पल्लेकेल: येथे भारताच्या श्रीलंका दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना उद्या दुपारी होणार आहे. पहिला सामना जिंकून भारताने या मालिकेत १-० अशी बढत मिळवली आहे. श्रीलंकेचा संघ उद्याचा सामना जिंकून मालिकेत पुनरागमनाचा प्रयत्न करेल.
आतापर्यंतच्या दौऱ्यात भारताने कसोटी सामन्यापासून वर्चस्व कायम राखले आहे आणि पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने श्रीलंकेचा असा धुव्वा उडवला की सर्वांना असे वाटत आहे की काही झाले तरी श्रीलंका भारताला हरवूच शकत नाही. पण आपण जर २ महिने मागे जाऊन पहिले तर २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये श्रीलंकेच्या याच संघाने भारताला धूळ चारली होती. त्यामुळे हा संघ अगदीच सुमार आहे असे काही नाही.
स्पॉटलाईट मधील खेळाडू
श्रीलंका: उपुल थरंगा
श्रीलंकेच्या या संघात मलिंगापेक्षा ही अनुभवी खेळाडू असलेल्या उपुल थरांगाने आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये त्याच्या अनुभवाला साजेशी कामगिरी केलेली नाही. त्याच बरोबर तो श्रीलंकेच्या एकदिवसीय संघाचा कर्णधारही आहे. त्यामुळे त्याच्याकडून चाहत्यांना अजूनही चांगल्या खेळाची अपेक्षा आहे.
भारत: कुलदीप यादव
भारताच्या या चायनामॅन फिरकी गोलंदाजाने श्रीलंकेच्या फलंदाजांना कसोटी मालिकेपासून अडचणीत टाकले आहे. श्रीलंकेच्या गोलंदाजांना त्याला खेळणे अवघड गेले आहे. त्याने पल्लेकेलमधील कसोटी सामन्यत ५ विकेट्स घेतल्या होत्या. पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याला संधी देण्यात आली नव्हती पण मागील सामन्यात यजुर्वेंद्र चहल गोलंदाजी करताना चांगल्या लयमध्ये दिसला नाही त्यामुळे कुलदीप यादवला संधी मिळण्याची पूर्ण शक्यता आहे.
संभाव्य संघ
श्रीलंका: निरोशन डिकेवेल, दानुस्का गुनाथिलका, मॅडिसन, थरंगा (कर्णधार), ऍंजेलो मॅथ्यूज, चामर कटूगेदरा, वानिंदु हसरंगा, थेसार परेर, अकिला दानंजय, लसिथ मलिंगा, दुश्मंत चमेरा.
भारत: रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), के.एल. राहुल, एमएस धोनी , केदार जाधव, हार्डिक पंड्या, अक्षर पटेल , भुवनेश्वर कुमार , कुलदीप यादव, जसप्रित बूमराह.
मागील सामन्यातील कामगिरी
श्रीलंका – हार, हार, विजय, विजय, हार.
भारत – विजय, हार, विजय, विजय, हार.
खेळपट्टीचा अंदाज
नेहमीप्रमाणेच पल्लेकेल येथील खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल राहील आणि प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने किमान ३०० धावा करणे आवश्यक आहे. वातावरण जरी ढगाळ असले तरी तापमान ३१सेल्सियस असेल असा अंदाज आहे.
कर्णधारांची मते
श्रीलंकेचा कर्णधार उपुल थरंगा
“ही एक महत्त्वपूर्ण मालिका आहे कारण आम्ही आयसीसी क्रमवारीत आठव्या स्थानावर आहोत. आम्ही २०१९च्या विश्वचषकासाठी स्वतः पात्र होण्यास अयशस्वी होण्याची शक्यता आहे. भारत गेल्या तीन-चार वर्षांत खूप चांगलं क्रिकेट खेळत आहे, परंतु आम्हाला विश्वास आहे की त्यांना २१०७ चॅम्पियन ट्रॉफीमध्ये जस आम्ही हरवलं होत तसे आम्ही त्याना पुन्हा हरवू शकतो.”
भारतीय कर्णधार विराट कोहली
“मला या खेळपट्टीवर तीन फिरकी गोलंदाज खेळवायचे नाही, मी यापूर्वी येथे खेळलो आहे. हि खेळपट्टी कदाचित वेगवान गोलंदाजांची आहे. हार्दिक पंड्या आमच्यासाठी तीसरा वेगवान गोलंदाजाच काम करेल. ”