आयपीएल 2020 चे अधिकृत प्रसारण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्सने रविवारी समालोचन पॅनलच्या नावांची घोषणा केली. दिग्गज क्रिकेट समालोचक हर्षा भोगलेसह भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार खेळाडू सुनील गावस्कर, इयान बिशप आणि इतरही मोठे चेहरे यावेळी समालोचन करताना दिसणार आहे.
असे असले तरी प्रत्येक आयपीएलमध्ये दिसणारा एक खास चेहरा यावेळी समालोचन करताना दिसणार नाही. तो चेहरा म्हणजे भारताचे माजी क्रिकेटपटू व तेवढेच महान समालोचक संजय मांजरेकर होय.
यावेळी स्टार स्पोर्ट्सने हिंदी आणि अन्य भाषांमध्ये समालोचन करण्यासाठी स्वतंत्र यादी प्रसिद्ध केलेली आहे. मांजरेकरांचे नाव या दोनही याद्यांमध्ये नाही.
इंग्रजी भाषेतील समालोचकांच्या पॅनलमध्ये मार्क निकोलसदेखील दिसतील. ते सहसा दक्षिण आफ्रिकेच्या घरगुती सामन्यांचे समालोचन करताना दिसतात. एकेवेळी आयपीएलच्या वेगवेगळ्या संघांकडून खेळलेला आणि दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केलेला जेपी ड्युमिनीदेखील या पॅनलचा सदस्य असेल.
या यादीमध्ये ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार लिसा स्थलेकर आणि भारतीय क्रिकेट संघाची माजी कर्णधार अंजुम चोप्रा या दोन महिला समालोचकांचाही समावेश आहे. आयसीसी हॉल ऑफ फेम लिसा यापूर्वीही आयपीएलच्या समालोचन पॅनलची एक भाग राहिली आहे.
भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार राहिलेल्या अंजुम चोप्राला भारतीय क्रिकेटमध्ये महिलांचा आवाज म्हणून ओळखली जाते.
72 वर्षीय गावस्कर समालोचन करण्यासाठी युएईला जाणार आहेत. ब्रेट ली, डीन जोन्स, ब्रायन लारा, ग्रॅमी स्वान आणि स्कॉट स्टाइरिस हे दिग्गज मात्र मुंबईत समालोचन करतील.
के. श्रीकांत तमिळ भाषेत आणि एमएसके प्रसाद तेलगू भाषेत समालोचन करेल. श्रीकांत भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे माजी प्रमुख राहिले आहेत तर भारतीय संघाचे माजी सहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर हे हिंदी भाषेत समालोचन करताना दिसतील.
स्टार स्पोर्ट्सचे आयपीएल २०२०साठी हिंदी समालोचक-
आकाश चोपडा, इरफान पठाण, आशिष नेहरा, जतिन सप्रू, निखिल चोपडा, किरण मोरे, अजित आगरकर आणि संजय बांगर.
स्टार स्पोर्ट्सचे आयपीएल २०२०साठी इंग्रजी समालोचक-
इयान बिशप, सायमन डॉल, कुमार संगकारा, हर्षा भोगले, सुनील गावस्कर, रोहन गावस्कर, दीप दासगुप्ता, शिव रामकृष्णन, अंजुम चोपडा, मुरली कार्तिक, मार्क निकोलस, केविन पीटरसन, जेपी डुमिनी, लिसा स्टेलकर, डॅरेन गंगा, पोमी बांगवा, मायकेल स्लेटर आणि डॅनी मॉरिसन.
डगआऊटसाठी समालोचन यादीमध्ये समाविष्ट केलेली नावे:
डीन जोन्स, स्कॉट स्टायरिस, ब्रायन लारा, ब्रेट ली आणि ग्रॅम स्वान.