संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे सुरु असलेल्या टी२० विश्वचषकात गुरुवारी (४ नोव्हेंबर) दुसऱ्या सामन्यात अ गटातील वेस्ट इंडिज आणि श्रीलंका हे संघ आमने-सामने आले. अबुधाबी येथील शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने वेस्ट इंडीजचा २० धावांनी पराभव केला. या विजयासह श्रीलंकेने आपली विश्वचषक मोहीम विजयाने समाप्त केली. तसेच, वेस्ट इंडीज संघाचे स्पर्धेतील आव्हान अधिकृतरित्या संपुष्टात आले. शानदार अर्धशतकी खेळी करणारा श्रीलंकेचा चरिथ असलंका सामन्याचा मानकरी ठरला.
श्रीलंकेची शानदार फलंदाजी
या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्डने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेसाठी कुसल परेरा व पथुम निसंका यांनी ४२ धावांची सलामी दिली. परेरा बाद झाल्यानंतर निसंका व चरिथ असलंका यांनी दुसऱ्या गड्यासाठी ८९ धावांची शानदार भागीदारी केली. निसंका ५१ तर असलंका ६८ धावा काढून माघारी परतला. कर्णधार दसुन शनाकाने नाबाद २५ धावांची खेळी करत संघाला १८९ धावांपर्यंतच मजल मारून दिली. वेस्ट इंडीजसाठी आंद्रे रसेलने दोन बळी मिळवले.
श्रीलंकेने रोखले वेस्ट इंडिजला
श्रीलंकेने दिलेल्या १९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. अनुभवी ख्रिस गेल व एविन लुईस ही सलामी जोडी अवघ्या १० धावांमध्ये माघारी परतली. यष्टीरक्षक निकोलस पूरन याने ३४ चेंडूमध्ये ४६ धावांची शानदार खेळी केली. मात्र कर्णधार पोलार्ड, आंद्रे रसेल, ड्वेन ब्रावो व जेसन होल्डर हे अनुभवी खेळाडू दुहेरी आकड्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. युवा फटकेबाज शिमरन हेटमायर याने ८० धावांची नाबाद खेळी केली. श्रीलंकेसाठी वनिंदू हसरंगा, बिनूरा फर्नांडो, चमिका करूणारत्ने यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
महत्त्वाच्या बातम्या-
https://mahasports.in/australia-perfect-location-for-india-pakistan-bilateral-series/