---Advertisement---

एकेकाळच्या जग्गजेत्या श्रीलंकन संघाची आज का झाली आहे दारूण अवस्था? घ्या जाणून

On: सोमवार, जुलै 5, 2021 1:12 AM
---Advertisement---

गेले काही दिवस सातत्याने क्रिकेट विश्वातून श्रीलंकन क्रिकेटबद्दल अनेकविध बातम्या समोर येत आहेत. त्यातील तपशील वेगळा असला तरी एक गोष्ट मात्र समान आहे. ती म्हणजे श्रीलंकन क्रिकेट संघाची झालेली दारुण अवस्था. नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौर्‍यावर त्यांना एकही विजय मिळवण्यात यश आले नाही. त्यातच तीन खेळाडूंना इंग्लंडमध्ये बायो बबल तोडून बेशिस्त वर्तन केल्याबद्दल निलंबित केल्या गेले. अजूनही त्यांच्या अव्वल खेळाडूंनी करारावर स्वाक्षरी न केल्याने त्यांच्या पुढील मालिकांचे भविष्य अधांतरीच आहे. दुर्दैवी बाब म्हणजे सततच्या या अपयशाने आता त्यांना २०२३ सालच्या वनडे वर्ल्डकप मध्ये पात्र ठरण्यासाठी देखील संघर्ष करावा लागतो आहे.

साल १९९६ चा वनडे विश्वचषक विजय आणि त्यानंतरची सातत्यपूर्ण कामगिरी यामुळे श्रीलंकेला एकेकाळी क्रिकेट जगताचा वाघ समजले जात होते. मात्र आता या वाघाची शेळी झाली आहे, असे म्हणायची परिस्थिती आली आहे. मात्र ही वेळ का आली, यामागील कारणांचा वेध या लेखाच्या माध्यमातून घेऊया.

श्रीलंकन क्रिकेटच्या या दुर्दशेचे सगळ्यात पहिले कारण म्हणजे दिग्गजांची पोकळी भरून काढण्यात त्यांना आलेले अपयश. १९९६ साली अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्वाखाली त्यांनी वर्ल्डकप जिंकला, त्यानंतर त्यांचा सुवर्णकाळ सुरू झाला. महेला जयवर्धने, कुमार संगकारा, मुथय्या मुरलीधरन या खेळाडूंनी त्यांच्या संघाचा स्तर एका नव्या उंचीवर नेऊन ठेवला. तिलकरत्ने दिलशान, लसिथ मलिंगा यांनी देखील हा वारसा सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र या दिग्गजांच्या निवृत्तीनंतर त्यांच्या तोडीचे खेळाडू श्रीलंकन संघात दिसले नाहीत. खरंतर ही परिस्थिती सगळ्यांच संघांवर येत असते. दिग्गज खेळाडू निवृत्त झाल्यावर काही काळ संघ अडखळत असतो. मात्र पुढच्या पिढीने त्यांची जागा घेतल्यावर संघाची गाडी पुन्हा रूळावर येते. मात्र श्रीलंकन क्रिकेटच्या भरकटलेल्या नावेला किनार्‍यावर आणण्यासाठी त्यांना गुणवान खेळाडूंची अद्यापही प्रतीक्षाच आहे.

श्रीलंकन क्रिकेटच्या अधोगती मागील दुसरे मुख्य कारण म्हणजे खेळाडूंमधील गांभीर्याचा अभाव. खरंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करायला मिळणे, ही अतिशय मानाची गोष्ट असते. मात्र त्यांचे खेळाडू ही गोष्ट गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. इंग्लंड दौर्‍यावर असतांना पाच खेळाडूंनी कराराच्या मुद्द्यावरून संघाचा कॅम्प सोडून जाणे आणि बायो बबल तोडून काही खेळाडूंनी इंग्लंडच्या रस्त्यांवर बेशिस्त वर्तन करणं, यातून त्यांचा हलगर्जीपणाच समोर येतो आहे. त्यातच संघाला एकत्र बांधून ठेवणारा कर्णधार त्यांना गेल्या काही वर्षांत लाभला नाही. उलट सातत्याने कर्णधार बदलतच राहावे लागले. त्यामुळे त्यांचा संघ एकजुट होण्या ऐवजी अधिकच विखुरला गेला.

श्रीलंकन क्रिकेटच्या अपयशाला कारणीभूत असलेली तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नव्या प्रतिभेला कुठलाही वाव न देणं. श्रीलंकेत क्रिकेटसाठीच्या पायाभूत सुविधांची प्रचंड वानवा आहे. अनेक माजी खेळाडूंनी आणि चाहत्यांनी आवाज उठवून देखील स्थानिक प्रतिभेला न्याय देण्यासाठी कुठलीही पद्धतशीर व्यवस्था करण्यात आलेली नाही. अजूनही तळागाळातील खेळाडूंना वर येण्यासाठी संघर्ष करावा लागतो. यात गुणवत्ता असूनही योग्य संधी न मिळाल्याने अनेक दर्जेदार खेळाडू कधीच प्रकाशझोतात येत नाहीत. त्यामुळे आज भारत आणि इंग्लंड सारख्या देशांकडे तयार असणारी दुसर्‍या फळीतील खेळाडूंची यादी श्रीलंकेकडे नाही.

श्रीलंका क्रिकेट संघाच्या या दारुण अवस्थेबद्दल श्रीलंकन चाहत्यांमध्ये कमालीची नाराजी आहे. काही दिवसांपूर्वी श्रीलंकेत त्यामुळे क्रिकेटपटूंना अनफॉलो करण्याची मोहीम चालू होती. तर मिम्सच्या माध्यमातून श्रीलंकन संघाचे सामनेही पाहू नका, असा टोकाचा राग व्यक्त केला जात होता. माजी खेळाडूंनी देखील यावर तीव्र संताप व्यक्त केला होता.

एकेकाळच्या बलाढ्य संघाची ही अवस्था प्रत्येक क्रिकेट रसिकाला अस्वस्थ करणारी आहे. त्यामुळे श्रीलंकेच्या क्रिकेट व्यवस्थापकांनी आणि खेळाडूंनी लवकरात लवकर मार्ग काढावा आणि श्रीलंकन संघाला गतवैभव प्राप्त करून द्यावे, अशीच सगळ्यांची इच्छा असेल.

महत्त्वाच्या बातम्या-

इंग्लंड वि. श्रीलंका वनडे मालिका: श्रीलंकेचा व्हाईटवॉश हुकला, पावसामुळे तिसरा सामना रद्द

मानलं पाहिजे राव! दिल्लीकर फलंदाजाचा टी२०त धुमाकूळ, अवघ्या ७९ चेंडूत झळकावले द्विशतक

अरेरे! ‘बॅट शेजाऱ्याची बायको असते’ म्हणणे दिनेश कार्तिकला पडले महागात, आई अन् पत्नीने खूप ऐकवलं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---