-सचिन गोरडे पाटील
साधारण २०१३च्या दरम्यान पुण्यातील मेरीयट हॉटेलच्या कॉफीशॉपमध्ये एक गोरा पोरगा कोणाची तरी वाट पाहत बसला होता. जाणारे येणारे त्याकडे कुतूहलाने पाहत होते मात्र हे जग क्षणभंगूर असल्याप्रमाणे कोणाकडेही लक्ष न देता तो पोरगा उगचं बसायचे म्हणुन तेथे रेगाळत होता.
मला त्याला कुठेतरी पाहिल्यासारखे वाटतं होते, पण कुठे ते आठवत नव्हते. थोड्या वेळाने कोणी तरी त्याच्या सोबत फोटो काढताना दिसले. तेव्हा कळले हा ऑस्ट्रेलीयन क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज ‘स्टिव स्मिथ’ आहे.
काही वेळाने मी आणि माझे दिवगंत मित्र माजी आमदार राजीव राजळे यांनी त्याच्याशी (नगरी इंग्रजीत) संवाद साधला. राजीवभाऊ तसा जग फिरलेला माणूस असल्यामुळे त्याने सहज स्मिथला बोलत केलं.
मग कळलं तो ‘आयपीयल’ सामन्यासाठी भारतात आला आहे. बोलण्याच्या ओघात राजीवभाऊ आर्किटेक असून ते राजकारणात आहेत हे कळल्यावर स्मिथ म्हणाल होता ‘राजकारण आणि क्रिकेट दोन्ही सारखीचं क्षेत्रे आहेत. या दोन्ही क्षेत्रात जय-पराजय, कुरघोड्या आणि सतत सजग रहावे लागते, अन्यथा तुम्ही कालबाह्य होण्याचा धोका असतो.’
राजीवभाऊंनी आत्मशांतीबद्दल आपले मत मांडत रजनीश ओशो, भगवान बुध्द याचे तत्वज्ञान सांगत आवतार मेहरबाबा आश्रमाला त्याने भेट द्यावी अशी विनंती केली होती. दोन तास कोणताही बडेजाव न ठेवता स्मिथ आमच्याशी गप्पा मारत बसला होता. (राजीव राजळे यांच्या नगर लोकसभा निवडणूकीसाठी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या तिकीटासाठी त्या दिवशी ते पवार साहेबांना भेटणार होते)
काही वेळाने स्मिथची त्यावेळची गर्लफ्रेंड ‘डॅनी विल्स’ तेथे येऊन बसली होती. मग जागतिक संगितावर चर्चा सुरु झाली. यावर मात्र स्मिथ मनापासुन बोलताना दिसला. यावेळी त्याने त्याच्याकडील विविध गाणे ऐकवले होते. ही भेट झाल्यावर नंतर राजीवभाऊ म्हणाले होते, ‘पोरग मोठ होईल’
.
त्याकाळी स्मिथ त्याच्या संघात सहा नंबरला बॅटींग करत होता तर संघात त्याचा समावेश फक्त बॉलर म्हणुन होत असे. काळाच्या ओघात त्याने आपली बॅटींग स्टाईलमध्ये दोनशे टक्के सुधारणा करत, तो त्या संघाचा अष्टपैलु खेळाडु म्हणुन उदयास आला. पुढे तो संघाचा कर्णधार झाला.
ड़ॉन ब्रैडमॅन आणि सुनिल गावस्कर नंतर कसोटीत कमी कालावधीत 21 शतके करण्याच्या विक्रम त्याने आपल्या नावावर कोरला.
टीम ऑस्ट्रेलियाच्या पुर्वसुरी कर्णधाराप्रमाणे जिकंण्यासाठी ‘वाटेल ते’ करण्याचे संस्कार स्मिथवर झाले. ‘प्रोफेशनल’च्या नावाखाली सभ्य क्रिकेटचा विसर आत सगळ्यांनाच पडत आहे. चेंडु कुरतडण्याचे प्रकार क्रिकेट विश्वात नवीन नाहीत. मात्र आता ‘आनंदासाठी क्रिकेट’ची जागा ‘स्टायलीश क्रिकेटने’ घेतली आणि जिकंण्याची स्पर्धा वाढीस लागली. याचा बळी स्मिथ ठरला. भारतीय क्रिकेटमध्येही कमी अधिक प्रमाणात हेच सुरु आहे.
पत्रकार परिषदेत घडल्या प्रकारची जबाबदारी स्विकारत देशाची आणि फॅनची माफी मागत त्यांने आश्रुंना वाट मोकळी करुन दिली. त्याला रडतांना पाहुुन मला त्याची भेट सहज आठवली, आज राजाभाऊ या जगात नाहीत पण त्यांनी स्मिथला त्याभेटीत टॅबवर ऐकवलेलं इटली, फ्रान्स, आणि पाकिस्तानचं राष्ट्रगीत व त्याच तन्मयतेने ऐकणार स्मिथ मला नेहमी स्मरणात राहीला आहे.
टीव्हीवर स्मिथला रडतांना पाहिलं आणि माझ्या ही डोळ्यात पाणी आलं, वाटलं ‘सामना जिंकण्याच्या नादात याचेही आयुष्य कुरतडले जाऊ नये.’
ता.क.- महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा (मोक्का) प्रमाणे चेंडुशी छेडछाड केल्याप्रकरणी टीम ऑस्ट्रेलीयाचा कर्णधार स्ट्रीव स्मिथ व त्याच्या सहकार्यांवर ऑस्ट्रेलीयन क्रिकेट मंडळनाने एक वर्षाची बंदी घातली खरी, पण मानधनाच्या वाढीसाठी केलेल्या बंडखोरीच्या अंतर्गत वादाचा फटका बसल्याचा वास या कारवाईला आहे, अशी चर्चा जागतिक क्रिकेट विश्वामध्ये आहे.