सिडनी कसोटीतील स्टीव्ह स्मिथचे शतक अत्यंत खास आहे, कारण या शतकासह त्याने इंग्लंडचे दिग्गज क्रिकेटपटू जॅक हॉब्स यांना मागे टाकले आहे. स्मिथचे हे 13 वे ॲशेस शतक आहे. आता तो या प्रसिद्ध मालिकेच्या इतिहासात सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
या शतकामुळे स्टीव्ह स्मिथने इंग्लंडचे महान फलंदाज जॅक हॉब्स यांना मागे टाकले, ज्यांनी 1908 ते 1930 दरम्यान 12 शतके झळकावली होती. ऑस्ट्रेलियाचा सध्याचा कसोटी कर्णधार आता फक्त महान सर डॉन ब्रॅडमन यांच्या मागे आहे, ज्यांनी 37 ॲशेस कसोटीत 19 शतके केली होती. मात्र, ब्रॅडमन यांचा विक्रम मोडणे सध्या तरी सोपे वाटत नाहीये.
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 110 व्या षटकात जेकब बेथेलचा सामना करताना, स्टीव्ह स्मिथने ऑफ स्टंपच्या बाहेर येत चेंडू लॅप-पुल केला आणि 3 धावा पूर्ण केल्या. यासह त्याचे 37 वे कसोटी शतक पूर्ण होताच सिडनीच्या चाहत्यांनी उभे राहून टाळ्या वाजवल्या, तर स्मिथनेही बॅट उंचावून प्रेक्षकांचे आभार मानले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कांगारू कर्णधार 129 धावांवर नाबाद होता.
या कामगिरीमुळे स्टीव्ह स्मिथला आंतरराष्ट्रीय कसोटी शतकांच्या शर्यतीत मोठी आघाडी मिळाली आहे. आता त्याच्या पुढे फक्त सचिन तेंडुलकर (51), जॅक कॅलिस (45), रिकी पाँटिंग (41), जो रूट (41) आणि कुमार संगकारा (38) हेच खेळाडू आहेत. ही आकडेवारी सांगते की, आधुनिक कसोटी क्रिकेटमध्ये स्मिथ किती महान खेळाडू आहे.






