भारतातील जवळपास सगळी लहान मुले दोन स्वप्ने पाहतात एक म्हणजे चित्रपटात काम करणे आणि दुसरे म्हणजे देशासाठी क्रिकेट खेळणे. या दोन्ही गोष्टींसाठी प्रचंड मेहनतीची आणि कौशल्याची गरज असते. काही खेळाडूंकडे या दोन्ही गोष्टी करण्याची क्षमता असूनही त्यांना त्या क्षेत्रामध्ये जास्त पुढे जाता येत नाही. कलाक्षेत्रात तरी इकडे तिकडे थोडेफार काम मिळते मात्र क्रिकेटमधील सर्वोच्च क्षण म्हणजे देशासाठी खेळणे हे सर्वांनाच जमत नाही.
असेच काही खेळाडू, देशांतर्गत क्रिकेटचे महारथी असूनही राष्ट्रीय संघात निवडले जात नाहीत. कणखर खेळाडू हे सगळे समजून घेतात तर काही खचून जातात. यातही काही खेळाडू असे असतात जे, चलाखीने मायदेशासाठी नाही तर दुसऱ्या देशासाठी खेळून आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकतात. यापैकीच एक खेळाडू म्हणजे वसईचा स्वप्नील पाटील.
वसईमधील दरपाळे गावचा रहिवासी असलेला स्वप्नील पाटील लहानपणापासून क्रिकेटचे बाळकडू घेत होता. इतर मुलांप्रमाणेच त्याला देखील भारतीय संघाचे निळी जर्सी अंगावर घालायचे स्वप्न पाहिले. शालेय स्तर ते महाविद्यालयीन स्तरावर तो चमकदार कामगिरी करत होता. उजवा हाताचा फलंदाज व यष्टीरक्षक असलेला स्वप्निल तो खेळत असलेल्या क्रिकेट वर्तुळात चांगलाच प्रसिद्ध झाला होता.
मुंबईच्या १६ वर्षाखालील व १९ वर्षाखालील संघांकडून तो नियमित खेळत. मुंबईमधील प्रतिष्ठित कांगा लीगमध्ये पाटील ब्रदर्स या संघाचा तो प्रमुख खेळाडू होता. भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे त्याचा खास मित्र. दोघेही मुलुंड जिमखाना येथे एकत्रित सराव करत.
१६ वर्षाखालील व १९ वर्षाखालील संघांसाठी स्वप्निलने चांगली कामगिरी केली होती. २००४ च्या रणजी मोसमासाठीच्या मुंबई रणजी संघाच्या संभावित खेळाडूत त्याची निवड झाली. परंतु, प्रमुख संघात त्याला जागा मिळाली नाही. त्यावेळी मुंबईच्या संघाचे नेतृत्व महान फलंदाज सचिन तेंडुलकर करत. त्या संघात वसीम जाफर, अमोल मुजुमदार, विनोद कांबळी, अजित आगरकर, निलेश कुलकर्णी असे दिग्गज खेळाडू असल्याने कदाचित त्याला संधी मिळू शकली नाही.
स्वप्निलने हताश न होता आपले खेळणे चालु ठेवले. मुंबईच्या २३ वर्षाखालील खेळाडूंच्या संघात स्थान मिळवले. पुढील मोसमातही त्याला मुंबईसाठी रणजी खेळता आली नाही. तो काहीसा निराश झाला.
२००६ मध्ये शिवा पगारानी यांनी त्याला खेळताना पाहिले. शिवा पगारानी यांची योगी कन्स्ट्रक्शन ही कंपनी दुबईमध्ये काम करते. शिवा यांनी स्वप्निलला दुबईमध्ये काम करण्याची ऑफर दिली. त्यांनी स्वप्निल व त्याच्या कुटुंबीयांना सांगितले, “स्वप्निलमध्ये खूप प्रतिभा आहे. मुंबईमध्ये त्याला संधी मिळण्याची शक्यताही धुसर आहे. तो दुबईमध्ये स्थायिक झाला तर भविष्यात यूएईसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकतो.”
स्वप्नीलच्या वडिलांनी त्याला परवानगी दिली आणि २००६ मध्ये स्वप्नील दुबईला गेला.
