टी20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) आठव्या हंगामासाठी भारतीय संघ जाहीर झाला. 15 जणांच्या या संघामध्ये रोहित शर्मा कर्णधार तर केएल राहुल उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. तसेच चार खेळाडूंना राखीव स्वरूपात संघात घेतले आहे. ऑस्ट्रेलियाची परिस्थिती पाहता भारतीय संघनिवडकर्त्यांनी हा निर्णय घेतला आहे. या राखीव खेळाडूंमध्ये दीपक चाहर, मोहम्मद शमी, रवि बिश्नोई आणि फलंदाज म्हणून श्रेयस अय्यर यांचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये 16 ऑक्टोबरपासून खेळल्या जाणाऱ्या या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा सोमवारी (12 सप्टेंबर) करण्यात आली. तेथील खेळपट्टी पाहता मोहम्मद शमी (Mohammed Shami) याला राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले. त्याने 2021च्या टी20 विश्वचषकापासून भारतासाठी एकही टी20 सामना खेळलेला नाही. ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांसाठी पूरक ठरतात आणि शमी फलंदाजांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. तसेच दीपक चाहर (Deepak Chahar) यालाही संघात जागा दिली गेली नाही. तो नुकत्याच झालेल्या आशिया चषक स्पर्धेतही राखीव खेळाडूंमध्ये होता. मात्र आवेश खान संघाबाहेर झाल्याने त्याला मुख्य संघात घेतले गेले.
विश्वचषकासाठीच्या भारताच्या मुख्य संघात आर अश्विन, युझवेंद्र चहल आणि अक्षर पटेल या फिरकीपटूंचा समावेश आहे. यामुळे रवि बिश्नोई याला राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले. त्याने याचवर्षी भारताच्या टी20 संघात पदार्पण केले. तसेच त्याला आशिया चषकातील सुपर फोरमध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात संधी मिळाली होती. त्याने एक विकेटही घेतली होती. याच कामगिरीने त्याने निवडकर्त्यांचे लक्ष वेधले. तर फलंदाजीत श्रेयस अय्यर याला राखीव खेळाडू म्हणून घेतले आहे. कारण आयसीसीच्या नियमानुसार कोणी एखादा खेळाडू बाहेर झाला तर राखीवमधील खेळाडूंना संघात घेता येते.