विश्वचषक 2023 स्पर्धेतील पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत असलेले ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका संघ 14व्या सामन्यात आमने-सामने आहेत. लखनऊच्या इकाना स्टेडिअममध्ये रंगलेल्या या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, लंकेच्या सलामीवीरांनी ऑस्ट्रेलियाला पहिल्या विकेटसाठी खूपच संघर्ष करायला लावला. ऑस्ट्रेलिया संघ 22व्या षटकात पहिली विकेट घेण्यात यशस्वी ठरला, पण त्यापूर्वी लंकेच्या सलामीवीरांनी खास विक्रम आपल्या नावावर केला.
श्रीलंकन सलामीवीरांचा विक्रम
या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिस (Kusal Mendis) याने नाणेफेक जिंकत फलंदाजी करणे योग्य समजले. यावेळी त्यांच्याकडून सलामीला फलंदाजी करण्यासाठी पथुम निसांका (Pathum Nissanka) आणि कुसल परेरा (Kusal Perera) मैदानात उतरले होते. यावेळी दोघांनीही टिच्चून फलंदाजी केली. विशेष म्हणजे, दोघांनी शानदार अर्धशतकही झळकावले. त्यांच्यात शंभरहून अधिक धावांची भागीदारी झाली. परेरा आणि निसांका यांनी पहिल्या विकेटसाठी 130 चेंडूंचा सामना करताना 125 धावांची शतकी भागीदारी केली. ही भागीदारी करताच दोघांच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला.
विश्वचषकात श्रीलंका संघाच्या सलामीवीरांची ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरी शतकी भागीदारी ठरली. खरं तर, श्रीलंकेने आपलाच जुना विक्रम मोडला. यापूर्वी 2019च्या विश्वचषकात द ओव्हल मैदानावर दिमुथ करुणारत्ने आणि कुसल परेरा या सलामीवीरांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 115 धावांची शतकी भागीदारी केली होती. अशात, 125 धावांची भागीदारी करत सर्वाधिक सलामी भागीदारीचा नवीन विक्रम रचला गेला.
विश्वचषक 2019पासून श्रीलंकन सलामीवीरांची ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकी भागीदारी
115 धावा- दिमुथ करुणारत्ने आणि कुसल परेरा, विरुद्ध- ऑस्ट्रेलिया, द ओव्हल- 2019
125 धावा- पथुम निसांका आणि कुसल परेरा, विरुद्ध- ऑस्ट्रेलिया, लखनऊ- 2023
दोघांचे अर्धशतक
या सामन्यात सलामीवीर पथुम निसांका 67 चेंडूत 61 धावा करून बाद झाला. त्याच्या या खेळीत 8 चौकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे, हे त्याचे कारकीर्दीतील पाचवे अर्धशतक ठरले. त्याच्याव्यतिरिक्त कुसल परेरा याने 82 चेंडूत 78 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 12 चौकारांचा पाऊस पाडला. या दोघांच्या खेळीमुळे संघ दीडशतकाचा टप्पा पार करण्यात यशस्वी झाला. (Sri Lanka’s 100 Run Opening Partnership in ODI WC since 2019 read here)
हेही वाचा-
पहिल्याच ओव्हरमध्ये स्टार्कची लंकन फलंदाजाला ताकीद, चेंडू टाकण्यापूर्वीच निघालेला क्रीझच्या बाहेर; पाहा व्हिडिओ
बिग ब्रेकिंग! 120 वर्षांनंतर क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश, ‘या’ खेळांनाही हिरवा कंदील