---Advertisement---

सेहवाग-गांगुलीपेक्षा जास्त धावा केल्या, पण त्याच सामन्यात संपली कारकिर्द; शेवटी ऑस्ट्रेलियाशी मिळवला हात

On: सोमवार, फेब्रुवारी 21, 2022 8:28 AM
---Advertisement---

डिसेंबर २००४ मध्ये भारताने केलेला बांगलादेशचा दौरा व त्या दौऱ्यात उभय संघांदरम्यानची वनडे मालिका भारतीय संघाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची ठरली. ३ सामन्यांची ही मालिका भारताने २-१ अशा फरकाने जिंकली. या मालिकेत भारताला प्रथमच बांगलादेशविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, ही मालिका आणखी एका कारणास्तव अधिक खास आहे.

या मालिकेद्वारेच भारताला एमएस धोनीसारखा यष्टीरक्षक मिळाला, जो प्रथम संघाचा महत्त्वाचा खेळाडू आणि त्यानंतर भारताचा सर्वात यशस्वी आणि विश्वविजेता कर्णधार बनला. परंतु अनेकांना माहीत नसेल की, एका भारतीय खेळाडूची कारकीर्दही याच मालिकेतून संपुष्टात आली. जेव्हा सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग आणि धोनीसारख्या फलंदाजांनी नांग्या टाकल्यानंतर त्या खेळाडूने सर्वाधिक धावा केल्या. दुर्दैवाने अखेर तोच सामना त्याच्या कारकीर्दीचा अखेरचा सामना ठरला. हा खेळाडू होता ‘श्रीधरन श्रीराम’. याच श्रीरामचा आज ४६ वा वाढदिवस आहे.

श्रीराम याचा जन्म २१ फेब्रुवारी १९७६ रोजी मद्रास (आताचे चेन्नई) येथे झाला. श्रीरामने डावखुरा फिरकीपटू म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली. दक्षिण आफ्रिका दौर्‍यामध्ये भारताच्या एकोणीस वर्षाखालील संघाकडून खेळताना २९ बळी आपल्या नावे केले. हळूहळू त्याने फलंदाजीमध्येही योगदान देण्यास सुरुवात केली आणि त्याच्या कामगिरीचा आलेख चांगलाच चढू लागला. १९९९-२००० च्या देशांतर्गत हंगामात ५ शतकाच्या मदतीने श्रीरामने भारतीय संघाचा दरवाजा ठोठावला.

निराशाजनक राहिली कारकिर्दीची सुरुवात
देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्याचे बक्षीस लवकरच श्रीराम याला मिळाले. भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नागपूर वनडेमधून त्याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. मात्र, हे पदार्पण त्याच्यासाठी निराशजनक राहिले. गोलंदाजीत महागडा ठरल्यानंतर फलंदाजीतही तो अवघ्या १२ धावा काढू शकला. त्या सामन्यात भारताला पराभवाचे तोंड पहावे लागले. यानंतरही श्रीराम याला त्यावर्षी आणखी पाच सामने खेळण्याची संधी मिळाली. ज्यामध्ये तो फक्त २१ धावा काढू शकला. त्यानंतर पुढील संधीसाठी त्याला आणखी चार वर्षे वाट पाहावी लागली.

चार वर्षानंतर मिळाली संधी
कारकीर्दीच्या अपयशी सुरुवातीनंतर श्रीराम याला २००४ च्या बांगलादेश दौऱ्यावर पुन्हा संधी देण्यात आली. पहिल्या सामन्यात तो ३ धावा काढून बाद झाला. मात्र, गोलंदाजीत त्याने तीन बळी आपल्या नावे केले. दुसऱ्या सामन्यात सर्व फलंदाज अपयशी ठरल्यानंतर श्रीरामने ५७ धावांची सर्वाधिक खेळी केली. तसेच, एक बळीदेखील मिळवला. या सामन्यात भारताचा पराभव झाला. त्यानंतर ही त्याला पुढील सामन्यातून वगळण्यात आले आणि त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची अखेर झाली.

आयसीएलचा झाला भाग
भारतीय संघात निवड होत नसल्याचे पाहून श्रीरामने २००७ मध्ये माजी भारतीय खेळाडूंनी बंडखोररित्या सुरू केलेल्या इंडियन क्रिकेट लीग म्हणजे आयसीएलच्या चेन्नई सुपरस्टार्स संघासोबत करार केला. मात्र, ही स्पर्धा बंद झाल्यानंतर तो २०१० आयपीएल हंगामावेळी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात निवडला गेला. परंतु, तेथेही त्याला जास्त यश लाभले नाही.

प्रशिक्षक म्हणून कमावले नाव
श्रीराम यांनी खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर प्रशिक्षक म्हणून नव्याने कारकीर्द सुरू केली. सुरुवातीला आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स संघासोबत प्रशिक्षक म्हणून काम केल्यानंतर त्याने ऑस्ट्रेलिया गाठले. २०१५ मध्ये श्रीराम ऑस्ट्रेलिया अ संघाचा फिरकी गोलंदाजी सल्लागार झाला. यावेळी त्याने आपल्या कामातून ऑस्ट्रेलियन व्यवस्थापनावर प्रचंड प्रभाव पाडला. पुढे तो ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघाचा एक भाग बनला आणि २०१५ विश्वचषक, ऍशेस मालिका आणि भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौर्यादरम्यान ऑस्ट्रेलिया संघाच्या प्रशिक्षक गटाचा तो भाग राहिला. सध्या तो आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहतो.

देशांतर्गत क्रिकेटचा दिग्गज
श्रीराम याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त आठ वनडे सामने खेळण्यास मिळाले. ज्यामध्ये त्याने ८१ धावांसह ९ बळी आपल्या नावे केले. मात्र, देशांतर्गत क्रिकेटमधील त्याची कामगिरी लक्षणीय राहिली. त्याने १३३ प्रथमश्रेणी सामने खेळताना ५२.९९ च्या शानदार सरासरीने ९५३९ धावा बनवल्या. यामध्ये तब्बल ३२ शतकांचा समावेश होता. तसेच, ८५ बळी घेण्यातही तो यशस्वी ठरला. श्रीरामने आपल्या कारकीर्दीत १४९ लिस्ट ए सामने खेळत ४१६९ धावा व ११५ बळी आपल्या नावे केले.

महत्त्वाच्या बातम्या-

टीम इंडियाचं टेंशन वाढलं! प्रमुख गोलंदाज जखमी, श्रीलंकेविरुद्ध टी२० मालिकेला मुकण्याची शक्यता

मुलगा आवेशच्या पदार्पणाविषयी वडिलांना नव्हती कसलीही कल्पना; म्हणाले, ‘खूप दिवसांपासून वाट पाहात…’

ईशान किशनने ७.७५ कोटींच्या गोलंदाजाला धू धू धुतलं, एकाच षटकात ३ खणखणीत चौकार ठोकले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---