545605632

या गोलंदाजांविरुद्धही सामदने मारले आहेत षटकार 
सामदने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये ८ षटकार मारले आहेत. त्यातील ३ षटकार त्याने कमिन्सविरुद्ध मारले आहेत. तर जसप्रीत बुमराह आणि एन्रीच नॉर्किए विरुद्ध त्याने प्रत्येकी २ षटकार मारले आहेत. तसेच कागिसो रबाडा विरुद्ध १ षटकार मारला आहे.

कोलकाताने उभारला होता १८७ धावांचा डोंगर
या सामन्यात हैदराबादने कोलकाताला नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. या आमंत्रणाचा स्विकार करत कोलकाताने २० षटकात ६ बाद १८७ धावा धावफलकावर लावल्या.

त्यांच्याकडून नितीश राणाने ५६ चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकारांसह ८० धावा केल्या. तर राहुल त्रिपाठीने २९ चेंडूत ५३ धावा केल्या आणि अखेरच्या काही षटकांत दिनेश कार्तिकने ९ चेंडूत नाबाद २२ धावांची आक्रमक खेळी केली. हैदराबादकडून मोहम्मद नबी आणि राशिद खानने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर टी नटराजन आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी १ विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या –

अफलातून! अब्दुल सामदने बाऊंड्री लाईनजवळ मॉर्गनचा घेतला भन्नाट झेल, पाहा व्हिडिओ

कमाल लाजवाब…! गिलचा हा अफलातून षटकार बघून तुम्हीही असंच म्हणाल, पाहा व्हिडिओ

नाडादेखील आयपीएलसाठी सज्ज, इतक्या खेळाडूंची घेणार डोपिंग चाचणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---