स्मिथ पुन्हा एकदा नंबर-१; कोहलीची कसोटी क्रमवारीत घसरण

सोमवारी(2 सप्टेंबर) भारताने वेस्ट इंडीज विरुद्ध सबिना पार्क, किंग्स्टन येथे दुसऱ्या कसोटी सामन्यात 257 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच भारताने 2 सामन्यांची कसोटी मालिका 2-0 अशी जिंकली. या मालिकेनंतर आज(3 सप्टेंबर) आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहिर केली आहे.

या क्रमवारीत फलंदाजांमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीला त्याचे अव्वल स्थान गमवावे लागले आहे. तो आता या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर घसरला असून ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथने अव्वल स्थान पुन्हा मिळवले आहे.

विराट वेस्ट इंडीज विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात 76 धावा केल्यानंतर दुसऱ्या डावात शून्य झावेवर बाद झाला होता. त्यामुळे विराटचे आता कसोटी क्रमवारीत आता 903 गुण झाले आहेत.

तसेच अव्वल क्रमांकावर पुन्हा एकदा विराजमान झालेल्या स्मिथचे 904 गुण आहेत. स्मिथला विराट आणि त्याच्यामधील असणारी केवळ 1 गुणांची आघाडी उर्वरित ऍशेस मालिकेतून वाढवण्याची संधी आहे. ऍशेस मालिकेतील अजून चौथा आणि पाचवा कसोटी सामना बाकी आहे.

स्मिथ डिसेंबर 2015 पासून कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर होता. पण मागील वर्षी मार्चमध्ये झालेल्या चेंडू छेडछाड प्रकरणी त्याच्यावर 1 वर्षांची बंदी सुरु असताना ऑगस्ट 2018 मध्ये विराटने त्याला मागे टाकत अव्वल स्थान मिळवले होते.

परंतू ही एक वर्षांची बंदी पूर्ण करुन स्मिथने ऍशेस मालिकेतून कसोटीत शानदार पुनरागमन केले. त्याने पहिल्याच ऍशेस कसोटीत दोन्ही डावात शतकी खेळी केली. तर दुसऱ्या ऍशेस कसोटीत पहिल्या डावात 92 धावांची अर्धशतकी खेळी केली. या सामन्यात तो जोफ्रा आर्चरचा चेंडू लागल्याने दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे तो तिसऱ्या कसोटीत खेळला नाही.

या कसोटी क्रमवारीत विराटची जरी घसरण झाली असली तरी भारती कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने पहिल्या 10 फलंदाजांमध्ये स्थान मिळवले आहे. त्याने 4 स्थानांची प्रगती करत 7 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तसेच या क्रमवारीत पहिल्या 10 फलंदाजांमध्ये चेतेश्वर पुजारा चौथ्या क्रमांकावर कायम आहे.

त्याचबरोबर वेस्ट इंडीज विरुद्ध दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात 111 धावांची शतकी खेळी, तर दुसऱ्या डावात नाबाद 53 धावांची अर्धशतकी खेळी करणारा हनुमा विहारीनेही पहिल्या 30 फलंदाजांमध्ये स्थान मिळवले आहे. तो आता 30 व्या क्रमांकावर आला आहे.

गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची मोठी झेप –

या कसोटी क्रमवारीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने 4 क्रमांकाची प्रगती करत तिसरे स्थान मिळवले आहे. त्याने वेस्ट इंडीज विरुद्धच्या कसोटी मालिकेत एकूण 13 विकेट्स घेतल्या. यामध्ये दुसऱ्या कसोटीत त्याने घेतलेल्या हॅट्रिकचाही समावेश आहे. बुमराहने या क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम 835 गुणही मिळवले आहेत.

त्याचबरोबर वेस्ट इंडीजचा कर्णधार जेसन होल्डरही पहिल्या 10 गोलंदाजांमध्ये आला असून तो बुमराहच्या पाठोपाठ चौथ्या क्रमांकावर आला आहे.

तसेच अन्य गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमी आणि इशांत शर्माने प्रत्येकी 1 स्थानांची प्रगती करत अनुक्रमे 18 वे आणि 20 वे स्थान मिळवले आहे. मात्र रविंद्र जडेजाने गोलंदाजी क्रमवारीत पहिल्या 10 मधील स्थान गमावले असून तो 10 स्थानावरुन 11 व्या स्थानावर घसरला आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

कसोटी चॅम्पियनशीपमध्ये भारत अव्वल स्थानी; जाणून घ्या अन्य संघांचे किती आहेत गुण?

यष्टीरक्षणात रिषभ पंतची एक्सप्रेस सुसाट; केला हा मोठा पराक्रम

कर्णधार कोहलीच्या या खास विक्रमाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही!

You might also like