चेन्नई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील तिसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने १० धावांनी विजय मिळवला. हा सामना कोलकाताने जिंकला असला, तरी या सामन्यात कोलकाताचा कर्णधार ओएन मॉर्गनला फारसा प्रभाव पाडता आला नाही. त्याला कारण अब्दुल सामद हा १९ वर्षीय युवा क्रिकेटपटू ठरला. कारण सामदने मॉर्गनचा अप्रतिम झेल घेत त्याला आक्रमक खेळी करण्याआधीच माघारी धाडले.
झाले असे की कोलकाताने आंद्रे रसलच्या रुपात १७ व्या षटकात १५७ धावांवर तिसरी विकेट गमावल्यानंतर मॉर्गन ५ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. त्यावेळी नितीश राणा फलंदाजी करत होता. त्याने अर्धशतक पूर्ण केले होते. डावाची अखेरची काही षटके बाकी असल्याने फलंदाज आक्रमक खेळणार हे उघड होते.
त्यानुसार राणाने मोहम्मद नबी गोलंदाजी करत असलेल्या १८ व्या षटकात हवेत फटका मारण्याचा प्रयत्न केला, मात्र विजय शंकरने त्याचा झेल घेतला. त्यामुळे त्याला बाद होऊन जावे लागले. त्यापुढच्याच चेंडूवर मॉर्गनने मोठा फटका मारला. पण हा चेंडू फाईन लेगच्या दिशेने गेला. त्याठिकाणी बाऊंड्री लाईनजवळ अब्दुल सामद क्षेत्ररक्षण करत होता. हवेतून जोरात आलेला चेंडू पाहून सामदनेही वर उडी मारत हा चेंडू अप्रतिमरित्या झेलला. त्याच्या या झेलाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
नबीच्या या षटकात २ विकेट्स लागोपाठ गेल्याने कोलकाताच्या धावगतीला लगाम लागला. पण तरी राणाने ८० धावांची खेळी केल्याने कोलकाताने १८७ धावांचा डोंगर उभा केला होता. त्यात राहुल त्रिपाठीच्या ५३ धावांच्या खेळीचा आणि अखेरच्या क्षणी दिनेश कार्तिकने केलेल्या ९ चेंडूतील २२ धावांच्या खेळीचेही योगदान होते.
https://twitter.com/pradeepbhumana/status/1381269293510184962
हैदराबादला धावांचा पाठलाग करण्यात आले अपयश
कोलकाताने दिलेल्या १८८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात खराब झाली. त्यांचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर(३) आणि वृद्धिमान साहा(३) लवकर बाद झाले. पण यानंतर बेअरस्टो आणि मनिष पांडेने डाव सांभाळत ९२ धावांची भागीदारी केली. या दोघांनीही अर्धशतके केली.
बेअरस्टोने ४० चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ५५ धावा केल्या. तर पांडे अखेरपर्यंत नाबाद राहिला. त्याने ४४ चेंडूत ६१ धावा केल्या. त्याला अखेरच्या काही षटकांत अब्दुल सामदने ८ चेंडूत नाबाद १९ धावा करत चांगली साथ दिली. मात्र, पांडे आणि सामदचे प्रयत्न तोकडे पडले आणि हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागला. कोलकाताकडून प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या, तर शाकिब अल हसन, पॅट कमिन्स आणि आंद्रे रसलने प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
कमाल लाजवाब…! गिलचा हा अफलातून षटकार बघून तुम्हीही असंच म्हणाल, पाहा व्हिडिओ
नाडादेखील आयपीएलसाठी सज्ज, इतक्या खेळाडूंची घेणार डोपिंग चाचणी
तब्बल ‘इतक्या’ दिवसांनंतर मैदानात उतरला भज्जी, सहकाऱ्यांनी केले कौतुक