दुबई | ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथला सरावादरम्यान डोक्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो इंग्लंडविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत खेळू शकला नव्हता. डोक्याला दुखापत झाल्यामुळे स्टीव्ह स्मिथ ‘कनक्शन प्रोटोकॉल’ पाळत असल्याची माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) गुरुवारी दिली. आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार असलेला स्टीव्ह स्मिथच्या फिटनेसवर कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नसल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले आहे.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचे म्हणणे आहे की स्मिथचा क्रिकेटमध्ये पुनरागमन व्हावे यासाठी ते राजस्थान रॉयल्स संघाबरोबर काम करत आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे क्रीडा विज्ञान विभागाचे प्रमुख अॅलेक्स क्वॉन्टोरीस यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, “डोक्याच्या दुखापतीचा परिणाम खेळाडूवर होतो. त्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे कठोर मार्गदर्शक तत्त्वे आहेत आणि आम्ही त्याचाशी कोणतीही तडजोड करणार नाही.”
ते म्हणाले, “स्टीव्ह चांगली प्रगती करत आहे आणि खेळात परतण्यासाठी “कनक्शन प्रोटोकॉल’ च्या माध्यमातून तो आमच्या वैद्यकीय संघाशी जोडला गेला आहे.”
स्मिथशिवाय इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघांचे क्रिकेटपटू गुरुवारी रात्री युएई थेथे दाखल झाले आहेत. त्यानंतर ते सहा दिवस क्वारंटाईन राहतील. म्हणजेच ते 23 सप्टेंबरपर्यंत सामना खेळू शकणार नाहीत.
राजस्थान रॉयल्स संघाचा पहिला सामना 22 सप्टेंबरला चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध होणार आहे. स्मिथ बरा झाला आहे पण अद्याप स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्यास पूर्णपणे तंदरुस्त नाही. कॉन्टोरीस म्हणाले की, “स्मिथ युएईमध्ये आल्यानंतर फ्रँचायझी आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया त्याच्या फिटनेसवर एकत्र काम करेल.”