संयुक्त अरब अमिराती (यूएई) व ओमान येथे सातव्या टी२० विश्वचषकातील पात्रता फेरीचे सामने खेळले जात आहेत. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी श्रीलंका व नामिबिया हे संघ आमनेसामने आले होते. अबूधाबी येथील शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने नामिबियाला ७ गडी राखून पराभूत केले. यासह श्रीलंकेने सुपर १२ च्या दिशेने भक्कम पाऊल टाकले.
श्रीलंकेच्या गोलंदाजांची कमाल
टी२० विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच श्रीलंकेवर पात्रता फेरी खेळण्याची नामुष्की ओढवली आहे. अ गटातील या सामन्यात नामिबिया विरुद्ध नाणेफेक जिंकून श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाका याने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय श्रीलंकेच्या सर्व गोलंदाजांनी अचूक ठरविला. महिश थिकशीना, लाहिरू कुमारा व वनिंदू हसरंगा यांनी अतिशय दर्जेदार गोलंदाजीचे प्रात्यक्षिक सादर करत नवख्या नामिबियाचा डाव अवघ्या ९६ धावांवर संपविला. नामिबियासाठी क्रेग विल्यम्सने सर्वाधिक २९ धावा जमविल्या. त्याला इरॅस्मस व स्मित यांनी २० ल १२ धावा बनवून साथ दिली.
श्रीलंकेने आरामात गाठले लक्ष
नामिबियाकडून मिळालेल्या ९७ धावांच्या तुटपुंज्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला २६ धावांमध्ये तीन धक्के बसले. त्यामध्ये दिनेश चंडीमल व कुसल परेरा या अनुभवी फलंदाजांचा समावेश होता. मात्र, अविष्का फर्नांडो व भानुका राजपक्षे यांनी ७४ धावांची अभेद्य भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. दोघांनी अनुक्रमे ३० व ४२ धावा काढल्या. तीन बळी मिळवणाऱ्या थिकशीना याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
सुपर १२ फेरी गाठण्याचे श्रीलंकेचे लक्ष
पहिल्या सामन्यातील विजयानंतर श्रीलंकेला याच गटातील आयर्लंड व नेदरलँड्स या संघांशी भिडावे लागेल. या गटामध्ये अव्वल राहणारा संघ सुपर १२ मध्ये ब गटात समाविष्ट होईल. तर दुसऱ्या स्थानी राहिलेल्या संघाला अ गटामध्ये सामील करण्यात येईल. श्रीलंकेचा पुढील सामना आयर्लंडशी होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडविरुद्ध सराव सामना जिंकल्यानंतरही ‘या’ दोन गोलंदाजांनी वाढवली टीम इंडियाची चिंता
“काहीतरी चमत्कारच मुंबई इंडियन्सला…”; पुढील हंगामाबाबत रोहितचे मोठे वक्तव्य