पगारानी यांच्या कंपनीमध्ये काम करता करता स्वप्निलला क्रिकेट खेळायची संमती देखील होती. दुबईमधील स्थानिक संघांकडून खेळत त्याने धावांचे डोंगर उभारले. यूएई क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना त्याचा खेळ आवडला. परंतु तो यूएईच्या राष्ट्रीय संघाकडून खेळण्यास पात्र ठरत नव्हता. नियमानुसार, कोणत्याही इतर देशातील क्रिकेटपटूला युएईसाठी खेळायचे असेल तर, त्याला चार वर्ष युएईमध्ये राहणे बंधनकारक असते. या नियमामुळे स्वप्निल २०१० मध्ये यूएईसाठी खेळणार होता.
२०१० मध्ये दुबई येथे बर्मुडा संघाविरुद्ध त्याने आपला पहिला प्रथमश्रेणी सामना खेळला. २०१४ साली स्कॉटलंड विरुद्ध लिंकन येथे २०१५ विश्वचषक पात्रता स्पर्धेत त्याने यूएई राष्ट्रीय संघासाठी एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले. त्या सामन्यात स्वप्निल दुर्दैवीरित्या ९९ धावांवर नाबाद राहिला. यूएईसाठी एक विक्रमी शतक हुकल्याची खंत त्याला अजूनही आहे.
२०१४ टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी त्याची निवड युएई संघात झाली. नेदरलँड, आयर्लंड व झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात तो खेळला परंतु यूएई संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरू न शकल्याने त्याला भारताविरुद्ध खेळता आले नाही.
२०१४ ला हुकलेली संधी स्वप्निलने २०१५ मध्ये साधली. पर्थ येथे एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या ब गटातील सामन्यात यूएई विरुद्ध भारत या सामन्यात त्याने युएईचे प्रतिनिधित्व केले. त्या सामन्याविषयी स्वप्निल सांगतो की,
” तो खरोखरच एक अविस्मरणीय सामना होता. ज्या देशात जन्मलो, ज्या देशात वाढलो त्या देशाविरुद्ध खेळणे कोणालाच आवडणार नाही. परंतु, यूएई माझी कर्मभूमी आहे. त्या देशाने मला मोठ्या स्तरावर माझे कौशल्य दाखविण्याची संधी दिली. माझा आदर्श एमएस धोनी त्याच सामन्यात खेळत होता आणि मी देखील त्याच्याप्रमाणे सात क्रमांकाची जर्सी घालून खेळत होतो. ”
यूएई मध्ये क्रिकेट गाजवत असताना स्वप्निलला बांग्लादेश प्रीमियर लीगमध्ये खेळण्याची संधी देखील मिळाली. २०१५ मध्येच तो चिटगाव वायकिंग्स या संघासाठी खेळला.
स्वप्निलने आत्तापर्यंत यूएईसाठी दहा एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये ३४.४२ च्या सरासरीने २४१ धावा काढल्या आहेत. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे.
भारतात संधी न मिळाल्याने, क्रिकेट खेळायच्या वेडापायी स्वप्निलने आखाती देशाचा मार्ग निवडला. त्यामार्गे का होईना, त्याचे व कुटुंबीयांचे स्वप्निलने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचे स्वप्न मात्र पूर्ण झाले.
महत्त्वाच्या बातम्या-
सौरव गांगुली व्हावा आयसीसीचा अध्यक्ष, श्रीलंकेच्या या दिग्गज क्रिकेटपटूने दिला पाठिंबा
आता हिंदीमध्येही वाचायला मिळणार क्रिकेटचे नियम; भारताच्या या पंचाने केले नियमांचे भाषांतर
ट्रेंडिंग लेख-
यूएईमध्ये आयपीएल सामन्यात सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारे फलंदाज; एका भारतीयाचा समावेश
२०२० आयपीएल युएईमध्ये झाली, तर दिल्ली कॅपिटलचे हे ४ खेळाडू करु शकतात दमदार कामगिरी
काय सांगता! या ३ वेळेला संपूर्ण संघाला मिळूनही करता आल्या नाहीत १० धावा