भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सिडनी येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्याला एक रोमांचक वळण आलेले आहे. सामन्याच्या पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलिया सहजपणे सामना जिंकेल अशी चिन्हे दिसत होती, मात्र रिषभ पंत व चेतेश्वर पुजाराच्या दमदार अर्धशतकाच्या खेळीमुळे भारतीय संघासाठी विजयाची आशा जागृत झाली आहे. यामुळे ऑस्ट्रेलियन संघ काहीसा चिंतेत व काहीसा आक्रमक झालेला दिसला. या दरम्यानच स्टीव स्मिथने ड्रिंक्स-ब्रेक दरम्यान खेळपट्टीवर छेडछाड केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
ड्रिंक्स ब्रेक दरम्यान 49 क्रमांकाची जर्सी घातलेला ऑस्ट्रेलियन खेळाडू खेळपट्टीवर जाऊन क्रिजवरील भारतीय फलंदाजाचे बॅटिंग मार्क पायाने पुसताना दिसत आहे. त्यावेळी रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा फलंदाजी करत होते. क्रिजवरील बॅटिंग मार्क पुसल्यानंतर पंत तिथे फलंदाजी करण्यासाठी आलेलाही या व्हिडिओमध्ये दिसते.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून ऑस्ट्रेलियन संघांमध्ये 49 क्रमांकाची जर्सी स्मिथ वापरतो, त्यामुळे स्मिथच्या खेळ भावनेवर मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. 2018 साली स्मिथला दक्षिण आफ्रिकेत झालेल्या चेंडू छेडछाड प्रकरणामुळे आधीच त्याला एक वर्ष क्रिकेट पासून दूर राहावे लागले होते. त्यात आता पुन्हा अशा प्रकारचा व्हि़डिओ समोर आला असल्याने विविध प्रतिक्रिया सोशल मीडियातून उमटत आहेत.
After drinks break Aussie comes to shadow bat and scuffs out the batsmen's guard marks.
Rishabh Pant then returns and has to take guard again.#AUSvIND #AUSvsIND #AUSvINDtest pic.twitter.com/aDkcGKgUJC
— James Buttler | Cricket Badger Podcast 🏏🦡🇺🇦 (@cricket_badger) January 11, 2021
दरम्यान सामन्याचा विचार केला असता 407 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने उत्तम खेळ केलेला आहे. यष्टिरक्षक रिषभ पंत ने 97 तर चेतेश्वर पुजाराने 77 धावांची महत्वाची खेळी केली.सामन्यात भारत जोरदार मुसंडी मारत आहे असे वाटत असतानाच काही अंतरावरच पंत व पुजारा तंबूत परतले. पण असे असले तरी भारताचा डाव आर अश्विन आणि हनुमा विहारीने सांभाळला असून त्यांनी ११७ षटकापर्यंत पुजारा आणि पंत बाद झाल्यानंतर विकेट गमावलेली नाही. अजून भारताला 15 षटके फलंदाजी करायची आहे तर ऑस्ट्रेलियाला 5 विकेट्सची गरज आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
वाढदिवस विशेष: क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा राहुल द्रविड एकमेव क्रिकेटपटू
दमदार खेळी करून तंबूत परतणाऱ्या पंतचं सर्वांनी केलं कौतुक, पण नाराज ‘गुरुजींनी’ ढुंकूनही नाही पाहिलं
पंत भाऊ चमकले! सिडनी कसोटीत अर्धशतक झळकावत धोनीसह ‘या’ दिग्गजाला टाकलं पिछाडीवर