ऍडलेड। ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघात सध्या ऍशेस मालिका २०२१-२२ सुरू असून दुसरा कसोटी सामना ऍडलेड येथे खेळवण्यात येत आहे. दिवस-रात्र स्वरुपात खेळला जाणाऱ्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्त्व स्टीव्ह स्मिथ करत आहे. तब्बल ४ वर्षांनंतर स्मिथ ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणून मैदानात उतरलेला दिसला.
म्हणून स्मिथ करतोय नेतृत्त्व
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ऍशेस मालिकेच्या पूर्वी टीम पेनने नेतृत्त्वाची जबाबदारी सोडल्याने पॅट कमिन्सला नवा कसोटी कर्णधार म्हणून नियुक्त केले होते. तसेच स्मिथला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, दुसऱ्या ऍशेस कसोटी सामन्यापूर्वी कमिन्स कोरोनाबाधित व्यक्तीच्या जवळच्या संपर्कात आल्याने त्याला या सामन्याला मुकावे लागले आहे. त्याचमुळे स्मिथला प्रभारी कर्णधार म्हणून दुसऱ्या ऍशेस सामन्यात जबाबदारी सांभाळावी लागली आहे. तसेच ट्रेविस हेड प्रभारी उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळत आहे.
स्मिथ ४ वर्षांनी कर्णधाराच्या भूमीकेत
स्मिथला नेतृत्त्वाचा मोठा अनुभव आहे. त्याने यापूर्वी देखील ऑस्ट्रेलियाचे नेतृत्त्व केले आहे. स्मिथने अखेरच्या वेळी मार्च २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियाचे केपटाऊन येथे दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध नेतृत्त्व केले होते. पण त्याच सामन्यात चेंडू छेडछाड प्रकरण झाले आणि स्मिथला कर्णधारपदावरून पायउतार व्हावे लागले.
चेंडू छेडछाड प्रकरणामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कठोर पावले उचलत तात्कालिन कर्णधार स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरवर १ वर्षांची क्रिकेट खेळण्यावर बंदी घातली होती. तसेच स्मिथवर नेतृत्त्वासाठी दोन वर्षांची आणि वॉर्नरवर आजन्म बंदी घातली होती. त्यानुसार २०२० मध्ये स्मिथवरील नेतृत्त्वाची बंदी संपली आणि तो चांगल्या लयीतही खेळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार बनण्याचा प्रमुख दावेदार बनला होता.
अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी देखील स्मिथला पुन्हा ऑस्ट्रेलियाचे कर्णधार करावे, असे म्हटले होते. मात्र, २०१८ नंतर ऑस्ट्रेलियाचे कसोटी कर्णधारपद नियमीतपणे टीम पेन निभावत होता, तर मर्यादीत षटकांचे कर्णधारपदी ऍरॉन फिंच आहे. त्यामुळे स्मिथला पुन्हा नेतृत्त्व गटात येण्यासाठी प्रतिक्षा करावी लागली. पण, ऍशेस मालिकेपूर्वी पेनवर काही आरोप झाले आणि त्याने कर्णधारपद सोडले. त्यामुळे गेले काही महिन्यांपासून कसोटी संघाचे उपकर्णधारपद सांभाळत असलेल्या कमिन्सला नवा कसोटी कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आणि स्मिथला उपकर्णधार करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या –
जरा इकडे पाहा! टी२० मध्ये सहा षटकार खाणाऱ्या ब्रॉडचा कसोटी क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम
‘दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकण्याचे ध्येय’, कर्णधार विराट कोहलीचा निर्धार
अफगाणिस्तान २०१८ नंतर येणार भारतीय दौऱ्यावर, असे आहे संपूर्ण वेळापत्रक