कोरोना महामारीनंतर क्रिकेटजगत पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. इंग्लंड व ऑस्ट्रेलियात मैदानांवर प्रेक्षक पहायला मिळत आहेत. जगातील सर्वात मोठी व्यवसायिक क्रिकेट लीग असलेली आयपीएल विनाप्रेक्षक निर्विघ्न पार पडली. हे सर्व असताना, भारतीय उपखंडात अजून एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला गेला नाही. मात्र, आता उपखंडातील क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपणार आहे. श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यातील रद्द झालेली कसोटी मालिका आता पुढील वर्षाच्या सुरुवातीस खेळवली जाईल.
कोरोना महामारीमुळे रद्द झाला होता दौरा
श्रीलंका आणि इंग्लंड यांच्या दरम्यान मार्च महिन्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार होती. त्यासाठी इंग्लंड संघ श्रीलंकेत दाखलही झाला होता. मात्र, कोरोना या साथीच्या आजाराची प्रचंड लाट आल्याने हा दौरा रद्द केला गेलेला. इंग्लंड संघ या दौऱ्यावर एक सराव सामनाही न खेळता मायदेशी परतला होता. त्यानंतर, कोरोना महामारीने थैमान घातल्याने ही मालिका पुन्हा सुरू होण्याची चिन्हे दिसत नव्हती. आता मात्र, या आजाराचा प्रादुर्भाव कमी झाल्याने, जानेवारी महिन्यात ही मालिका खेळवली जाईल. इंग्लड क्रिकेट बोर्डाने पुष्टी केली आहे.
असा असेल दौरा
इंग्लंडचा संघ श्रीलंका दौऱ्यावर दोन कसोटी सामने खेळेल. २ जानेवारी रोजी इंग्लंड संघ श्रीलंकेला प्रयाण करेल. त्यानंतर, संपूर्ण संघाला हंबनटोटा येथे क्वारंटाईन केले जाईल. इंग्लंड संघाला ट्रेनिंग करण्याची मुभा असेल. ५-९ जानेवारीदरम्यान इंग्लंड संघ हंबनटोटा येथील महिंदा राजपक्षे स्टेडियमवर सराव करू शकतो. मालिकेतील पहिला सामना १४-१८ जानेवारीदरम्यान तर दुसरा सामना २६-३० जानेवारीदरम्यान खेळवला जाईल. दोन्ही सामने हंबनटोटा येथेच होतील.
या मालिकेच्या समाप्तीनंतर इंग्लंडला भारताविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. मात्र, ही मालिका भारतात खेळवली जाणार का? हा मोठा प्रश्न आहे. भारतात कोरोनाचा प्रभाव कमी न झाल्यास, ही मालिका युएईमध्ये होऊ शकते.
संबधित बातम्या:
– तब्बल चौदा वर्षांनंतर हा संघ खेळणार पाकिस्तानात; केली गेली दौऱ्याची अधिकृत घोषणा
– ब्रेकिंग! दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड संघातील वनडे मालिका अनिश्चित काळासाठी स्थगित
– ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का; डेविड वॉर्नर पहिल्या कसोटीतून बाहेर; हा खेळाडू पदार्पण करण्याची शक्यता