---Advertisement---

ऑस्ट्रेलियाने सोडला सुटकेचा निश्वास! ‘हा’ प्रमुख फलंदाज दिसला सराव करताना

On: बुधवार, डिसेंबर 16, 2020 5:58 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान खेळल्या जाणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला उद्यापासून (१७ डिसेंबर) ऍडलेड येथे सुरुवात होईल. मालिकेतील हा पहिला सामना गुलाबी चेंडूने दिवस-रात्र स्वरूपात खेळवला जाईल. मालिका सुरू होण्यास अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक असताना, ऑस्ट्रेलियासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दुखापतग्रस्त झालेला ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फलंदाज स्टीव स्मिथ हा पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज असलेला पहायला मिळाले. स्मिथ सराव करत असतानाचा व्हिडिओ क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शेअर केला आहे.

सराव सत्र अर्ध्यावर सोडून गेला होता स्मिथ
कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीवीर डेविड वॉर्नर दुखापतीमुळे खेळणार नाही. अशातच, काल (१५ डिसेंबर) स्टीव स्मिथ हा देखील सराव सत्र अर्ध्यावर सोडून ड्रेसिंग रूममध्ये गेला होता. त्यामुळे स्मिथच्या पहिल्या सामन्यात खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. हे दोन्ही अनुभवी फलंदाज संघात नसल्यास ऑस्ट्रेलियाला अडचणींचा सामना करावा लागतो.

कर्णधार पेनने दिली होती प्रतिक्रिया
ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने स्मिथच्या दुखापतीवर भाष्य करताना म्हटले होते की, “स्मिथ पहिला सामना खेळेल अशी आम्हाला आशा आहे. त्याला पाठीचा त्रास सामान्यपणे जाणवतच असतो. सरावा दरम्यान अधिक फलंदाजी केल्याने त्याला हा त्रास होत असावा. मात्र, ही तितकीशी गंभीर बाब नाही.”

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शेअर केला व्हिडिओ
स्मिथ पहिल्या सामन्यात खेळणार का नाही याविषयी बातम्या येत असतानाच, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक व्हिडिओ शेअर करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. सदर व्हिडिओत स्मिथ थ्रोडाऊनचा सराव करताना दिसून येतोय. स्मिथच्या तंदुरुस्त असन्याने ऑस्ट्रेलियन गोटात आनंदाचे वातावरण तयार झाले असेल. कारण, वॉर्नरपाठोपाठ स्मिथ पहिल्या कसोटीत सहभागी न झाल्यास ऑस्ट्रेलियाला नुकसान सोसावे लागू शकते.

भारताविरुद्ध केली आहे दमदार कामगिरी
स्मिथने भारताविरुद्ध नेहमीच दमदार कामगिरी केली आहे. त्याची आकडेवारी याची पुष्टी करते. स्मिथची कसोटी सरासरी भारताविरुद्ध सर्वोत्तम असलेली दिसून येते. त्याने भारताविरुद्ध ८४ च्या सरासरीने धावा काढल्या आहेत. १,४२९ धावा काढताना स्मिथने ७ शतके व ३ अर्धशतके झळकावली आहेत. याच कारणाने, ऑस्ट्रेलियन संघ स्मिथला मालिकेच्या चारही सामन्यात खेळण्यासाठी प्रयत्नशील असेल.

संबधित बातम्या:
– स्मिथच्या दुखापतीबाबत महत्वाची माहिती! कर्णधार टीम पेन म्हणाला
– बिग ब्रेकिंग! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय प्लेईंग इलेव्हनची घोषणा; या खेळाडूला मिळाली संधी
– पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा, या अष्टपैलूला तब्बल ४ वर्षांनंतर स्थान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---