मुंबई शहर, मुंबई उपनगर,पुणे, कोल्हापूर, सांगली, जळगाव,यजमान परभणी यांनी कुमार, तर कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, अ. नगर यांनी कुमारी गटात विजयी सलामी दिली. महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या मान्यतेने परभणी जिल्हा कबड्डी असो. ज्ञानसंगोपन सेवाभावी संस्था, जिंतूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.७डिसें. पासून कबड्डीमहर्षी शंकरराव (बुवा) साळवी क्रीडानगरी, नूतन महाविद्यालय, जिंतूर, परभणी येथे या स्पर्धेला सुरुवात झाली.
मुलांच्या फ गटात मुंबई शहरने लातूरला ५४-२२ असे नमवित विजयी सुरुवात केली. पण सख्खे शेजारी ठाणे यांनी नंतरच्या सामन्यात मुंबईची चांगलीच दमछाक केली. शेवटी मध्यांतरातील १४-२०अशा पिछाडीवरून मुंबईने ठाण्याला ३२-३२ असे बरोबरीत रोखले. या दोन्ही सामन्यात मुंबईच्या पंकज मोहितेचा अष्टपैलू खेळ, त्याला अवधूत शिंदेंची मिळालेली चढाईची, तर अमित मानेची मिळालेली पकडीची साथ या मुळे ही बरोबरी शक्य झाली. ठाण्याच्या परेश हांडे, अस्लम इनामदार यांना अन्य सहकाऱ्याची म्हणावी तशी साथ मिळाली नाही. म्हणून त्यांना या सामन्याचे विजयात परिवर्तन करणे जमले नाही.
मुलांच्या ड गटात पालघरने धुळ्यावर ४१-०९अशी सहज मात केली.पालघरच्या या विजयात राहुल सावर चमकला. धुळ्याच्या जयेश सुर्यवंशीने बरी लढत दिली. ब गटात पुण्याने साताऱ्याला ४५-२५असे पराभूत करीत आगेकूच केली. मध्यांतराला २४-१५अशी आघाडी घेणाऱ्या पुण्याने दुसऱ्या डावात मात्र सावध खेळ केला. शुभम शेळके, मयूर सुर्वे, सुजित लांडगे यांचा खेळ या विजयात महत्वाचा ठरला.
मुलींच्या फ गटात मुंबई उपनगरने औरंगाबादचा ४४-१२असा धुव्वा उडविला. प.डा. उपनगरकडे २७-०६अशी आघाडी होती. नंतर मात्र त्यांनी सामन्यावरील आपली पकड ढिली केली. शुभदा खोत, प्रतीक्षा मांडवकर, कोमल खैरे, करीना कामतेकर या विजयाच्या शिल्पकार ठरल्या. ब गटात साताऱ्याने सोनाली हेळवेच्या झंजावती खेळाच्या जोरावर नाशिकचा ४६-३१असा पाडाव केला. नाशिकच्या निकिता धोत्रेने संघाचा पराभव टाळण्याचा आटोकाट प्रयत्न केला. क गटात रत्नागिरीने बीडवर ३९-१०असा विजय मिळविला. तसमीन बुरोंडकर, सोनाली कदम, दिव्या सकपाळ, गौरी पवार यांच्या चढाई-पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. बीडची कोमल ससाणे एकाकी लढली.
इतर निकाल संक्षिप्त – मुली :- १)कोल्हापूर वि वि उस्मासनाबाद ड गट (६०-१०); २)अहमदनगर वि वि परभणी (४५-१९). इ गट.
मुले :- १) पालघर वि वि धुळे (४१-०९) ड गट, २)रत्नागिरी वि वि सिंधुदुर्ग (३६-२८) ब गट, ३)कोल्हापूर वि वि नाशिक (४३-३४)अ गट, ४)सांगली वि वि सोलापूर (४८-२५) क गट, ५) ठाणे वि वि जालना (६३-२५) फ गट, ५) परभणी वि वि हिंगोली (५१-३०) अ गट, ६)जळगाव वि वि नंदुरबार (५०;२३) ड गट, ७) उपनगर वि वि उस्मानाबाद (५२-१६) क गट.
महत्त्वाच्या बातम्या:
–असा पराक्रम करणारा कोहली ठरला केवळ चौथा भारतीय
–भारताच्या या बॅडमिंटनपटूचे मतदार यादीतून नाव झाले गायब
–होय! कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात गंभीरची चमकदार कामगिरी
–किंग कोहलीचा आॅस्ट्रेलियामध्ये विराट विक्रम