कोलंबो। आज निदाहास ट्रॉफी तिरंगी टी २० मालिकेतील शेवटचा साखळी फेरीतील सामना श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश संघात होणार आहे. या सामन्यात जो संघ विजयी ठरेल त्या संघाला अंतिम फेरीत भारताचे आव्हान असणार आहे.
तसेच या सामन्यातून बांग्लादेशचा नियमित कर्णधार शाकिब अल हसन पुनरागमन करणार आहे. त्याला बोटाच्या दुखापतीमुळे मागील काही सामन्यांना मुकावे लागले होते. त्याच्या परत येण्याने बांग्लादेशच्या फलंदाजीला आणखी भक्कमपणा आला आहे.
मात्र श्रीलंकेचा नियमित कर्णधार दिनेश चंडिमलवर दोन सामन्यांची बंदी आल्याने, त्याच्या अनुउपस्थितीत आजही श्रीलंकेची धुरा थिसेरा परेरा सांभाळेल.
दोन्ही संघांनी या मालिकेत प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. श्रीलंकाने भारताविरुद्ध पहिला सामना जिंकला आहे. तर बांग्लादेशने श्रीलंकेविरुद्ध झालेला सामना जिंकला आहे.
याआधी या दोन संघात झालेल्या सामन्यात श्रीलंकेने दिलेल्या २१५ धावांचे आव्हान बांग्लादेशने सहज पार केले होते. त्यामुळे बांगलादेश संघ तशाच कामगिरीची आजही अपेक्षा करेल तर श्रीलंका संघही घरच्या परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करेल.
आज जर सामना कोणत्याही कारणाने झाला नाही तर श्रीलंका संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल कारण दोन्ही संघांचे गुण जरी सारखे असले तरी श्रीलंकेचा नेट रनरेट बांग्लादेशपेक्षा चांगला आहे.
कुठे होईल श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश टी २० सामना?
आज निदाहास ट्रॉफी स्पर्धेत श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश संघात होणारा सामना आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे होणार आहे. तिरंगी मालिकेतील(निदाहास ट्रॉफी) हा साखळी फेरीतील शेवटचा सामना असणार आहे.
किती वाजता सुरु होणार श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील सामना?
आज भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता या सामन्याला सुरुवात होईल. त्याआधी संध्याकाळी ६.३० वाजता नाणेफेक होईल.
कोणत्या टीव्ही चॅनेलवरून श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश सामन्याचे प्रसारण होईल?
श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश संघात होणारा सामना चाहत्यांना डी स्पोर्ट्स, डीडी स्पोर्ट्स आणि रिश्ते सिनेप्लेक्स या चॅनेलवरून पाहता येणार आहे. डी स्पोर्ट्स चॅनेलवरून इंग्लिश समालोचन करण्यात येणार आहे. तर रिश्ते सिनेप्लेक्स चॅनेलवरून हिंदी समालोचन होईल.
हा सामना ऑनलाईन कसा पाहता येईल?
आज होणाऱ्या श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील सामन्याचे ऑनलाईन प्रसारण जिओ टीव्ही लाईव्ह अॅपवर होणार आहे. या अॅपवर चाहत्यांना हा सामना ऑनलाईन पाहता येईल.
यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ:
बांग्लादेश: शाकिब अल हसन( कर्णधार), महमुदूल्लाह रीयाद, तमिम इक्बाल, सौम्या सरकार, इम्रूल कायेस, मुशफिकूर रहीम, नुरूल हसन सोहन, मेहेदी हसन मिराज, सब्बीर रहमान, मुस्तफिजूर रहमान, रूबेल हुसेन, अबू हैदर रोनी, अबू जायोद राही, अरूफुल हक आणि नाझमुल इस्लाम अपू
श्रीलंका: थिसारा परेरा (कर्णधार), उपुल थरंगा, दनुष्का गुनाथिलका, कुशल मेंडिस, दसून शानाका, कुशल पेरेरा, जीवन मेंडिस, सुरंगा लकमल, इसूरु उदाना, अकिला धनंजया, अमिला अपोन्सो, नुवान प्रदीप, दुश्मंथा चमिरा, धनंजया डी सिल्वा.