आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचे बिगुल वाजले आहे. पुढील महिन्यात खेळाडूंचा लिलाव होणार असल्याच्या बातम्या पुढे येत आहेत. हा एक मिनी लिलाव असेल, ज्यामध्ये सर्व संघांकडे आवश्यक असलेल्या रिक्त जागा भरण्याची संधी आहे. भारताचे माजी कसोटीपटू व प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांनी आयपीएल २०२१ च्या लिलावाविषयी एक अंदाज लावला. क्रिकेट भाष्यकार म्हणून नाव कमावलेल्या आकाश चोप्रा यांचा हा अंदाज भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या संघाशी संबंधित आहे.
आरसीबीच्या नियोजनाविषयी मांडलेली मते
भारतीय कर्णधार विराट कोहलीचा संघ अर्थात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर म्हणजेच आरसीबी या आयपीएलममधील मोठ्या फ्रेंचायझीबद्दल आकाश चोप्रा यांनी मते मांडली. ते म्हणाला की, “आरसीबी ऑस्ट्रेलियाच्या एका मोठ्या गोलंदाजाच्या मागे पडेल. तो वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आहे. विराटचा संघ त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. मात्र, त्याचवेळी ते म्हणाले की, पुढच्या आयपीएल लिलावासाठी तसेच हंगामासाठी स्टार्क उपलब्ध आहे की नाही हेदेखील पाहणे रंजक ठरेल.”
आरसीबीसाठी खेळला आहे स्टार्क
मिचेल स्टार्कने २०१४ मध्ये आरसीबीसाठी खेळताना आयपीएल पदार्पण केले होते. जगातील सर्वोत्तम व्यवसायिक टी२० लीग असलेल्या आयपीएलमध्ये स्टार्कने २७ सामने खेळताना ३४ बळी मिळवले आहेत. त्याचे सर्वोत्कृष्ट गोलंदाजी प्रदर्शन १५ धावा देऊन ४ बळी असे आहे. आयपीएल २०१८ मध्ये स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या संघात निवडले होते मात्र, दुखापतीमुळे तो स्पर्धेत सहभागी होऊ शकला नाही.
१५ ते १९ कोटी रुपये लागू शकते बोली
आकाश चोप्रा यांनी स्टार्क या लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरेल अशी भविष्यवाणी केली. स्टार्कच्या किमतीविषयी बोलताना ते म्हणाले, “आरसीबीकडे ११ जागा शिल्लक आहेत. त्यातील तीनच जागा परदेशी खेळाडूंसाठी असणार आहेत. सध्या आरसीबीकडे परदेशी खेळाडू म्हणून एबी डिव्हिलियर्स, ऍडम झम्पा, जोशुआ फिलिप, केन रिचर्डसन आणि डॅनियल सॅम्स आहेत. यातील चार जण अंतिम अकरामध्ये असतील की नाही याबाबत शंका आहे. अशा परिस्थितीत आरसीबी मिशेल स्टार्कला संघात घेऊ शकते. स्टार्क संपूर्ण हंगामात उपलब्ध राहणार असेल तर १५ ते १९ कोटीपर्यंतची बोली त्याच्यावर लागू शकते.”
आकाश चोप्रा यांच्या म्हणण्यानुसार, आरसीबी व्यवस्थापन ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीनवरही बोली लावण्याची शक्यता आहे. जेणेकरून मधली फळी भक्कम होईल. याशिवाय इंग्लंडचा जेसन रॉय आणि डेव्हिड मलन हेही चॅलेंजर्सच्या रडारवर असतील. आयपीएलचा लिलाव १८ किंवा १९ फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या:
आयपीएल २०२१: सलग २ वर्षे फ्लॉप ठरलेल्या मॅक्सवेलसाठी यंदा लागणार १० कोटींची मोठी बोली !
जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर पड्डीकलची कमाल, ११ धावा करूनही केला खास विक्रम