श्रीलंका संघाचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा हा गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानात खेळताना दिसून आला नाहीये. आयपीएल २०२० आणि आयपीएल २०२१ च्या हंगामात देखील त्याने खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे तो पुन्हा खेळताना दिसणार की नाही? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांनी उपस्थित केला होता. परंतु क्रिकेट चाहत्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. तो आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत श्रीलंका संघाचे प्रतिनिधित्व करेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
मलिंगाने वनडे आणि कसोटी मालिकेतून निवृत्ती जाहीर केली असली तरी देखील त्याने टी-२० मधून अजून निवृत्ती घेतली नाहीये. त्यामुळे आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत मलिंगाला संघात स्थान देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
श्रीलंकन निवड समितीचे चेअरमन प्रमोद विक्रमासिंघे म्हणाले की, “आम्ही लवकरच मलिंगासोबत चर्चा करणार आहोत. तो आगामी टी-२० मालिकांसाठी श्रीलंका संघाच्या रणनीतीचा एक भाग आहे. यात टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा देखील समावेश आहे. मलिंगा श्रीलंका संघातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक आहे. तसेच आमच्याकडे आणखी एक विकल्प उपलब्ध आहे.”
तसेच विक्रमासिंघे यांनी मलिंगाचे कौतुक करताना म्हटले की, “आपल्याला हे मुळीच विसरून चालणार नाही की, मलिंगा श्रीलंका संघातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक आहे. त्याची कामगिरी पाहून तुम्हाला अंदाज येईलच. यावर्षी आणि पुढील वर्षी एकापाठोपाठ दोन टी-२० विश्वचषक स्पर्धा येणार आहेत. जेव्हा आम्ही मलिंगाला काही दिवसात भेटू तेव्हा त्याच्यासोबत याविषयी आम्ही नक्कीच चर्चा करू.”
लसिथ मलिंगाही उत्सुक
टी-२० संघातील पुनरागमनाबाबत लसिथ मलिंगा म्हणाला की, “मी टी -२० क्रिकेटमध्ये श्रीलंकन संघासाठी चांगली कामगिरी करण्यास उत्सुक आहे. मी वनडे आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. परंतु टी-२० क्रिकेटमध्ये मी अजून निवृत्ती जाहीर केली नाहीये. परंतु मला ही गोष्ट जाणून घ्यायची आहे की, निवड समिती माझ्याबाबत कुठला निर्णय घेते. मी पुनरागमन करून चांगली कामगिरी करतो. मी हे अनेकदा केले देखील आहे.”
लसिथ मलिंगाने श्रीलंकन संघासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत एकूण ८३ टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याने १०७ गडी बाद केले आहेत. यासोबतच यात त्याने दोन वेळेस ५ गडी बाद करण्याचा विक्रम केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाला १८चा खतरा; मागील ६ वर्षे नडलेल्या या अनलकी तारखेला विराटसेना यंदा बनवणार लकी?
विराटच्या एका मेसेजची कमाल अन् हर्षल पटेल बनला आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज